ट्विटर इंडियाच्या मनीष माहेश्वरींवर FIR, चुकीचा नकाशा दाखवल्याचा आरोप

ट्विटरवर भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याचा आरोप करत, ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी आणि ट्विटरच्या कंटेट पार्टनरशिप टीमच्या प्रमुख अमृता त्रिपाठी यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील बजरंग दलाचे नेते प्रवीण भाटी यांनी केलेल्या तक्रारीवरून हा FIR दाखल करण्यात आली आहे.

बुलंदशहर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हरेंद्र कुमार यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, खुर्जा कोतवालीमध्ये FIR दाखल करण्यात आलीय.

हरेंद्र कुमार यांनी सांगितलं, "माहेश्वरींनी भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याचा आरोप करणारी तक्रार आली होती. त्या तक्रारीच्या आधारे आयपीसी कलम 505 (2) आणि आयटी (सुधारित) अधिनयम 2008 च्या 74 व्या कलमाअन्वये FIR दाखल करण्यात आला. पुढील कारवाई चौकशीच्या आधारे केली जाईल."

बजरंग दलाचे प्रांत संयोजक प्रवीण भाटी यांनी बुलंदशहर पोलिसांकडे माहेश्वरींविरोधात तक्रार केली होती.

प्रवीण भाटी यांच्या आरोपांनुसार, "जगाला संभ्रमित करण्यासाठी ट्विटरनं जाणीवपूर्वक भारताच्या नकाशाशी छेडछाड केली. सोमवारी दुपारी जेव्हा ट्विटर पाहत होतो, तेव्हा असा नकाशा पाहिला."

तक्रार दाखल करताना प्रवीण भाटी यांनी माहेश्वरींवर देशद्रोहाचा कलम लावण्याचीही मागणी केली होती.

ट्विटरच्या वेबसाईटवर करिअर नावाचं पेज आहे. यातील एका सेक्शनमध्ये नकाशाद्वारे ट्विटर सांगतं की, कंपनीचं काम कुठं कुठं चालतं. याच नकाशावर भारतही आहे. मात्र, भाटींच्या आरोपांनुसार, नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाखला दोन वेगवेगळ्या देशांच्या रूपात दाखवण्यात आलं होतं.

ट्विटरच्या या चुकीच्या नकाशाबाबत भारत सरकारनंही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ट्विटरनं वेबसाईटवरुन तो नकाशा हटवला होता.

भारतात ट्विटर याआधाही वादात राहिला आहे. काही दिवसांपूर्वी गाझियाबादमध्ये वृद्ध व्यक्तीला मारहाण करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मनीष माहेश्वरी यांना गाझियाबाद पोलिसांनी नोटीसही दिली होती.

त्यानंतर माहेश्वरींनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले होते. कर्नाटक हायकोर्टानं गाझियाबाद पोलिसांना आदेश दिले होते की, त्यांनी माहेश्वरींविरोधात कुठलीही कठोर पावलं उचलू नयेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)