You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मिल्खा सिंग यांचं निधन, फरहान अख्तर यांची भावूक पोस्ट
भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचं चंदिगडमधील रुग्णालयात निधन झालं आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती गंभीर झाली होती.
कोरोनाची लागण झाल्यानंतर 91 वर्षीय मिल्खा सिंग यांना चंदिगडच्या पीजीआयएमईआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्याठिकाणी शुक्रवारी सायंकाळी त्यांच्यी प्रकृती अधिक ढासळसी. त्यानंतर डॉक्टरांनी अनेक प्रयत्न करूनही त्यांना वाचवण्यामध्ये यश आलं नाही.
चंदिगडमध्ये बीबीसीचे सहयोगी पत्रकार रविंदर सिंग रॉबिन यांना रुग्णालयाचे प्रवक्ते अशोक कुमार यांनी, मिल्खा सिंग यांचं निधन रात्री 11.30 वाजता झालं असल्याचं सांगितलं आहे.
मिल्खा सिंग यांना 20 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 3 जून रोजी त्यांना पीजीआयएमईआरच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. 13 जून पर्यंत ते याठिकाणी दाखल होते.
त्यादरम्यान त्यांनी कोरोनावर मात केली होती. 13 जून रोजी कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही, कोरोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या इतर काही समस्यांमुळं त्यांना पुन्हा आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांच्या पथकानं अनेक प्रयत्न केल्यानंतरही त्यांना वाचवता आलं नाही.
पाच दिवसांपूर्वीच मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचंही कोरोनामुळं निधन झालंय.
फ्लाइंग शीख नावाने प्रसिद्ध
फ्लाइंग शीख अशी ओळख असलेले मिल्खा सिंग हे भारताचे एकमेव असे धावपटू होते, ज्यांनी 400 मीटरच्या शर्यतीमध्ये आशियाई स्पर्धांसह राष्ट्रकुल स्पर्धांमध्येही (कॉमनवेल्थ) सुवर्ण पदक जिंकलं होतं. 1958 च्या टोकियो इथं झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये मिल्खा सिंग यांनी 200 मीटर आणि 400 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर 1962 च्या जकार्ता आशियाई स्पर्धांमध्ये 400 मीटर आणि 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीतही सुवर्ण पदक जिंकलं होतं.
1958 मधील कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटर (तेव्हाचे 440 यार्ड) शर्यतीत गोल्ड मेडल मिळवलं होतं. पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली 1960 च्या रोम ओलिम्पिक स्पर्धेमुळे. त्या स्पर्धेत 400 मीटरच्या शर्यतीत अगदीच सूक्ष्म फरकानं त्यांचं कांस्यपदक चुकलं होतं.
रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटर शर्यत 45.73 सेकंदांमध्ये पूर्ण केली होती. जर्मनीचा धावपटू कार्ल कूफमॅनपेक्षा ते सेकंदाच्या 100 व्या भाग एवढ्या कमी फरकानं मागं राहिले होते. पण त्यांनी शर्यत पूर्ण केलेली ही वेळ त्यानंतर पुढचे 40 वर्षं राष्ट्रीय विक्रम म्हणून कायम होती.
भारतीय क्रीडा विश्वातील महान नावांपैकी एक असलेल्या मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याबरोबरचा एक फोटो ट्विट केला आहे, त्यात त्यांनी मिल्खा सिंग हे असंख्य भारतीय चाहत्यांच्या मनात कायम राहतील असं म्हटलं आहे.
"श्री मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे आपण एक महान क्रीडापटू गमावला आहे. असंख्य चाहत्यांच्या मनात त्यांच्यासाठी खास स्थान होतं. त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वानं अनेकांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या निधनानं मोठं दु:ख झालं," असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.
फरहान अख्तरची भावूक पोस्ट
मिल्खा यांच्या जीवनावर आधारित 'भाग मिल्खा भाग' चित्रपटामध्ये मिल्खा सिंग यांची भूमिका साकारणारे अभिनेता फरहान अख्तर यांनीही एक भावूक पोस्ट केली आहे.
"अत्यंत प्रिय मिल्खा जी, मला अजूनही विश्वास बसत नाही की तुम्ही आता आमच्यात नाही. कदाचित तुमच्यामध्ये असलेली जिद्दच माझ्यामध्येही भिनली आहे... ही एक अशी गोष्ट आहे जी एकदा मनात ठाम झाली की कधीही मागं वळून पाहण्याचा विचारही येत नाही. सत्य हेच आहे की, तुम्ही कायम आमच्यामध्ये असाल. कारण तुम्ही, मोठ्या मनाचे, प्रेमळ, संवेदनशील आणि कायम पाय जमिनीवर असलेले व्यक्ती होते. तुम्ही एक विचार होते," अशी पोस्ट फरहान यांनी लिहिली आहे.
"प्रचंड परिश्रम, प्रामाणिकपणा आणि निष्ठेनं आकाशाएवढं उंच कसं व्हावं, याचं सर्वोत्तम उदाहरण तुम्ही आहात. तुम्ही आम्हा सर्वांच्याच जीवनावर प्रभाव टाकलाच आहे. पण, जे तुम्हाला पिता आणि मित्र म्हणून ओळखत होते, त्यांच्यासाठी तो आशिर्वाद ठरला. जे लोक तुम्हाला ओळखत नव्हते त्यांच्यासाठीही तुम्ही प्रेरणादायी होतात आणि यश मिळाल्यानंतरही नम्र कसं राहावं हे शिकवणारे होतात. मी मनापासून तुमच्यावर प्रेम करतो."
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्वीट करून संवेदना व्यक्त केल्या आहेत.
ते लिहितात, "मिल्खा सिंग हे केवळ क्रीडा क्षेत्रातील महान व्यक्ती नव्हते, तर ते लाखो भारतीयांसाठी प्रेरणेचा स्त्रोत होते. त्यांच्या कुटुंबीय आणि मित्र परिवारांप्रती माझ्या संवेदना आहेत."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)