You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस: कोव्हिडमधून बरं झाल्यानंतर लशीचा एकच डोस पुरेसा आहे का?
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
देशात लशींचा तुटवडा असतानाच कोरोनाच्या लशीचा एक डोस पुरेसा असू शकतो, अशी बातमी तुम्ही ऐकली तर साहजिकच तुमचं लक्ष त्याकडे वेधलं जाईल. अशीच बातमी उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून आली आहे.
उत्तर प्रदेशच्या बनारस हिंदू विश्वविद्यालयातील (बीएचयू) प्राध्यापकांनी केलेल्या एका संशोधनात, कोव्हिडमधून बरे झालेल्या लोकांसाठी लशीचा एकच डोस पुरेसा आहे, असा दावा केलाय.
या संशोधनाविषयी विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिलं आहे.
जे लोक कोव्हिडमधून बरे झाले आहेत, त्यांना लशीचा केवळ एकच डोस देण्यात यावा, असा सल्ला त्यांनी आपल्या शोधाच्या निष्कर्षानुसार सरकारला दिला आहे.
असं केल्यानं लशीचे 2 कोटी डोस वाचवले जाऊ शकतात, असा त्यांचा तर्क आहे. भारतात कोव्हिडमधून बरे झालेल्यांची संख्या 2 कोटींहून अधिक आहे. देशात लशींची कमतरता जाणवत असतानाच या बातमीनं लोकांचं लक्ष वेधून घेतलंय.
दरम्यान, कोरोनाविरोधातल्या लशीचं शेड्युल हे दोन डोसचं आहे, यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केलं आहे.
"लसीकरण कार्यक्रम दोन डोसचा आहे. यात कोणताही गैरसमज नको. आम्ही सर्वांनी दोन डोस घेतले आहेत. काही गैरसमज असतील तर ते दूर केले पाहिजेत," असं डॉ. पॉल यांनी म्हटलं आहे.
बीएचयूमधील संशोधन
बीएचयूमधील न्युरोलॉजी विभागातील दोन प्राध्यापक विजयनाथ मिश्रा आणि अभिषेक पाठक तर मॉलिक्यूलर अॅंथ्रोपोलॉजी विभागाचे प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे यांनी कोरोनातून बरे झालेल्या 20 लोकांवर हे संशोधन केलं आहे.
यात त्यांच्या लक्षात आलं की, कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस जे लोक कोरोनातून बरे झाले अशा व्यक्तींच्या शरीरात पहिल्या 10 दिवसांत पुरेशा प्रमाणात अँटिबॉडी तयार करतात.
तर कोरोना लशीचा पहिला डोस कोरोनाची लागण न झालेल्या लोकांमध्ये इतक्या प्रमाणात अँटिबॉडी तयार करत नाही.
पण केवळ 20 लोकांवर केलेल्या अभ्यासाच्या आधारावर अशा पद्धतीचा सल्ला पंतप्रधानांना देणं किती योग्य आहे?
या प्रश्नावर उत्तर देताना प्राध्यापक चौबे यांनी बीबीसीला सांगितलं, "जगातल्या इतर देशांत अशाप्रकारचा अभ्यास झाला आहे. अमेरिकेत mRNA लशीवर अशा पद्धतीचं संशोधन झालं आहे आणि त्यांचा निष्कर्ष आमच्या संशोधनाच्या निष्कर्षांसारखाच आहे. यामुळे आमच्या संशोधनात ताकद आहे हे स्पष्ट होतं. आम्ही केवळ सल्ला दिलाय."
"भारत सरकारकडे संसाधनाची कमतरता नाहीये. आमच्या शोधाचा निष्कर्ष आणि परदेशात झालेल्या अभ्यासाचा निष्कर्ष या आधारे केंद्र सरकार या दिशेने स्वत: डेटा जमा करू शकतं. यासाठी जास्तीत जास्त एक महिना लागेल.
"उत्तर भारतातील लोकांवर फेब्रुवारी महिन्यात हा अभ्यास करण्यात आला होता. या लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोव्हिशील्ड लस देण्यात आली होती. आता कोव्हॅक्सिनवरही असंच संशोधन आम्ही करत आहोत," असं चौबे पुढे सांगतात.
यामागे काही शास्त्रीय आधार आहे का?
मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधील कम्युनिटी मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ. सुनिला गर्ग यांच्या मते, "शास्त्रीय आधाराचा विचार केला तर या संशोधनात जे निष्कर्ष समोर आले ते शक्य असू शकतात. एकदा एखाद्या आजाराचा संसर्ग झाला तर पुढच्या वेळेस तोच आजार झाला तर त्याचा सामना कसा करायचा हे शरीरातील मेमरी सेल्स लक्षात ठेवतात.
"कोरोना संसर्गानंतर शरीरात विषाणूविरुद्ध अँटिबॉडी बनायला लागतात आणि त्याचा सामना करण्यासाठी मेमरी सेल्स ट्रेन होतात. याचा अर्थ ज्यांना कोरोना झाला आहे त्यांना एकप्रकारे लशीचा पहिला डोस मिळाला असं समजायचं."
पण डॉ. सुनिला पुढे हेही सांगतात, "काही लशी या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटविरोधातही प्रभावी असल्याचं सिद्ध होत आहेत. कोरोना एकदा झाल्यानंतर दुसऱ्या व्हेरिएंटचा संसर्ग होण्याचा धोका कमी असला तरी तो असतोच. त्यामुळे भारत सरकारच्या दोन डोस घ्या, या मार्गदर्शक तत्वांचं पालन करणं योग्य आहे."
डॉ. सुनीला या केंद्र सरकारच्या कोव्हिड-19 टास्क फोर्सच्या सदस्य आहेत.
भारत सरकारचं म्हणणं काय?
बीएचयूच्या प्राध्यापकांनी आपला सल्ला 15 दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडे पाठवला होता. पण सरकारकडून त्यांना काही उत्तर मिळालेलं नाहीये. विशेष म्हणजे बीएचयू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात म्हणजे वाराणासीत येतं.
वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसनुसार, भारत सरकार लसीकरण मोहिमेला ट्रॅक करण्यासाठी एक नवा प्लॅटफॉर्म तयार करत आहे. यामुळे लसीकरण मोहिमेला अधिक प्रभावी केलं जाईल.
यात वेगवेगळ्या लशींच्या डोसेसचं मिश्रण केल्यापासून ते सिंगल लशीच्या डोसचा परिणाम काय होतो, यासंबंधीचा डेटा ट्रॅक करण्याचं काम सुरू आहे. यामुळे लसीकरण मोहीमेला वेळोवेळी बदलण्यास मदत होईल. पण, भारत सरकार कोरोना लशीच्या सिंगल डोसचा कोरोनातून बरे झालेल्या लोकांवर तसंच सामान्य नागरिकांवर काय परिणाम होतो, यासंबंधीचा डेटा ट्रॅक करत आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.
कोरोनातून बरं झाल्यानंतर लस कधी घ्यावी?
भारत सरकारनं मे महिन्यात कोरोना लसीकरणासंदर्भात गाईडलाईन्स जारी केल्या होत्या. त्यानुसार, कोरोनातून बरे झालेले लोक संसर्ग संपल्यानंतर 3 महिन्यांनी कोरोनाची लस घेऊ शकतात. अशा लोकांसाठीही लशीचे दोन डोस भारत सरकारच्या गाईडलाईन्समध्ये प्रस्तावित आहेत.
अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशच्या (सीडीसी) वेबसाईटवरही कोरोना संक्रमणातून बरं झाल्यानंतर 3 महिन्यांनी लस घ्यावी असं सांगण्यात आलं आहे. या वेबसाईटच्या मते, कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती किती दिवस शरीरात राहते याविषयी ठोस अशी माहिती उपलब्ध नाहीये. त्यामुळे कोरोनातून बरं झाल्यानंतर प्रत्येकांना लस घेतली पाहिजे.
जगभरात ज्या देशांमध्ये कोरोनाच्या लशीचे दोन डोस दिले जात आहेत, तिथेही कोरोनातून बरं झालेल्यांना लशीचे 2 डोस प्रस्तावित केले आहेत.
सीडीसीच्या गाईडलाईन्सनुसार, दोन डोसवाली लस (जसं की कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन) या लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 2 आठवड्यानंतर कुण्याही व्यक्तीचं पूर्ण लसीकरण झाल्याचं समजलं जातं.
सिंगल डोस लस (जस की जॉन्सन अँड जॉन्सन) या लशीचे एक डोस घेतल्यानंतर 2 आठवड्यानंतर कुण्याही व्यक्तीचं पूर्ण लसीकरण झाल्याचं समजलं जातं.
बीएचयूच्या प्राध्यापकांचा सल्ला मानायचा झाल्यास तर या परिभाषेलासुद्धा बदलावं लागेल.
जगात अशाप्रकारचं संशोधन कुठे झालं आहे?
बीएचयूच्या प्राध्यापक ज्या दिशेने प्रयत्न करत आहेत, त्याच पद्धतीचं संशोधन जगातील इतर देशांमध्येही सुरू आहे. इतरही काही संशोधन पत्रिकांमध्ये अशाच आशयाचे वृत्तांत प्रसिद्ध झाले आहेत.
इंपीरियल कॉलेज लंडनच्या वेबसाईटवर आरोग्यविषयक विभागात प्रसिद्ध केलेल्या एका लेखात म्हटलं आहे की, "लशीचा एकच डोस कोरोना संसर्गातून बरं झालेल्या व्यक्तींसाठी बूस्टर डोसप्रमाणे काम करतो."
हे संशोधन याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध झालं होतं. त्याचे निष्कर्ष ब्रिटनमध्ये 51 लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनावर आधारित होते, ज्यांपैकी 24 जणांना कोरोना संसर्ग झाला होता आणि उरलेल्या व्यक्तींना झाला नव्हता. ज्यांना कोरोना झाला नव्हता, त्यांच्या शरीरात लस दिल्यानंतर सौम्य लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांच्या शरीरात जेवढ्या आढळतात, तेवढ्यात अँटीबॉडी तयार झालेल्या दिसल्या.
कोव्हिडमधून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये लशीचा एक डोस दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडी तयार झाल्याचं पहायला मिळालं.
अमेरिकेतील एक संशोधन संस्था सीडर सायनायनं (Cedars Sinai) असंच संशोधन फायझर-बायोएन्टेक लशीवर केलं. 228 लोकांवर केलेल्या संशोधनातून आढळून आलं, की कोरोना संसर्गातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये लशीच्या पहिल्या डोसनंतर जेवढ्या अँटीबॉडी बनल्या होत्या, तेवढ्याच अँटीबॉडी कोरोनाचा संसर्ग न झालेल्या लोकांमध्ये दोन डोसनंतर तयार झाल्या होत्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)