Vaccine side effects: कोरोनाची लस घेण्याचा अनुभव कसा होता? त्या परिणामांचा अर्थ काय?

- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
आपण लस घेणार या कल्पनेनेच मी हरखून गेलो होतो. कोव्हिडचे वुहानमध्ये अगदी थोडे रुग्ण होते तेव्हापासून ते जगभरातल्या अनेक लशी विकसित होईपर्यंत मी कोरोनाच्या सगळ्या बातम्यांचा पाठपुरावा करत आहे.
त्यामुळे लस घेण्याची माझी वेळ आली तो क्षण माझ्य़ासाठी एकदम भारी होता. पण लस घेतल्यानंतरच्या माझा अनुभव मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगणार आहे. खरं सांगायचं झालं तर लशीमुळे मला थक्क व्हायला झालं.
हा अनुभव सांगण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करावी लागेल. ती म्हणजे कोव्हिडपेक्षा मी लशीचे दुष्परिणाम सहन करणं कधीही पसंत करेन. मला आणखी एक वर्ष निर्बंध लादून घेण्यापेक्षा किंवा कोरोना व्हायरस माझ्या जवळच्या लोकांकडे प्रसारित होण्यापेक्षा लस घेणं कधीही सर्वांत आवश्यक आणि महत्त्वाचं वाटतं.
मी ऑक्सफर्ड- अस्ट्राझेन्का लशीचा पहिला डोस सकाळी 9.30 वाजता घेतला. दिवस मावळल्यावर मात्र सगळं चित्र बदललं. मला पुढचे तीन दिवस अंथरुणातून उठताच आलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
सगळ्यांत वाईट म्हणजे डोकेदुखी आणि उलट्या सुरू झाल्या. त्यात भर म्हणून थंडी वाजून अंगही दुखायला लागलं.
हे माझ्याच वाट्याला का आलं असा प्रश्न माझ्याही मनात आला. त्यातून बाहेर आल्यावर मी विचार सुरू केला.
काही लोकांना एकदम टोकाचे त्रास होतात आणि काही लोकांना लस घेतल्यावर फारसा त्रास होत नाही याचा अर्थ काय असेल? माझ्यावर एवढे परिणाम झाले म्हणजे माझ्या एकदम ताकदवान लढाऊ प्रतिकारक्षमता तयार झाली असेल? असा अर्थ आहे का?
हे दुष्परिणाम येतात कुठून?
कोव्हिडची लस तुमच्या शरीराला आपण कोरोना व्हायरसविरोधात लढत आहोत असा आभास तयार करते आणि इन्फेक्शनविरोधात आपल्या प्रतिकरक्षमतेला लढण्यासाठी उद्युक्त करते
पहिल्यांदा आपल्या दंडावर जिथं लस टोचलीय तिथं सूज येते आणि दुखू लागतं.
ही लक्षणं मग हळूहळू शरीरभर पसरतात आणि ताप, थंडी वाजणे, मळमळीसारखी लक्षणं दिसू लागतात.

फोटो स्रोत, Getty Images
हे का होत असावं असं मी एडिनबर्ग विद्यापीठात रोगप्रतिकारशास्त्र आणि संसर्गजन्य रोगांसंदर्भात शिकवणाऱ्या प्राध्यापक एलेनॉर रिले यांना विचारलं.
ते मला म्हणाले, "हे दाहकतेच्या प्रतिसादामुळे होतं."
रासायनिक आगीच्या धोक्याच्या घंटेसारखं ते काम करतं. ते म्हणजे काहीतरी बिघडलंय अशी सूचना देणाऱ्या रसायनांचा पूर शरीरभरात आल्यासारखं आहे.
प्रा. रिले म्हणाले, "शरीर आपली प्रतिकारक्षमता एकत्र जमवतं आणि प्रतिकारक्षमतेच्या पेशींना हाताला जिथं टोचलंय तिथं जाऊन नक्की काय झालंय हे पाहाण्यासाठी पाठवतं."
अर्थात याच पेशींमुळे आपल्याला थोडा काळ बरं नसल्यासारखं वाटतं.
काही लोकांवर हे दुष्परिणाम जास्त का दिसतात?
लशीचे साईड इफेक्ट्स म्हणजे दुष्परिणाम व्यक्तीनुसार बदलतात. काही लोकांना त्याची जाणिवही होत नाही. काही लोकांना अशक्त वाटू लागतं, पण ते काम करू शकतात. तर काही लोकांना झोपून राहावं लागतं.

फोटो स्रोत, Getty Images
ऑक्सफर्ड-अस्ट्राझेन्काच्या चाचण्यांचं नेतृत्व करणारे प्रा. अँड्र्यू पोलार्ड म्हणाले, "सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे तुमचं वय असतं जेम्स. (मी सध्या पस्तिशीत आहे)."
"जितकं वय जास्त तितके साइड इफेक्ट्स कमी. सत्तरीच्या वर असाल तर आजिबात दुष्परिणाम दिसणार नाहीत."
परंतु एका वयोगटातल्या दोन व्यक्तींवर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात.
"आपल्या प्रतिकारक्षमतेमध्ये प्रचंड जनुकीय विविधता असते", असं रिले यांनी सांगितलं.
विविधता म्हणजे काही लोकांची प्रतिकारक्षमता जरा जास्त क्षुब्ध असते आणि ती आक्रमकपणे काम करणारी असते.
प्रा. रिले म्हणाले, "ज्या लोकांमध्ये फ्लूची सर्व लक्षणं दिसली त्यांच्या प्रतिकारक्षमतेनं वाजवीपेक्षा जास्त प्रतिसाद दिला असावा."
"थंडीवाजून येणं किंवा फ्लूसारखं झालं असेल तर तू त्या लोकांपैकी असावास", असं ते म्हणाले.
साइड इफेक्ट्स वाढण्याची एक किंचित शक्यता असते ती म्हणजे जर तुम्हाला आधी कधी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असेल तर. जर असा संसर्ग झाला असेल तर लसीकरणानंतर प्रतिकारक्षमता मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊ शकते.
हे साईड इफेक्ट्स म्हणजे जास्त संरक्षण असं असतं का?
भरपूर साईड इफेक्ट्स म्हणजे भरपूर संरक्षण अशी माझी कल्पना होती. पूर्वीच्या काही लशींच्याबाबतीत ते खरंही होतं.
प्रा. पोलार्ड याबाबतीत म्हणाले, "2009 च्या फ्लूच्या साथीप्रमाणे अशी काही उदाहरणं आहेत, त्या लशींच्यावेळेस जास्त दुष्परिणाम दिसणं हे प्रतिकारक्षमतेच्या चांगल्या प्रतिसादाचं लक्षण होतं."
पण कोव्हिडच्या लशीबाबत तसं नाही. लस घेणाऱ्या सर्वांना साधारपणे एकसारखंच संरक्षण मिळतं.
"वृद्ध लोकांना याचे साईड इपेक्ट्स अगदीच कमी दिसले तरी त्यांच्या प्रतिकारक्षमतेचा प्रतिसाद सारखाच होता हे पाहून आश्चर्य वाटतं."
प्रतिकारक्षमतेचे असणारे दोन भाग कसे एकत्र येऊन काम करतात त्यावर हे अवलंबून आहे.
पहिल्या भागाला जन्मजात प्रतिसाद म्हणतात, रासायनिक आगीची धोक्याची घंटा त्यात समाविष्ट असते. दुसऱ्या भागात अनुकूल प्रतिसाद (अॅडाप्टिव्ह) असतो. हा प्रतिसाद बी सेल्सची रचना करून प्रतिपिंडे म्हणजे अँटिबॉडिज तयार करतो आणि संसर्गाविरुद्ध लढायला शिकवतो आणि कसं लढायचं हे लक्षातही ठेवतो. यामुळे विषाणू आणि विषाणूमुळे संसर्ग झालेल्या पेशी नष्ट होतात.
प्रा. रिले सांगतात, "प्रतिकारक्षमतेच्या सुरुवातीच्या जन्मजात प्रतिसादावरून तुमच्यावरील साईड इफेक्ट्सची पातळी ठरते, हा प्रतिसाद वयानुसार बदलतो. तुम्हाला फक्त या जन्मजात प्रतिसादाचा थोडा वापर करून अनुकूल म्हणजे अॅडाप्टिव्ह प्रतिसादाला जागं करण्याची गरज असते. जेणेकरुन तुमचं रक्षण होईल."
दुसरा डोससुद्धा असाच वाईट असणार का?
आता पहिल्या डोस घेतल्यावर एवढे दुष्परिणाम दिसले तर मग दुसऱ्या डोसच्यावेळेसही अशीच स्थिती असणार का? असा प्रश्न विचारला जातो.
प्रा. पोलार्ड म्हणाले, "तुझा लशीचा दुसरा डोस तितका उपद्रवी नसेल, पहिल्यापेक्षा सौम्य दुष्परिणाम दिसतील"
अर्थात फायझर लशीचा दुसऱा डोस घेताना पहिल्या डोसपेक्षा थोडे अधिक परिणाम दिसू शकतात.
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनावरील लशींमुळे रक्ताच्या गाठी होण्यासारखे दुष्परिणाम दिसल्याच्या बातम्या येत होत्या. युरोपियन मेडिसिनस एजन्सीनं असे कोणतेही दुष्परिणाम लशीमुळे झाल्याचे पुरावे नसल्याचं म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








