कोरोना व्हायरस : भारतात तिसऱ्या लाटेची शक्यता, केंद्र सरकारचा राज्यांना इशारा

    • Author, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथीलता देताना राज्य सरकारांनी खूपच जास्त सावधगिरी बाळगावी, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.

गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य सरकारांना पत्र लिहून काही महत्त्वपूर्ण गोष्टींवर चर्चा केली. राज्य सरकारांनी कोरोना रुग्णसंख्य वाढण्याच्या स्थितीबाबत सुसज्ज राहायला हवं, असं भल्ला यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशातील विविध राज्य सरकारांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये शिथीलता आणली जात असून रस्त्यांवरील वाहतूकही आता वाढताना दिसत आहे.

पण, आता केंद्र सरकारने दिलेल्या या सूचनेनंतर राज्य सरकार काय पावलं उचलतील, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे, निर्बंधात सवलती दिल्यानंतर रस्त्यावर दिसत असलेल्या गर्दीवरून ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी नाराजी दर्शवली. आपण परिस्थितीतून धडा घेतला नाही तर पुढील सहा ते सात आठवड्यांत देशात कोरोनाची तिसरी लाट पाहायला मिळू शकते, असा इशारा त्यांनी दिला.

महाराष्ट्रात तिसरी लाट महिन्याभरात येणार का?

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट जाऊन अजून अनलॉक प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. 2 ते 4 आठवड्यात तिसरी लाट धडकू शकते अशा बातम्यांनी तर या काळजीत आणखीनच भर घातलीये. पण नेमकं खरं काय आहे? तिसरी लाट खरंच येणार आहे का? आणि आली तर कधी येऊ शकते? लहान मुलांना याचा धोका जास्त आहे की कमी?

भारतात कोरोनाच्या दोन्ही लाटांचा सर्वाधिक फटका बसला महाराष्ट्राला. दोन्ही वेळा राज्यात रुग्णसंख्येचे उच्चांक नोंदवले गेले. आता कोव्हिडनंतर हळुहळू अनलॉक होत असताना तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तयारी सुरू केली गेलीये.

16 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या कोव्हिड टास्क फोर्सची बैठक घेतली. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रानं काय केलं पाहिजे याचा एक आराखडा या बैठकीत आखण्यात आला. पण याच बैठकीत डॉक्टरांनी महिन्या-दोन महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली. आणि त्यामुळेच सुरु झाली चर्चा ती म्हणजे नेमका महाराष्ट्राला धोका किती आहे?

मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी अशी भीती व्यक्त केली की गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाहीत तर दुसऱ्या लाटेतून सावरता सावरता आपण महिन्या-दोन महिन्यात तिसऱ्या लाटेलाही सामोरे जाऊ. महिनाभरात तिसरी लाट येणार या शक्यतेचा साहजिकच अनेकांनी धसका घेतला.

पण याबद्दल स्पष्टीकरण देताना कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी माध्यमांना सांगितलं, 'आम्ही लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. गणितीय मॉडेल सांगतोय की दोन लाटांमध्ये 100 ते 120 दिवसांचं अंतर असतं. अमेरिकेत हे अंतर 14 ते 15 आठवडे इतकं होतं, पण युकेमध्ये पुढची लाट 8 आठवड्यांपेक्षा कमी काळात आली. लाट लवकर आलीच तर आपण तयार असलं पाहिजे यादृष्टीने सर्व चर्चा सुरू होती.'

डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे महाराष्ट्रात तिसरी लाट?

कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेचं गणितीय अनुमान काहीही असलं तरी प्रत्यक्षात काय घडतंय. नियमांचं आणि निर्बंधांचं पालन किती केलं जातंय यावर बरंच काही अवलंबून असेल असं डॉक्टर सांगतायत. पण त्याचबरोबर डेल्टा प्लस व्हेरियंटबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आता हा व्हेरियंट काय आहे आणि त्याबद्दल इतकी चिंता का व्यक्त केली जातेय?

भारतात कोरोनाचं जे म्युटेशन सापडलं आणि ज्याचा दुसरी लाट येण्यात मुख्यत्वे हात होता त्या व्हेरियंटला WHO ने डेल्टा व्हेरियंट असं नाव दिलंय. पण आता त्या व्हेरियंटमध्येही म्युटेशन झालंय आणि डेल्टा प्लस असा व्हेरियंट तयार झालाय. म्हणजे म्युटेशनमध्ये म्युटेशन. हे म्युटेशन स्पाईक प्रोटीनमध्ये झालंय.

हा व्हेरियंट मार्च महिन्यापासूनच होता पण तो 'Variant of Concern' म्हणजे काळजी करण्याजोगा व्हेरियंट अद्याप नसल्याचं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय. हा व्हेरियंटमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये आणि युकेमध्येही आढळलाय. युकेमधल्या 6% टक्के कोव्हिड रुग्णांना या व्हेरियंटचा संसर्ग झालाय. त्यातल्या दोन लोकांचे लशीचे दोन्ही डोस घेऊन झाल्यानंतर 14 दिवस उलटूनही त्यांना संसर्ग झाला - याला ब्रेकथ्रू इन्फेक्शन म्हटलं जातं.

या व्हेरियंटवर मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल काम करत नाही अशी माहिती पुढे येतेय पण त्याचा अर्थ हा खूप जास्त गंभीर व्हेरियंट आहे असा घेता येत नाही असंही तज्ज्ञ म्हणतायत. कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या भारतीय लशी डेल्टा व्हेरियंटवर किती प्रभावी ठरतात याबद्दल मतमतांतरं आहेत, डेल्टा प्लसवरची त्यांची परिणामकारकता तपासण्यासाठी अजून काही काळ आणि संशोधन गरजेचं आहे.

या व्हेरियंटबद्दल साथरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणतात, 'आपण जिनोम सिक्वेन्सिंग करत राहावं, डेल्टा प्लस व्हेरियंटवर लक्ष ठेवावं. पुढे जाऊन आणखी व्हेरियंट्स येण्याची शक्यता आहे, त्यामुळे सगळ्याच राज्य सरकारांनी तयारी करणं गरजेचं आहे. सध्या तरी अतिरिक्त चिंता करण्याची गरज नाही.'

तिसरी लाट किती गंभीर असेल?

महाराष्ट्रातल्या पहिल्या लाटेत 19 लाख रुग्ण होते, दुसऱ्या लाटेत ही संख्या 40 लाखापेक्षा जास्त झाली होती. यावेळी सक्रीय रुग्णांची संख्या 8 लाख होऊ शकते आणि एकूण रुग्णांपैकी साधारण 8-10 टक्के लहान मुलं असू शकतात असं राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितलं आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि AIIMS यांनी चार राज्यांमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणाचे मध्यावधी निकाल नुकतेच हाती आले आहेत. लहान मुलांना तिसऱ्या लाटेचा जास्त फटका बसण्याची शक्यता यात नाकारली गेलीय. सिरो सर्व्हेतून लहान मुलांमध्ये आढळलेलं अँटीबॉडींच्या प्रमाणाची मोठ्यांशी तुलना केल्यानंतर तिसरी लाट लहान मुलांसाठी जास्त धोकादायक ठरेल असं वाटत नसल्याचं या अहवालात म्हटलंय.

तिसऱ्या लाटेची शक्यता कायम आहे, ती नेमकी कधी येईल याचे वेगवेगळे आडाखे बांधले जातायत. पण आपण जर आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेऊन संसर्गाची साखळी तोडू शकलो तर ती लाट अधिक दूर लोटता येईल याबद्दल मात्र एकमत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)