कोरोना व्हायरस : डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग आशियातल्या कोणकोणत्या देशांमध्ये वाढतोय?

इंडोनेशियात रुग्णसंख्येत आणि मृत्यूंमध्ये मोठी वाढ झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंडोनेशियात रुग्णसंख्येत आणि मृत्यूंमध्ये मोठी वाढ झाली आहे.
    • Author, रिएलिटी चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरियंटची रुग्णसंख्या अजून फार मोठी नसली, तरी आशिया खंडातल्या इतर काही देशांमध्ये संसर्ग झपाट्याने पसरतोय. 

आशिया खंडातले काही देश वगळता इतर सगळ्या देशांमध्ये लसीकरणाचा वेग कमी आहे. 

भारतामध्ये पहिल्यांदा आढळलेला डेल्टा व्हेरियंट हा 'आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्गजन्य' व्हेरियंट असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने नुकतंच म्हटलं होतं.

नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या भारताच्या शेजारी देशांमध्ये मे महिन्यात रुग्णसंख्या प्रचंड वाढली होती. (आता तिथली रुग्णसंख्या कमी होतेय.)

सर्वात मोठा फटका बसला नेपाळला. वाढत्या रुग्णसंख्येचा नेपाळच्या स्थानिक आरोग्य यंत्रणेवर ताण आला. 

जून महिन्यात अफगाणिस्तानात सर्वोच्च रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. राजधानी काबुलमध्ये आढळलेल्या रुग्णांपैकी 60% डेल्टा व्हेरियंटच्या संसर्गाची प्रकरणं असल्याचं अफगाणिस्तानचे आरोग्य मंत्री वाजिद मजरुह यांनी सांगितलं होतं.

बांगलादेश, इंडोनेशिया, थायलंड आणि मंगोलियामध्येही डेल्टा व्हेरियंटची रुग्णसंख्या वाढत असल्याचं WHO ने म्हटलं होतं. 

या देशांमधल्या परिस्थितीवर नजर टाकूयात

बांगलादेश

मे महिन्याच्या मध्यापासून बांगलादेशातली रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. 25 मे ते 7 जून या कालावधीमध्ये बांगलादेशाची राजधानी असणाऱ्या ढाका शहरामध्ये आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी 68% केसेस डेल्टा व्हेरियंटच्या असल्याचं एका सरकारी पाहणीत आढळलंय.

बांगलादेशात लॉकडाऊन लावण्यासाठी लष्कराची मदत घेण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशात लॉकडाऊन लावण्यासाठी लष्कराची मदत घेण्यात आली.

या व्हेरियंटचा परिणाम लक्षात घेऊन बांगलादेशात आता राष्ट्रीय लॉकडाऊन लावण्यात आलाय. 

लॉकडाऊनपूर्वी ढाका शहरातून स्थलांतरित मजूर मोठ्या संख्येने बाहेर पडून आपापल्या गावी परत गेल्याने संसर्ग पसरून रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. 

इतर काही देशांच्या मानाने बांगलादेशात लसीकरण मोहीम आधी सुरु करण्यात आली होती. पण लशीचं वितरण संथ गतीने होत होतं.

भारताकडून बांगलादेशला कोव्हिशील्डचे 16 लाख डोसेस देण्यात आले होते. ते बांगलादेशने वापरले. पण त्यानंतर भारताकडून होणारी लशींची निर्यात थांबवण्यात आली आणि बांगलादेशला आपली लसीकरण मोहीम थांबवावी लागली. 

लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर आपापल्या गावी परतण्यासाठी धक्क्यावर अशी गर्दी झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर आपापल्या गावी परतण्यासाठी धक्क्यावर अशी गर्दी झाली होती.

त्यानंतर चीनकडून मिळालेल्या सायनोफार्म लशींच्या काही डोसच्या मदतीने बांगलादेशातली लसीकरण मोहीम 22 जून रोजी पुन्हा सुरु करण्यात आली. 

30 जूनपर्यंत बांगलादेशच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त 3 % जणांचं पूर्ण लसीकरण करण्यात आलं होतं. 

इंडोनेशिया

इंडोनेशियातल्या अनेक भागांमध्ये 20 जुलैपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलाय.

लॉकडाऊन लावण्याआधीच जकार्तामधले रस्ते असे जवळपास सुनसान झाले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लॉकडाऊन लावण्याआधीच जकार्तामधले रस्ते असे जवळपास सुनसान झाले होते.

जूनच्या सुरुवातीपासूनच इथली रुग्णसंख्या आणि मृत्यूंचा आकडा वाढत होता आणि हे डेल्टा व्हेरियंटमुळे होत असल्याचं सरकारने म्हटलंय. 

गेल्या तीन आठवड्यांमध्ये आढळलेल्या रुग्णांपैकी 60% केसेस डेल्टा व्हेरियंटच्या असल्याचं इंडोनेशियाच्या आरोग्य खात्याने म्हटलंय.

इंडोनेशियामध्ये लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असला तरी आतापर्यंत 5 टक्क्यांपेक्षा कमी जणांचं लसीकरण पूर्ण झालंय. 

इंडोनेशियामध्ये दररोज 10 लाख डोसेस देण्याचं उद्दिष्टं राष्ट्राध्यक्ष जोको विदोदो यांनी ठेवलंय आणि ऑगस्टपर्यंत हे प्रमाण दुप्पट करण्यात येणार आहे. 

हॉस्पिटलमध्ये बेड्सची उपलब्धता आणि ऑक्सिजन पुरवठा यांची परिस्थिती पाहता इंडोनेशिया एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर असल्याचं इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंटने नुकतंच म्हटलं होतं. 

थायलंड

थायलंडमध्ये नुकतीच वाढलेली कोव्हिड रुग्णांची आणि मृत्यूंची संख्या ही डेल्टा व्हेरियंटचा परिणाम असल्याचं देशाच्या मेडिकल सायन्स विभागाने म्हटलंय. 

कोरोना चाचणी

राजधानी बँकॉकमध्ये गेल्या आठवड्यात नोंदवण्यात आलेल्या रुग्णांपैकी 26% जणांना डेल्टा व्हायरसची लागण झाल्याचं या विभागने म्हटलंय.

जूनच्या अखेरपर्यंत थायलंडच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त 4% जणांचं लसीकरण पूर्ण झालंय. 

पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी फुकेतसारख्या थायलंडच्या बेटांवर परदेशी पर्यटकांना परवानगी देण्यात आलेली आहे. पण तिथेही डेल्टा व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. 

"यात धोका असला तरी, थाई लोकांना रोजीरोटी मिळावी यासाठी धोका पत्करणं आम्हाला भाग असल्याचं," थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओछा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. 

मंगोलिया

आशिया खंडातल्या इतर देशांच्या तुलनेत या देशामधलं लसीकरणाचं प्रमाण जास्त आहे.

सर्वात जास्त लसीकरण दर असणाऱ्या आशिया खंडातल्या देशांपैकी मंगोलिया एक आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सर्वात जास्त लसीकरण दर असणाऱ्या आशिया खंडातल्या देशांपैकी मंगोलिया एक आहे.

इथल्या लोकसंख्येपैकी 50% पेक्षा जास्त जणांचं लसीकरण पूर्ण झालंय. चीनमध्ये तयार करण्यात येणाऱ्या सायनोफार्म लशीचा वापर इथे अधिक होतोय. 

उन्हाळा येईपर्यंत देशाला कोव्हिड मुक्त करू, असं आश्वासन देत इथल्या सरकारने लसीकरणाचा वेग वाढवला होता. पण गेल्या काही काळात मंगोलियातली रुग्णसंख्या आणि कोव्हिड मृत्यू वाढले आहेत.

लोकसंख्येच्या तुलनेत याचा विचार केला तर हे प्रमाण आशिया खंडात सर्वाधिक आहे. लसीकरणासाठी चीनच्या लशींवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणाऱ्या देशांमधल्या कोव्हिड रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं काही माध्यमांनी म्हटलंय. 

पण मंगोलिया लॉकडाऊनमधून बाहेर पडत असल्याने जूनमध्ये रुग्णसंख्या वाढली असून चीनच्या लशी अपयशी ठरल्या नसल्याचं मंगोलियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

इंडोनेशियातल्या लसीकरणामध्ये 85% पेक्षा जास्त प्रमाणात चिनी लशी वापरण्यात आल्या आहेत. सायनोव्हॅक लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही डझन आरोग्य कमर्चाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. 

डेल्टा व्हेरियंटवर ही लस किती परिणामकारक आहे याचा अभ्यास आता तिथले साथीच्या रोगांचे तज्ज्ञ - एपिडेमिओलॉजिस्ट (Epidemiologist) करत आहेत. लशीचे दोन डोस घेतलेल्यांनी तिसरा बूस्टर डोस घेणं गरजेचं आहे का याबद्दल इंडोनेशियात चर्चा सुरु आहे, पण WHO असा सल्ला अद्याप दिलेला नाही. 

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)