जहाँआरा: शाहजहान बादशहाची मुलगी जगातली सर्वात श्रीमंत महिला कशी ठरली?

जहां आरा

फोटो स्रोत, MUSEUM OF FINE ARTS, BOSTON

फोटो कॅप्शन, जहाँ आरा
    • Author, मिर्झा ए.बी. बेग
    • Role, बीबीसी उर्दू डॉट कॉम, दिल्ली

अनेक वर्षांच्या वनवासानंतर मुघलांची राजकुमारी जहाँआरा आणि तिच्या कुटुंबाला चांगले दिवस पाहायला मिळाले आणि तिचे पिता बादशहा बनले.

राजकुमार खुर्रमच्या राज्याभिषेकाचा दिवस असल्यानं महालात जोरदार तयारी सुरू आहे.

"आम्ही सर्वांनी नवीन वस्त्रं परिधान केली आहेत. मी रेशमी अंगरखा आणि गडद निळ्या रंगाचा चांदीचे जरदोजी काम केलेला पायजमा परिधान केला आहे. त्यावर चांदीचंच काम केलेला जाळीदार दुपट्टा (ओढणी) घेतला आहे. रोशन आरानेही अशीच वस्त्रं परिधान केली आहेत. फक्त तिच्या कपड्यांचा रंग चमकणारा पिवळा आणि सोनेरी आहे. सती अल-निसा बेगम जांभळ्या पोशाखात आणि सोनेरी पिश्वाज (एक प्रकारचा गाऊन) मध्ये सुंदर दिसत आहेत," असं जहान आरा हिनं त्यादिवसाबाबत तिच्या डायरीत लिहिलं आहे.

"दारा, शुजा, औरंगजेब आणि मुराद यांनी लाल पायजमा आण सोनेरी अस्तर असलेले जॅकेट परिधान केले आहेत, तर त्या सर्वांचे वेगवेगळ्या रंगांचे कमरबंदही आहेत."

"सती अल-निसा यांनी दागिन्यांचा डबा उघडला आणि मला तसंच रोशन आराला गळ्यातील हार, बांगड्या, कानातले (झुमके) आणि पैंजण दिलं. मुलांना मोत्यांचे हार, बाजूबंद, जोशन (एक प्रकारचं कडं) आणि अंगठ्या दिल्या."

शहाजहान मुलगा दारा शिकोहसोबत

फोटो स्रोत, DARA SHUKOH THE MAN WHO WOULD BE KING

फोटो कॅप्शन, शहाजहान मुलगा दारा शिकोहसोबत

"आई तर कित्येक तासांपासून तयार होत होती. आम्ही तिला पाहिलं तेव्हा पाहतच राहिलो, कारण यापूर्वी ती कधीही एवढी सुंदर आणि आकर्षक दिसली नव्हती."

"मुघल साम्राज्यातील सर्व महान, ज्येष्ठ हे दिवान-ए-आम मध्ये उपस्थित आहेत. महिलांसाठी पडदे लावले आहेत. आम्ही दरबार पाहता यावा म्हणून पडद्याजवळच बसलो. मी ज्यांना ओळखू शकत होते, त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करत होते. आजोबा आसिफ खान यांनी सोनेरी रंगाचे पिश्वाज आणि खांद्यावर लाल शाल घेतलेली होती. अब्दुल रहीम खान हे मेवाडचे तरुण राजकुमार अर्जुन सिंह यांच्याशी बोलण्यात व्यस्त होते. महाबत खान पांढऱ्या मिशांसह वेगळेच दिसत होते."

"ढोलाचा आवाज ऐकताच माझ्या लक्षात आलं की, माझे वडील येत आहेत. त्यांचं नाव एवढ्या पदव्या आणि शिष्टाचारासह घेण्यात आलं की, ते ऐकूण रोशन आरा एकदम म्हणाली, "अब्बूकडे एवढ्या पदव्या आहेत हे मला माहितीच नव्हतं." मी तिला हळूच म्हटलं, "तुला काय वाटतं त्यांना तरी या लक्षात राहतील का?"

शहाजहानचा मुलगा

फोटो स्रोत, HISTORICAL PICTURE ARCHIVE

फोटो कॅप्शन, शहाजहानचे मुलगे शाह शुजा, औरंगजेब आणि मुराद शिकारीला जाताना.

जहाँआरा पुढं लिहितात, "वडिलांनी मुघल साम्राज्यातील सर्वात उत्तम दागिन्यांमधील काही दागिने परिधान केले होते. त्यांचे पिश्वाज सोनेरी रंगाचे होते. त्यावर सुवर्ण आणि चांदीच्या धाग्यांनी कलाकुसर केलेली होती. हिरे असलेला शिरपेच (पगडी किंवा मुकुटावरील दोन पंख असलेला दागिना), गळ्यात मोत्यांचा सहापदरी हार आणि त्यातील मोदी कबुतरांच्या अंड्याएवढ्या आकाराचे होते. हातात बाजुबंद आणि जोशान तसंच बोटांमध्ये अंगठ्या होत्या.

राज्याभिषेक सोहळा अगदी साधा होता, असं त्यांनी लिहिलं आहे. शाही इमामांनी उपदेश दिला आणि नंतर त्यांना दुवा (आशीर्वाद) दिल्या. त्यानंतर एकापाठोपाठ एक पदानुसार सर्व सरदार येत होते आणि शुभेच्छांसह भेटवस्तू देत होते.

"त्याठिकाणी सोन्याच्या मोहरा, दागिन्यांचे डबे, दुर्मिळ आणि मौल्यवान हिरे, मोती, चीनमधील महागड्या रेशमी कपड्यांचे गठ्ठे, युरोपातील अत्तर आणि अनेक प्रकारचे दागिने ठेवले होते. कारण वडिलांना (शहाजहान) दागिने आवडतात हे सरदारांना माहिती होतं."

14 व्या वर्षी सहा लाखांचे वार्षिक वेतन

"वडिलांनी बादशहा म्हणून पहिला आदेश दिला. माझी आई, (शहाजहान यांच्या पत्नी) यांचा किताब (पदवी) आजपासून 'मुमताज महल' असेल आणि त्यांना 10 लाख रुपये वार्षिक वजीफा (वेतन) दिला जाईल असं ते म्हणाले. बेगम नूरजहानला दोन लाख रुपये वार्षिक वेतन जाहीर करण्यात आलं. आजोबा आसिफ खान वडिलांचे पंतप्रधान बनले होते. त्यांना शाही पोशाख देण्यात आला. महाबत खानला अजमेरची सुभेदारी देण्यात आली. अर्जुन सिंगला सोन्याच्या मोहरा, दागिने आणि घोडे देण्यात आले."

मुघलांच्या दरबाराचं प्रतिकात्मक चित्र

फोटो स्रोत, Getty Images

जहाँआराने एका गोष्टीचा उल्लेख केला नाही. तो म्हणजे त्यांना मिळालेल्या वेतनाचा. कदाचित ही घोषणा त्यादिवशी झालेली नसावी. कारण राज्याभिषेक होताच एका महिन्याच्या उत्सवाची घोषणाही करण्यात आली होती. पण पिता शहाजहान यांनी तिच्यासाठी वर्षाला सहा लाख रुपये वेतन जाहीर केलं होतं. त्यामुळं ती वयाच्या 14 व्या वर्षीच मुघल काळातील सर्वात श्रीमंत राजकुमारी बनली होती.

मुघलांच्या शासन काळादरम्यान अगदी मोजक्या महिलांची नावं समोर आली आहेत. त्यात गुलबदन बेगम, नूरजहान, मुमताज महल, जहान आरा, रोशन आरा आणि झेबुन्निसा यांच्या नावांचा समावेश आहे.

त्यातही दोघी म्हणजे नूरजहान आणि मुमताज महल या राण्या होत्या. तर इतर कुणालाही जहाँआरा प्रमाणे महत्त्व मिळालं नाही. कारण रोशन आरा कधीही पादशाह बेगम बनू शकली नाही.

जहाँ आराच्या आईचं निधन झालं तेव्हा ती अवघ्या 17 वर्षांची होती. तेव्हापासूनच तिच्या खांद्यांवर मुघल साम्राज्याच्या हरमची (शाही कुटुंबातील महिलांचं महालातील ठिकाण) जबाबदारी आली होती. बादशहा शहाजहान पत्नीच्या निधनानं एवढ्या दुःखात होते की, त्यांनी जणू एकांतात राहायला सुरुवात केली होती.

मेहबूब-उर-रेहमान कलीम यांनी त्यांच्या 'जहाँ आरा' या पुस्तकात, ''मुमताज महल यांच्या निधनानंतर बादशहाने शोकप्रसंगी परिधान करण्याचा काळा पोषाख परिधान केला होता,'' असं लिहिलं आहे. तर इतर काही इतिहासकारांच्या मते, त्यांनी अत्यंत साधेपणानं जीवन जगायला सुरुवात केली. ते केवळ पांढरा पोशाख परिधान करायचे. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांच्या दाढीचे केसही पांढरे झाले होते.

जहां आरा

फोटो स्रोत, Ira Mukhoty

शहाजहानने अशा परिस्थितीत दुसऱ्या राणीला जबाबदारी सोपवण्याऐवजी जहाँ आराला पादशहा बेगम (प्रथम महिला) बनवलं आणि तिच्या वार्षिक वेतनात चार लाखांची वाढ केली. त्यामुळं तिचं वार्षिक वेतन दहा लाख झालं होतं.

नूरजहान आणि जहाँआरा या मुघल काळातील दोन महत्त्वाच्या महिला होत्या असं, दिल्लीच्या जामिया मिलियामध्ये इतिहास आणि संस्कृती विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. रोहमा जावेद राशीद यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

त्या मलिका-ए-हिन्दुस्तान तर नव्हत्या, पण आई मुमताज महलच्या मृत्यूनंतर, आयुष्यभर त्या मुघल साम्राज्यातील सर्वात शक्तिशाली महिला ठरल्या. आईच्या मृत्यूनंतर त्यांना पादशाह बेगमचा किताब देण्यात आला आणि हरमची संपूर्ण जबाबदारी या 17 वर्षांच्या तरुणीवर आली.

जगातील सर्वात धनवान महिला

"जहान आरा तिच्या काळातील केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण विश्वातील सर्वात धनवान महिला होती. कारणही तसंच होतं ते म्हणजे तिचे वडील भारताचे सर्वात धनवान बादशहा होते. त्यांच्या काळाला भारताचा सुवर्णकाळ असं म्हटलं गेलं आहे,'' असं राशीद सांगतात.

"पाश्चिमात्य पर्यटक भारतात यायचे तेव्हा त्यांना मुघल महिला एवढ्या प्रभावी असल्याचं पाहून आश्चर्य वाटायचं. याउलट त्याकाळी ब्रिटिश महिलांकडे असे अधिकार नसायचे. महिला व्यापारात सहभागी होत होत्या आणि कशाचा व्यापार करायचा किंवा आणि कशाचा नाही त्याचे आदेश देत होत्या, हे पाहून त्यांना आश्चर्य वाटत होतं,'' असं प्रसिद्ध इतिहासकार आणि 'डॉटर ऑफ द सन' च्या लेखिका एरा मखोती सांगतात.

जहाँआरा यांच्याकडे अनेक ठिकाणच्या सुभेदारी होत्या, त्यावरून त्यांच्या संपत्तीचा अंदाज लावता येऊ शकतो. शहाजहानचा राज्याभिषेक झाला त्यादिवशी, जहाँ आराला एक लाख मोहरा (अशर्फी) आणि चार लाख रुपये देण्यात आले होते. तर सहा लाख वार्षिक वेतन जाहीर केलं होतं.

आईच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीतील अर्धा वाटा जहाँआराला देण्यात आला होता, तर उर्वरित अर्धा इतर मुलांमध्ये वाटप करण्यात आला होता.

अलिगड मुस्लीम विद्यापीठातील इतिहासाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर एम.वसीम राजा यांनी त्यांच्या संपत्तीबाबत माहिती दिली. "जेव्हा त्यांना पादशाह बेगम बनवण्यात आलं होतं, त्यादिवशी त्यांना एक लाख मोहरा, चार लाख रुपये आणि त्याशिवाय वार्षिक वेतनात चार लाखांची वाढ करण्यात आली होती. तिच्याकडे अछल, फरजहरा आणि बाछोल, सफापूर, दोहारा या ठिकाणच्या सुभेदारी आणि पानिपत परगणाही सोपवण्यात आला होता. सूरतचं शहरही देण्यात आलं होतं. त्याठिकाणी तिच्या जहाजांद्वारे इंग्रजांबरोबर व्यापार चालायचा."

"त्याचवर्षी नवरोजच्या निमित्तानं जहाँआराला 20 लाखांचे दागिने आणि हिरे-मोती भेट देण्यात आले होते," असं पंजाब हिस्टॉरिकल सोसायटीसमोर 12 एप्रिल 1913 ला वाचन केलेल्या शोधनिबंधात हैदराबादच्या निजामशाहीतील पुरातत्व संचालक जी. यजदानी यांनी लिहिलं आहे.

जहाँ आरा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एका व्यापाराचं म्हणणं ऐकून घेताना जहाँआरा

''जहाँआराकडे महत्त्वाच्या सोहळ्यांचीही जबाबदारी असायची. बादशहाचा वाढदिवस, नवरोज अशा कार्यक्रमाची प्रमुख कार्यवाहक तीच असाची. वसंत ऋतूमध्ये ईद-ए-गुलाबी चा उत्सव साजरा व्हायचा. त्यावेळी शहजादे (राजकुमार) आणि पदाधिकारी उत्तम हिरेजडीत सुरईतून बादशहाला गुलाबाचा अर्क द्यायचे. एतदाल शबो रोज (म्हणजे जेव्हा दिवस आणि रात्र सारखे असतात) चा उत्सव शुक्रवारी साजरा व्हायचा. जहान आराने 19 मार्च 1637 ला या उत्सवानिमित्त बादशहाला अडीच लाखांचं एक अष्टकोनी सिंहासन भेट दिलं होतं."

या सर्वावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, तिच्याकडे त्यावेळी किती संपत्ती असेल.

आगीत होरपळल्याची घटना

जहाँआराच्या आयुष्यात आगीत होरपळल्याची एक मोठी घटना घडली होती. त्यावेळी ती जवळपास आठ महिने अंथरुणाला खिळून होती. जेव्हा ती पूर्ण बरी झाली त्यावेळी बादशहानं आनंदात खजाना रिता केला होता.

6 एप्रिल 1644 रोजी जेव्हा ती आगीत होरपळली होती, तेव्हा ती बरी होण्यासाठी सार्वजनिक प्रार्थना करण्यात आली होती. रोज गरीबांना पैसे वाटले जायचे तसेच मोठ्या प्रमाणावर कैद्यांनाही सोडण्यात आलं होतं.

जहां आरा

फोटो स्रोत, Hulton Archive

फोटो कॅप्शन, या चित्रात शहाजहानने आपली आजारी पत्नी मुमताज महलना मांडीवर घेतंय. जहाँआराही या चित्रात असण्याची शक्यता आहे.

"बादशहाने तीन दिवसांत 15 हजार मोहरा (अशर्फी) आणि जवळपास तेवढेच रुपये गरीबांना वाटले होते. रोज रात्री एक हजार रुपये जहाँआराच्या उशीखाली ठेवले जायचे. सकाळी ते पैसे गरिबांना वाटले जायचे. घोटाळ्यांच्या आरोपातील कैदेत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोडण्यात आलं आणि त्यांचं 7 लाखांचं कर्ज माफ करण्यात आले," असं अभ्यासक झिया-उद-दीन अहमद यांनी त्यांच्या 'जहां आरा' पुस्तकात मोहम्मद सालेहच्या हवाल्यानं लिहिलं आहे.

तर याबाबत यजदानी लिहितात की, "जहाँआरा बरी झाल्यानंतर आठ दिवस उत्सव साजरा (जश्न) करण्यात आला होता. तिची सुवर्णतुला करण्यात आली आणि ते सोनं गरिबांमध्ये वाटण्यात आलं. पहिल्या दिवशी शहाजहानने राजकुमारीला 130 मोती आणि पाच लाख रुपयांचे कंगन (बांगड्या) भेट दिल्या. दुसऱ्या दिवशी हिरे-मोती असलेला शिरपेच दिला होता. याचवेळी सूरतचं बेटही दिलं. त्यावेळी त्याठिकाणचं वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये होतं."

केवळ जहाँआरालाच नव्हे तर तिच्यावर उपचार करणाऱ्या हकिमांनाही मालामाल करण्यात आलं होतं, असं जी. यजदानी यांनी लिहिलं आहे.

त्यांच्या मते, "हकीम मोहम्मद दाऊदला दोन हजार पायदळ आणि दोनशे घोडदळाचा सरदार बनवण्यात आलं. पोशाख आणि हत्तीसह सोन्याच्या काठीचा एक घोडा, 500 तोळ्याच्या सोन्याच्या मोहरा आणि त्याच वजनाचं त्या सोहळ्यासाठी खास तयार केलेलं नाणंही देण्यात आलं. आरीफ नावाच्या सेवकाला (गुलाम) त्याच्या वजनाएवढं सोनं, पोशाख, घोडे, हत्ती आणि सात हजार रुपये देण्यात आले."

"शहाजहानने लाडक्या लेकीला मोठी सुभेदारी दिली होती. त्याशिवाय लहान सहान कार्यक्रमांमध्ये तिला मिळणाऱ्या बक्षिसांची तर मोजदातच नव्हती. जहान आराला सुभेदारीमध्ये मिळालेल्या भागातील जमीन सुपीक होती.

मलिक सूरत हा समृद्धी असलेला भाग तिला सुभेदारीमध्ये दिला होता. त्यावेळी त्याठिकाणचं वार्षिक उत्पन्न साडेसात लाख रुपये होतं. त्याचबरोबर सूरतचं बेटही देण्यात आलं. तिथं विविध देशांच्या व्यापाऱ्यांची वर्दळ असायची. त्यामुळं कराच्या रुपानं पाच लाख किंवा त्यापेक्षा अधिक रुपये मिळायचे. त्याशिवाय आजमगड, अंबाला असे सुपीक भागही तिच्याकडं होते," असा उल्लेख जहान आराच्या संपत्तीबाबत मेहबूब-उर-रेहमान कलीम यांनी केला आहे.

मात्र, जहाँआरा स्वतःला फकीर म्हणायची. तिला साधेपणा आवडायचा. पडद्याकडं तिचं विशेष लक्ष असायचं. ज्यादिवशी ती भाजली होती, ती नवरोजच्या उत्सवाची रात्र होती (काही जणांनी या रात्रीचा उल्लेख तिचा वाढदिवस असा केला आहे). पण जेव्हा आग लागली तेव्हा तिनं एखादा पुरुष वाचवायला येऊ नये म्हणून फार आरडाओरडाही केला नाही. ती धावत महिलांच्या कक्षात गेली आणि बेशुद्ध झाली, असं अनेक इतिहास अभ्यासकांच्या हवाल्यानं डॉक्टर रोहमा यांनी म्हटलं आहे.

तिला लागलेली आग विझवताना दोन दासीदेखील जखमी झाल्या होत्या. त्यापैकी एकीचा मृत्यू झाला. जहाँआरा भाजल्यामुळं महालामध्ये दुःखाचं वातावरण पसरलं होतं.

महालाचं जग, महिलांचं जग

जहाँआराच्या डायरीतील उल्लेखातून तिला एक मोठी सावत्र बहीण होती, हे समजतं. पण शहाजहानला इतर सर्व मुलं अर्जुमंद आरा म्हणजे मुमताज महल यांच्याकडून झाली होती.

महालाचा उल्लेख करताना, जहाँआरानं लिहिलं आहे की, "महालाच्या आत महिलांचं जग आहे. राजकुमारी, राण्या, दासी, मोलकरणी, स्वयंपाक करणाऱ्या, गायिका, नर्तिका, चित्रकार यांचं जग. दासी परिस्थितीवर नजर ठेवतात आणि त्याच बादशहाला याबाबत माहिती देत असतात.''

"काही महिला शाही कुटुंबांमधून विवाह करून आलेल्या आहेत. काही सौदर्यामुळं राजकुमारांना आवडल्यानं त्यांना हरममध्ये आणण्यात आलं आहे, अनेकींचा जन्मच हरमच्या चार भिंतींच्या आत झाला आहे. काही महिलांच्या मते तुम्ही एकदा हरममध्ये प्रवेश केला की, कुणीही तुमचा चेहरा पाहू शकत नाही. तुम्ही जणू गायबच होतात आणि काही दिवसांनी तुमचे कुटुंबीयदेखील चेहरा विसरुन जातात."

मात्र, जहाँआराचं रुप आणि व्यक्तिमत्व मुघल इतिहासाला विसरणं शक्य नाही. तिच्या सौंदर्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. जहाँ आरा स्वतः सांगते की, एक दिवस तिला आळस आला होता तेव्हा तिची आई तिच्यावर ओरडली आणि म्हणाली, उठ आणि काहीतरी कर, धोबीणीसारखी काय घाणेरडी पडून आहेस. त्यावर वडील शहाजहान म्हणाले होते की, "जर ही धोबीण असेल तर जगातील सर्वात सुंदर धोबीण असेल."

जहाँआराने एकाठिकाणी नूरजहान आणि तिच्या आईच्या सौंदर्याची तुलना करताना असं लिहिलं आहे की, नूरजहान उंची आणि चेहऱ्याच्या लांबीमुळं आईपेक्षा अधिक सुंदर आणि आकर्षक दिसत होती. पण आईदेखील एखाद्या उमलत असलेल्या फुलाप्रमाणे सुंदर होती.

"जहाँ आरा ही मुघल वंशामधली रुप आणि व्यक्तिमत्वाचा विचार करता सर्वोत्तम बेगम होती," असा उल्लेख मेहबूब-उर-रेहमान कलीम यांनी केला आहे.

इनेक इतिहास अभ्यासकांनी रोशन आरा ही त्याकाळी सौंदर्यासाठी प्रसिद्ध होती असं म्हटलं आहे. पण डॉक्टर बर्नियर यांनी असं लिहिलंय की, "रोशन आरा बेगम खूप सुंदर आहे, पण जहान आराचं सौंदर्य हे तिच्यापेक्षा खूप जास्त आहे."

जहाँआराचं स्थान मोठं होतं. तिचा स्वतंत्र महाल होता त्याठिकाणी ती राहत होती.

"जहाँआराचा महाल शहाजहानच्या महालाला लागूनच तयार करण्यात आला होता. हा आकर्षक आणि आलिशान महाल आरामखोली असलेला आणि अत्यंत आकर्षक चित्रांनी सजवलेला होता.

त्याच्या भिंती आणि दारांवर अत्यंत उच्च दर्जाचं काम केलेलं होतं. ठिकठिकाणी मौल्यवान हिरे, मोती यांची सजावट होती. अंगणात यमुनेच्या काठावर दोन आणखी कक्ष होते. तेही अत्यंत खास पद्धतीनं सजवलेले होते. या तीन मजली इमारतीवर सुवर्णकाम करण्यात आलं होतं,'' असं वर्णन अनुवादक आणि इतिहासकार मौलवी झकाउल्लाह देहलवी यांनी 'शाहजहाँ नामा' मध्ये केलं आहे.

सुफीवादाची ओढ

डॉक्टर रोहमा यांच्या मते, जहाँआरा तारुण्यात असतानाच सुफीवादाकडं आकर्षित झाली होती. पण आगीत होरपळल्याच्या घटनेनंतर तिचं जीवनमान हे आणखीच साधं बनलं होतं.

मात्र, त्यापूर्वी ती अत्यंत शाही पद्धतीनंच जीवन जगली, असं मेहबूब-उर-रेहमान यांनी लिहिलं आहे. ती बाहेर निघाली की तिचा ताफा अत्यंत मोठा आणि रुबाबदार असायचा. ती शक्यतो जूडोल (सिंहासनासारखी पालखी) मधून जायची. त्याच्या सर्व बाजूने रेशमी पडदे असायचे. त्याला जरीची झालर आणि सुंदर सजावट असायची. त्यामुळं तिचं सौंदर्य आणखी वाढायचं, असं त्यांनी डॉक्टर बर्नियर यांच्या हवाल्यानं लिहिलं आहे.

'कधी-कधी जहाँआराची स्वारी एका लांब आणि सुंदर हत्तीवर निघायची. पण ती पडद्याचं काटेकोरपणे पालन करायची. ती नेहमी मन रमवण्यासाठी सैर बागला जायची. त्याशिवाय ती अनेकदा शहाजहान बरोबर दक्षिण, पंजाब, काश्मीर आणि काबूललाही गेली होती. पण प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक परिस्थितीत तिनं पडद्याची काळजी घेतली. केवळ तीच नव्हे तर मुघलांच्या वंशातील सर्वच बेगम आणि महिला पडद्याबाबत काळजी घ्यायच्या.'

"या बेगम किंवा महिलांजवळ जाणं कुणालाही शक्य नव्हतं. त्यांचा चेहरा दिसणंही जवळपास अशक्य होते. या महिलांच्या स्वारीकडे जाण्याची परवानगी स्वारीडी जबाबदारी असलेल्या शिपायांशिवाय कुणालाही नसायची. कारण तसं केल्यासं व्यक्ती कितीही मोठ्या पदावरील असला तरी, त्याला किन्नरांच्या हातून फटके दिले जात होते,'' असं पर्यटक आणि इतिहास अभ्यासक बर्नियर सांगतात.

डॉक्टर रोहमा यांच्या मते, इतिहासामध्ये जहाँ आराच्या भाजल्याच्या घटनेची माहिती आहे. पण मुघल साम्राज्यातील एवढी शक्तिशाली महिला असूनही तिच्या, इतर कामांबाबत मात्र उल्लेख आढळत नाही.

जहाँआराकडं असलेलं ज्ञान, मैत्री, सुफीवादाची ओढ, औदार्य, दरबारातील रणनिती, बागकाम आणि वास्तुकलेची आवड यातून तिच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाची माहिती मिळते.

जहाँआराने दोन पुस्तकं लिहिली आहेत. ती दोन्ही फारशी भाषेमध्ये आहेत. 12 व्या आणि 13 व्या शतकातील सुफी हजरत मोइनुद्दीन चिश्ती यांच्यावर 'मोनिस अल-अरवाह' नावानं एक पुस्तक तिनं लिहिलं आहे.

सुफी आणि संतांच्या विषयामध्ये तिला प्रचंड रस होता. जीवनाच्या सुरुवातीच्या काळातच ती, त्यांच्याविषयी जाणून घेत होती. सुरुवातीला भाऊ दारा आणि नंतर वडिलांबरोबर ती याविषयावर चर्चा करायची.

तिनं असं लिहलं आहे की, एकदा जेव्हा ती दाराबरोबर पुस्तक परत करण्याच्या बहाण्यानं, नूरजहानला भेटायला गेली होती. तेव्हा नूरजहाननं तिला जी पुस्तकं दिली होती, त्यांची नावं तिच्या लक्षात आहे, याचं जहाँआराला आश्चर्य वाटलं होतं.

नूरजहानने विचारलं की, तिला फैजीचं पुस्तक आवडलं की, हारून रशीदच्या गोष्टी. जहाँआराने हारून रशीदच्या गोष्टी असं उत्तर दिलं. त्यावर नूरजहान म्हणाली की, तिला हळू हळू शायरीमध्ये आवड निर्माण होईल.

जहाँआराचं शिक्षण घरातच झालं होतं. तिच्या आईची मैत्रीण सती अल-निसा बेगमने (सदर अल-निसा नावानेही तिला ओळखलं जातं) तिला शिकवलं. सती अल-निसा बेगम शिक्षित कुटुंबातील होती आणि तिचा भाऊ तालीब आमली याला जहांगीरच्या काळात मलिकुश्शुअरा (राष्ट्रकवी) किताबानं गौरवण्यात आलं होतं.

जहाँआरा काही काळ दक्षिणेत होती, त्यावेळी तिला शिकवण्यासाठी दुसरी एक महिला शिक्षिका येत होती. तिचं दुसरं पुस्तक 16 व्या आणि 17 व्या शतकातील सुफी मुल्ला शाह बदख्शी यांच्यावरील 'रिसाला साहिबिया' हे आहे.

''जहाँआरा महिला नसती तर तिनं मुल्ला शाह बदख्शी यांना वारसदार घोषित केलं असतं, एवढा त्यांचा तिच्यावर प्रभाव होता,'' असं डॉक्टर रोहमा सांगतात.

जहाँआराला औपचारिकरित्या शिष्य बनलेली आणि गुरू (पीर) च्या आदेशानुसार जीवन जगलेली पहिली मुघल महिला असल्याचा गर्व होता.

जहाँआरानं त्यावेळच्या शाहजहानाबाद म्हणजे दिल्लीचा नकाशा तिच्या देखरेखीत तयार केला होता, असंही म्हटलं जातं. काही अभ्यासकांमध्ये याबाबात मतभेद आहेत. पण ''चांदनी चौक'' बाबत कोणालाही आक्षेप नाही. हा बाजार तिच्या चांगल्या आवडीची आणि शहराच्या गरजांची माहिती असण्याची ओळख आहे.

जहाँआराने केलेली कामं

याशिवाय जहाँआराने अनेक मशिदी तयार केल्या. अजमेरमध्ये हजरत मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्गाहवर एक बारादरी (बारा द्वार असलेला महाल) देखील तयार केला.

चांदनी चौक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दिल्लीतल्या चांदनी चौक भागाचा फोटो

ती जेव्हा याठिकाणी आली तेव्हा तिला बारादरी तयार करण्याचा विचार आला. त्याचवेळी तिनं सेवा म्हणून तो तयार करण्याचा निर्णय घेतला. तसंच अनेक बागांही तयार केल्या, असं डॉक्टर रोहमा सांगतात.

आगऱ्याच्या जामा मशिदीबाबत एक खास बाब म्हणजे, याठिकाणी प्रार्थना करण्यासाठी महिलांसाठी एक खोली आहे, असं डॉक्टर रोहमा सांगतात.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, मुख्य द्वारावर फारशी भाषेतील एक शिलालेख आहे. त्यात, एखाद्या मुघल बादशहाप्रमाणे जहान आराच्या अध्यात्मिक आणि पवित्रतेची स्तुती करण्यात आली आहे.

"जहाँआरा महिलांसाठी सार्वजनिक स्थळं बनवणारी पहिली मुघल राजकुमारी आहे. तिनं दिल्लीला लागून असलेल्या यमुना नदीच्या पलिकडे साहिबाबादमध्ये बेगम का बाग (जमिनीच्या खाली तळघराप्रमाणे असलेलं खास ठिकाण) तयार केलं होतं,'' असंही रोहमा सांगतात.

यात महिलांसाठीचा भाग आरक्षित होता. तसंच महिलांना मोकळेपणानं जाऊन फिरता यावं यासाठी दिवसही ठरवलेले होते.

मुघल काळातील महिला अनेक गुण असूनही इतिहासातून बेपत्ता झाल्या. विशेषतः अकबराच्या काळापासून अधिक जाणीवपूर्वक ते करण्यात आलं. अगदी महिलांची नावंही समोर येऊ दिली जात नव्हती, असं डॉक्टर रोहमा सांगतात.

याची जाणीव कदाचित जहाँआरालाही होती. त्यामुळंच जेव्हा ती पणजी म्हणजे जहांगीरची आई आणि अकबराच्या पत्नीचा उल्लेख करते, तेव्हा तिनं ती एका हिंदू कुटुंबातील होती, असा उल्लेख केला आहे.

तिचं खरं नाव काय आहे हे मला माहिती नाही. पण तिच्या पदवीनं आम्ही तिला ओळखतो. त्या हरममधील सर्वात प्रतिष्ठित महिला आहेत, असंही तिनं म्हटलं आहे.

त्यामुळं इतिहासात बेगमची बाग, बेगमचा महाल, बेगमची न्हाणी अशी नावं आपल्याला आढळतात. अजमेरमधील ''बेगम का दालान'' देखील याचाच एक भाग आहे असं रोहमा म्हणतात.

"बादशहा जिथं-जिथं स्वतःची छाप सोडत होते तिथं जहान आराही तिची छाप सोडत होती. मग अजमेर असेल, आगरा असेल किंवा दिल्ली."

जहाँआरा काश्मीरचे सुफी संत मुल्ला बदख्शी यांची अनुयायी होती. कादरियाबरोबरच चिश्तींवर तिचा विश्वास होता. तिच्या कुटुंबानं कादरी संप्रदायाशी संबंध जोडावे अशी तिची इच्छा होती, असं डॉक्टर एम. वसीम राजा यांनी सांगितलं.

जहाँआराचं राजकारण

जहाँआराने महालामध्ये नूरजहानला पाहिलं तेव्हा तिला राजकारणाबाबत जाणीव झाली. नूरजहानचा तिच्यावर प्रभाव पडला होता.

जहाँआराने असं सांगितलं आहे की, नूरजहान जेव्हा सदरेमध्ये बसली होती, तेव्हा तिनं विचारलं 'तुम्ही हे सर्व वाचणार का? हे तर खूप जास्त आहे.' त्यावर नूरजहानने उत्तर दिलं, 'आम्ही रोज एवढं वाचतो. वाचलं नाही तर राज्यात काय घडतंय हे कसं कळेल. मी सर्व काही वाचावं आणि काही चुकीचं असेल तर सांगावं असा बादशहांचा आदेश आहे.'

दारा आणि मी उत्साहात आणखी थोडं पुढं सरकलो. दाराला विचारलं की, यात काय चुकीचं असू शकतं, तेव्हा त्यांनी माझ्याकडं पाहत म्हटलं, 'राज्य कारभार नेमका कसा चालतो, हे शिकायची तुझी वेळ आली आहे.'

त्यांनी एक पत्र उचललं, त्यात बंगालच्या गव्हर्नरचा अहवाल होता. त्यात लिहिलं होतं की, दुष्काळामुळं अनेक भागांत शेतकऱ्यांकडून कर वसूल केला जात नाही. पण, त्यात चूक काय असं मला वाटत होतं.

"त्यांनी दुसरं एक पत्र उचललं. ते बंगालमधील आमच्या हेराचं होतं. त्यात म्हटलं होतं की, गव्हर्नरने कर गोळा केला आहे, पण दुष्काळाचं कारण देत, हा निधी गव्हर्नरला स्वतःकडेच ठेवायचा आहे."

यापूर्वी जहाँआराने हेही सांगितलं की, नूरजहानकडे शाही शिक्का (मुद्रा) असायचा. ती ज्या कागदावर तो उमटवेल तो कागद म्हणजे बादशहांचा आदेश बनायचा.

त्यामुळंच आईच्या मृत्यूनंतर जहाँआराचं पद एवढं मोठं झालेलं पाहायला मिळतं की, तिला शाही शिक्काही देण्यात आला होता.

"इसवीसन 1631-32 मध्ये जेव्हा यमीनुद्दौला आसीफ खान, मोहम्मद आदिल खानच्या वसुलीसाठी बाला घाटच्या मोहिमेवर गेला तेव्हा त्याने जाण्यापूर्वी शाही शिक्का बादशहाला सादर केला. त्यानंतर जोपर्यंत पंतप्रधान आले नाही, तोपर्यंत जहाँआराकडे तो शिक्का होता. तीच आदेशांवर शिक्के मारत होती." असं, बादशाहनामाच्या हवाल्यानं जिया-उद-दीन अहमद यांनी लिहिलं आहे.

नूर जहाननंतर तिनं तिच्या आईलाही हे काम करताना पाहिलं होतं. पण वयाच्या 17-18 व्या वर्षी एवढी महत्त्वाची जबाबदारी म्हणजे पंतप्रधान पदासारखीच होती.

जहाँआरा राजकुमार दारा याची समर्थक होती. तरीही औरंगजेबच्या नजरेत तिच्याबाबतचा आदर कमी झाला नाही.

जहां आरा

फोटो स्रोत, Wikipedia

बहीण रोशन आरा मात्र नेहमी तिच्याबद्दल इर्षेनं पेटलेली असायची. ती नेहमी औरंगजेबकडे जाऊन तिच्या चुगल्या करायची. जेव्हा त्यांचे पिता शहाजहानचं निधनं झालं, तेव्हा त्यांनी जहान आराला जवळ बोलावलं आणि तिला पुन्हा पादशाह बेगमचा किताब दिला. त्यामुळं रोशन आरा आणखी संतापली. पण 1681 मध्ये मृत्यू होईपर्यंत हा किताब जहान आराकडेच राहिला.

जहाँआरा जेव्हा आजारी पडली आणि मृत्यूशय्येवर पोहोचली तेव्हा तिनं तिची कबर सुफी संत हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या दर्गाहजवळ असावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर लिहिण्यासाठीचा शेरही सांगितला, आजही लिहिलेला तो शेर पुढील प्रमाणे आहे...

बग़ैर सब्ज़ा न पोशद किसे मज़ार मिरा

कि क़ब्र पोश ग़रीबां हमीं गयाह वो बस अस्त

म्हणजेच, माझी कबर (थडगं) सब्जाशिवाय दुसरी कशानेही झाकू नका, कारण गरिबांच्या कबरीसाठी हे गवतच पुरेसं आहे.

अशाप्रकारे स्वतःला गरीब म्हणणाऱ्या मुघल साम्राज्याच्या सर्वात धनवान राजकुमारीनं कोणत्याही मकबऱ्याविनात या जगाचा निरोप घेतला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)