ZyCoV-D: लहान मुलांना या कोरोना लशीचे तीन डोस का दिले जाणार?

लहान मुलगी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, अनंत प्रकाश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारतीय औषध उत्पादक कंपनी झायडस कॅडिलाची ZyCoV-D ही लस आता लवकरच लहान मुलांसाठी उपलब्ध होऊ शकते.

येत्या काही आठवड्यांमध्ये या लशीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची मंजुरी मिळू शकते. त्यानंतर ZyCoV-D ही जगातील पहिली डीएनएवर आधारित लस ठरेल.

भारत सरकारने गेल्या शनिवारी (26 जून) सर्वोच्च न्यायालयासमोर लशीकरणासंबंधी आकडेवारी सादर केली. यामध्ये सरकारने म्हटलं की, ZyCoV-D ही लस जुलै-ऑगस्टपर्यंत 12 वर्षांहून अधिक वयाच्या मुलांसाठी उपलब्ध होईल.

सरकारनं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, ऑगस्ट 2021 ते डिसेंबर 2021 पर्यंत भारत सरकारकडे लशींचे जवळपास 131 कोटी डोस उपलब्ध होतील. यामध्ये कोव्हिशिल्डचे 50 कोटी, कोव्हॅक्सिनचे 40 कोटी, बायो ई सब युनिटच्या लशीचे 30 कोटी, स्पुटनिक व्हीचे 10 कोटी आणि झायडस कॅडिलाचे 5 कोटी डोस असतील.

भारत सरकारने सध्या तीन लशींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. यामध्ये कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि रशियन लस स्पुटनिकचा समावेश आहे. या सर्व लशींचे दोन डोस द्यावे लागतात.

मात्र ZyCoV-D ला मान्यता मिळाल्यानंतर लसीकरणासाठी चार लशी उपलब्ध होतील. त्यांपैकी दोन लशी या भारतात बनवलेल्या असतील.

या लशीचं वेगळेपण काय आहे?

डीसीजीएकडून मंजुरी मिळाल्यानंतर ZyCoV-Dला जगातील पहिली डीएनए आधारित लस ठरेल. ही दुसरी स्वदेशी लस असेल जी पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे.

लहान मुलगी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

कंपनीचे संचालक डॉ. शरविल पटेल यांनी काही दिवसांपूर्वी एका खाजगी टेलिव्हिजन चॅनेलशी संवाद साधताना म्हटलं-

  • या लशीची क्लिनिकल ट्रायल 28 हजार स्वयंसेवकांवर करण्यात आली आहे. ही देशातील सर्वांत मोठी क्लिनिकल ट्रायल आहे.
  • क्लिनिकल ट्रायलमध्ये 12 ते 18 वर्षे वयाच्या मुलांसह सर्व वयोगटातील लोक सहभागी झाले होते.
  • ही लस घेण्यासाठी इंजेक्शनची आवश्यकता नाहीये. ही एक इंट्रा-डर्मल व्हॅक्सिन आहे. ही लस घेताना स्नायूंमध्ये इंजेक्शन घ्यावं लागत नाही. हीच गोष्ट वितरणासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते.
  • ही लस 2 ते 8 डिग्री सेल्सियस तापमानामध्ये खूप काळासाठी ठेवता येऊ शकते. त्याचबरोबर ही लस 25 डिग्री सेल्सियस तापमानात चार महिन्यांपर्यंत ठेवली जाऊ शकते.
  • ही लस नवीन व्हेरियंट्ससाठी पण अपडेट करता येऊ शकते.
  • सुरूवातीच्या दिवसांमध्ये आम्ही महिन्याला या लशीचे 1 कोटी डोस तयार करणार आहोत.

डीएनए आधारित लस म्हणजे काय?

ZyCoV-D ही एक डीएनए आधारित लस आहे. जगभरात लस बनविण्याचा हा सिद्ध झालेला फॉर्म्युला आहे.

राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसोबत काम करणारे डॉक्टर बीएल शेरवाल लस बनविण्याच्या या पद्धतीबद्दल अधिक माहिती देतात.

प्रतीकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

ते सांगतात, "आपल्या शरीरात दोन पद्धतीच्या विषाणूंचा-डीएनए आणि आरएनए संसर्ग होत असल्याचं सांगितलं जातं. कोरोना विषाणू हा एक आरएनए विषाणू आहे, जो सिंगल स्ट्रेंडेड असतो. डीएनए डबल स्ट्रेंडेड असतो आणि आपल्या कोशिकांमध्ये आढळतो.

जेव्हा आपण या विषाणूला आरएनएमधून डीएनएमध्ये परिवर्तित करतो, तेव्हा त्याची एक कॉपी बनवतो. त्यानंतर हा व्हायरस डबल स्ट्रेंडेड बनतो आणि त्यानंतर तो डीएनएमध्ये परिवर्तित होतो."

डीएनए व्हॅक्सिन जास्त प्रभावी आणि शक्तिशाली समजली जाते. देवी, नागिणसारख्या समस्यांवरही डीएनए लसही वापरली गेली होती.

दोनऐवजी तीन डोस का?

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार या लशीचे तीन डोस प्रत्येकी 28 दिवसांच्या कालावधीनं दिले जातील. आतापर्यंत ज्या लशी उपलब्ध आहेत, त्याचे दोनच डोस दिले जात आहेत.

त्यामुळे या लशीचे तीन डोस का दिले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन डोसमध्ये पुरेशा अँटीबॉडी तयार करण्याची या लशीची क्षमता नाहीये का, असा मुद्दा उपस्थित होत आहे.

पण डॉ. शेरवाल यांच्या मते तीन डोस द्यावे लागणं म्हणजे लशीची क्षमता कमी आहे असा विचार करायला नको.

लसीकरण

फोटो स्रोत, Getty Images

ते सांगतात, "लशीचा पहिला डोस दिल्यानंतर त्या व्यक्तिमध्ये किती रोगप्रतिकारक क्षमता विकसित झाली आहे, हे पाहिलं जातं. जर ती योग्य प्रमाणात विकसित झाली नसेल तर दुसरा आणि तिसरा डोस दिला जातो.

डोस कमी मात्रेत असला तरीसुद्धा अँटीबॉडीज कमी प्रमाणात बनतात. नंतर दुसरा आणि तिसरा डोस दिला जातो. त्यामुळे लस कमी परिणामकारक आहे, असा अर्थ होत नाही. पहिल्या डोसनंतर दुसरा आणि तिसरा डोस बूस्टरचं काम करतो. अँटी-बॉडीज पण जास्त प्रमाणात तयार होतात. माझ्या मते यामुळे मिळणारं संरक्षणसुद्धा दीर्घकाळ टिकणार असतं."

केव्हापर्यंत उपलब्ध होणार लस?

विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घ्यायची की ऑफलाइन या मुद्द्यावर वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था न्यायालयात धाव घेत असतानाच ही लस बाजारात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (29 जून) चार्टड अकांउन्टन्सीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीला परवानगी दिली आहे.

मात्र त्याआधी सीबीएसईसह अनेक शिक्षण मंडळांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

भारतात कोरोना व्हायरस आढळल्यानंतर दीड वर्षानंतरही कोट्यवधी मुलं अजूनही ऑनलाइन शिक्षण घेत आहेत, तशाच पद्धतीनं परीक्षा देत आहेत.

मुलांसाठी कोणतीही लस उपलब्ध नसणं हे त्यामागचं एक कारण आहे.

भारतात 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची संख्या जवळपास 14 कोटी असल्याचं सांगितलं जात आहेत. त्यामुळेच इतक्या मोठ्या समूहासाठी लस कधीपर्यंत उपलब्ध होणार असा प्रश्न विचारला जात होता.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राष्ट्रीय तंत्रज्ञान सल्लागार समूहाचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी सांगितलं की, लशीच्या चाचण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत.

त्यांनी म्हटलं, "आमच्या माहितीप्रमाणे झायडस कॅडिलाची चाचणी जवळपास पूर्ण झाली आहे. याचे निष्कर्ष एकत्रित करून त्यावर निर्णय घ्यायला आम्हाला चार ते सहा आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. माझ्या मते जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा ऑगस्टमध्ये आम्ही 12 ते 18 वर्षे वयाच्या मुलांना लस देऊ शकतो."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)