मुस्लिम वृद्ध मारहाण प्रकरणात काय खरं आणि काय खोटं?

- Author, कीर्ती दुबे आणि दिलनवाझ पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दिल्लीला लागूनच असलेल्या गाझियाबादच्या लोनी सीमेवर 5 जून रोजी एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीला मारहाण करण्यात आली. त्यानंतर याचा एक एडिट केलेला व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
रिक्षातून आलेल्या काही लोकांनी अपहरण केलं, त्यानंतर मारहाण करून दाढी कापली आणि जय श्री राम म्हणायची बळजबरी केली, असा दावा अब्दुल समद सैफी या वृद्धानं केला होता. तर, गाझियाबाद पोलिसांनी घटनेला मुद्दाम धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केलाय.
या घटनेशी संबंधित दोन महत्त्वाचे धागे आहेत. पहिला म्हणजे ही घटना घडली ती गाझियाबाद लोनी सीमा आणि दुसरा घटनेनंतर हे वृद्ध राहत होते ते बुलंदशहर. वा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर जवळपास 10 दिवसांनी अब्दुल समद सैफी माध्यमांसमोर आले आहेत.
या घटनेवरून राजकारणालाही सुरुवात झाली असून, राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटनंतर योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर थेट हल्लाबोल केल्यानं प्रकरणाची अधिकच चर्चा सुरू झालीय.
गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणी ट्विटरसह इतर काही जणांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
बीबीसीच्या दोन प्रतिनिधींनी प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेत, घटनेचं ग्राऊंड रिपोर्टींग केलं आहे. कीर्ती दुबे लोनी बॉर्डरहून रिपोर्टींग करत आहेत आणि दिलनवाज पाशा बुलंदशहरमधून.
दिनांक : 16 जून - ठिकाण : गाझियाबादची सीमा असलेलं लोनी - प्रतिनिधी : कीर्ती दुबे
गाझियाबादच्या लोनी परिसरात वृद्ध मुस्लीम व्यक्तीला झालेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी परवेश गुर्जर यांच्या बंथला गावातील एकमजली घराला सध्या कुलूप आहे.
गावातील लोक अनोळखी किंवा कोणत्याही बाहेरच्या लोकांना पाहूनही घरात निघून जातात. व्हीडिओबद्दल किंवा परवेश आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलायला कुणीही तयार नाही. लोकांमध्ये एक विचित्र भीती असून गावातल्या स्मशान शांततेमध्ये त्या भीतीची जाणीव होते.

परवेश यांना 12 तारखेला अटक झाल्यापासून त्यांचे कुटुंबीय बेपत्ता आहेत. त्यांच्या घरापासून दहा पावलं दूरच त्यांची मावशी फुलवती यांचं कुटुंब राहतं. आम्ही त्यांच्या घरी गेलो तर त्या, खाटेवर (चारपाई) बसलेल्या होत्या. मी ओळख सांगताच त्या लगेचच म्हणाल्या की, "मी तर दोन दिवसांपूर्वीच आली आहे. मला माहितीच नाही, त्या दिवशी काय झालं होतं ते?"
काही वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर मात्र, हळूहळू त्या मोकळेपणानं बोलू लागल्या. त्यानी सांगितलं की, "एक मौलाना त्यांच्या (परवेशच्या) घरी येत होता. 2-3 महिन्यांपूर्वीच परवेश आणि त्यांची भेट झाली होती. तो पुड्या-तावीज द्यायचा, पण परवेशच्या कुटुंबामध्ये गेल्या काही महिन्यांपासून काहीही नीट घडत नव्हतं. मौलानानं दिलेली औषध प्यायल्यामुळं 20 दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीचा गर्भपात झाला होता. त्यानंतर 3 जूनला परवेशचे वडील सुरेंद्र तंवर यांचा अपघात झाला. काम-धंद्यातही नुकसान झालं. त्याच्याकडे एक डीजे आणि कँटर (मालवाहू वाहन) होतं, तेही विकावं लागलं. परवेशनं दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. हे सर्व मौलानाच्या तावीजमुळं झालं," असं फुलवती म्हणाल्या.
मारहाणीचा व्हीडिओ पाहिला नसल्याचं फुलवती यांनी सांगितलं. पोलीस आल्यानंतर या मारहाणीबाबत कळलं, असं त्या म्हणाल्या. पण जेव्हा आम्ही त्यांना हा व्हीडिओ दाखवला त्यावर फुलवती यांनी लगेचच अब्दुल समद सैफी यांना ओळखलं आणि म्हणाल्या, "हो, हाच तावीज देत होता."
मात्र, या संपूर्ण गावात कोणीही या घटनेबाबत बोलायला तयार नाही. आम्ही त्यादिवशी घरीच नव्हतो, हे एकच कारण सगळे सांगतात. व्हीडिओ दाखवल्यानंतरही कुणीही या वृद्ध मुस्लीम व्यक्तीला पाहिलं होतं अथवा नाही, असं काहीही बोलायला तयार नाही.

पण, हा व्हीडिओ नेमका कुठं तयार करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर अजून कुणाकडंही नाही.
गावात फिरताना आम्हाला विटांचं कच्च बांधकाम असलेली एक जागा (गोठा किंवा गुरं-जनावरं बांधण्याची जागा) दिसली, तिथं दोन गायी बांधलेल्या होत्या. आम्ही त्याठिकाणी गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की, अब्दुल समद सैफी यांना मारहाण झालेल्या व्हीडिओमध्ये दिसणारी जागा, हीच होती. हे घर परवेश यांच्या कुटुंबीयांचंच असल्याचं त्यांच्या मावशीनं सांगितलं.
या गोठ्यामध्ये व्हीडिओमध्ये दिसत असणारा, निळ्या रंगाचा प्लास्टीकचा ड्रम, पांढऱ्या रंगाचा डब्बा, एक खाट आणि मागे विटांची भिंत दिसून आली.
अब्दुल समद सैफीचे अनेक दावे खोटे - पोलीस
गाझियाबाद पोलिसांनुसार या प्रकरणी परवेश गुर्जर मुख्य आरोपी आहे. तर 16 जूनपर्यंत पोलिसांनी परवेश गुर्जरबरोबरच आदिल खान, अभय उर्फ कल्लू गुर्जर, इंतेजार आणि सद्दाम अशा पाच आरोपींना अटक केली आहे.
लोनी परिसरातील पोलीस अधिकारी इराज राजा यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं की, "आमच्याकडे 7 जून रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. त्यातही अज्ञातांच्या विरोधात तक्रार होती. तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये अब्दुल समद सैफी हे स्वतः इंतेजार यांच्या गाडीवरून बेहटा हाजीपूर या गावी गेल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे आतापर्यंत आमच्या चौकशीत जे काही निष्पन्न झालं, त्यानुसार अब्दुल समद सैफी यांनी खूप काही खोटं सांगितलं आहे."

पण, समद सैफी खोटं बोलत आहे असं पोलीस कोणत्या आधारावर म्हणत आहेत? हाही प्रश्न आहे. कारण पोलिसांना अद्याप मूळ व्हीडिओदेखिल मिळाला नाही?, असं बीबीसीनं विचारलं. त्यावर पोलिस ठाण्याचे एसएचओ (स्टेशन हाऊस ऑफिसर) म्हणाले की, "आमच्याकडे समद सैफी यांचे कॉल रेकॉर्ड आहेत. त्यावरून गेल्या महिनाभरामध्ये परवेशबरोबर त्यांचं अनेकवेळा बोलणं झालं होतं, हे स्पष्ट होत आहे."
"व्हायरल व्हीडिओमध्ये ऑडियो नाही. तो आधी एडिट करण्यात आला आहे. हे आम्ही मान्य करत आहोत, पण हा व्हीडिओ परवेशच्या फोनद्वारे तयार करण्यात आला होता. आम्ही चौकशी केली तर त्यानं तो फोन तोडून टाकला, असं सांगितलं. पुरावे मिटवण्यासाठी अनेकदा असं केलं जातं. पण मूळ व्हीडिओ शोधण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत."
परवेश गुर्जरच्या अटकेमागची कहाणी
परवेश गुर्जर या व्हायरल व्हीडिओ प्रकरणातील मुख्य आरोपी असले तरी त्यांना 12 जून रोजी खंडणीच्या दुसऱ्याच एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी 10 जून रोजी लोनीमध्ये राहणाऱ्या इंतेजार यांनी एफआयआर दाखल केला होता. इंतेजार यांनीच अब्दुल समद सैफी आणि परवेश गुर्जर यांची भेट घालून दिली होती, असा आरोप आहे.
या एफआयआरमध्ये केलेल्या तक्रारीत इंतेजार यांनी परवेश गुर्जर नावाचा व्यक्ती 2 लाख रुपये खंडणी मागत असून, ती दिली नाही तर मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप केला आहे. हा व्यक्ती याआधी अनेकदा तुरुंगात जाऊन आला आहे, त्यामुळे मी आणि माझं कुटुंब दहशतीखाली असल्याचंही, इंतेजार यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
10 जून रोजी दाखल करण्यात आलेल्या या एफआयआरनंतर 12 जूनला परवेश यांना अटक करण्यात आली. मात्र अब्दुल समद सैफी यांनी मारहाण झाल्याच्या घटनेप्रकरणी आधीच 7 जून रोजी एफआयआर दाखल झाली होती.

परवेश यांच्या अटकेबाबतच्या या संभ्रमाबाबत बोलताना पोलीस अधिकारी इराज राजा म्हणाले की, "अब्दुल समद सैफी यांनी दाखल केलेला एफआयआर अज्ञातांच्या विरोधात होता. त्यामुळे या प्रकरणी अटक करण्यास उशीर झाला. परवेशला आधी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे हे खरं असलं तरी, आता आम्ही त्याची पोलीस कोठडी मिळवून या प्रकरणी त्याची चौकशी करणार आहोत."
कल्लू गुर्जर आणि परवेशची मैत्री
यानंतर आम्ही या प्रकरणी अटकेत असलेल्या अभय उर्फ कल्लू गुर्जर याच्या घरी पोहोचलो. याठिकाणी त्यांचे वडील ज्ञानेंद्र गुर्जर यांच्याशी आमची भेट झाली. ज्ञानेंद्र यांनी, मुलगा अभयनं त्यांना सर्व काही सांगितलं असून, हा प्रकार तावीज देण्याच्या नावाखाली पैसे उकळण्याचा आहे, असा दावा केला आहे.
"लोनीमध्ये राहणाऱ्या इंतेजारच्या माध्यमातूनच अब्दुल समद सैफी आणि परवेशच्या कुटुंबीयांची ओळख झाली होती. इंतेजार आणि अब्दुल समद सैफी यांनी मिळून परवेशकडून तावीज देण्याच्या नावाखाली लाखो रुपये घेतले होते. त्यांनंतर परवेशनं इंतेजारकडून पैसे परत मागितले तर त्यानं खंडणीचा गुन्हा दाखल केला," असा आरोप ज्ञानेंद्र यांनी केला आहे.
"माझा मुलगा कल्लू आणि परवेश यांची भेट जिममध्ये झाली होती. 5 जून रोजी परवेशनं कल्लू याला फोन करून बोलावून घेतलं. माझा मुलगा अवघा 19 वर्षांचा आहे. फोन येताच मैत्रीसाठी म्हणून तो गेला होता. पण या मारहाणीशी त्याचा काही संबंध नाही. तो यात अडकला आहे," असंही ज्ञानेंद्र म्हणाले.

मात्र, पोलिसांनी बीबीसीबरोबर बोलताना अशाप्रकारे पैसे उकळल्याची माहिती दिलेली नाही. पोलिसांच्या मते, तावीजच्या मुद्द्यावरून ही मारहाण झाली आहे. तावीज घेतल्यानंतर परवेशच्या जीवनात बरंच काही वाईट घडलं, त्यामुळं रागात त्यानं हे पाऊल उचललं होतं.
सायंकाळी घटनास्थळी पोहोचला आदिल खान
या प्रकरणी 30 वर्षांच्या आदिल खान यांनाही अटक झाली होती. त्यांना जामीन मिळाला असून ते तुरुंगातून बाहेर आले आहेत. आदिल खान यांचं घर लोनी सीमेच्या समोर आहे. याठिकाणी घराबाहेर 10-12 जण बसलेले होते.
आदिल यांचे मोठे भाऊ फझल खान हे आम्हाला भेटले. आदिलला कुटुंबीयांसह बाहेर पाठवलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
फझल यांनीही या मुद्द्यावर बोलायला आधी संकोच केला, पण नंतर काही वेळानं ते याबाबत मोकळेपणानं बोलले.
फझल यांनी सांगितलं की, ही मारहाण झाल्यानंतर 5 जूनला सायंकाळी आदिल यांना परवेशचा फोन आला होता. वृद्ध व्यक्तीची दाढी कापली आहे, हे समजल्यानंतर आदिलला वाईट वाटले आणि त्यांनीच अब्दुल समद सैफी यांना तिथून बाहेर काढण्यासाठी मदत केली.
"आम्ही मुस्लीम समुदायातील प्रतिष्ठीत नागरिक आहोत. अनेक लोक आमच्याकडं येतात. मग आम्ही दाढी कापण्याचं समर्थन कसं करणार? आदिल घटनास्थळी सायंकाळी पोहोचला होता, त्यामुळं त्याला जामीन मिळाला," असंही फझल म्हणाले.
दरम्यान बीबीसीचे प्रतिनिधी दिलनवाज पाशा बुलंदशहरच्या अनुपशहर याठिकाणी पोहोचले. इथं अब्दुल समद सैफी यांचं कुटुंब गेल्या काही दिवसांपासून राहत होतं.
तारीख : 16 जून - ठिकाण : बुलंदशहर जिल्ह्यातील अनुपशहर - प्रतिनिधी : दिलनवाज पाशा
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातील अनुपशहरमधील एका परिसराबाबत अचानक चर्चा सुरू झाली. याठिकाणी राहणारे 72 वर्षीय अब्दुल समद सैफी यांच्या घराबाहेर पत्रकार आणि स्थानिकांची गर्दी पाहायला मिळते.
अब्दुल समद सैफी यांना 5 जून रोजी गाझियाबादच्या लोनी भागामध्ये मारहाण झाली होती. सोशल मीडियावर त्याचा व्हीडिओ व्हायरल झाला. त्या दिवसानंतर अब्दुल समद सैफी मीडियापासून लांबच होते. 10 दिवसांनंतर म्हणजे 16 जून रोजी सायंकाळी ते पुन्हा एकदा माध्यमांसमोर आले.

अब्दुल समद सैफी माध्यमांसमोर आले तेव्हा त्यांच्या डोक्यावर अरबी साफा (डोक्यावर बांधलेले रुमालासारखे मोठे कापड), हातामध्ये तस्बीह (जप करण्याची माळ) आणि हिरव्या रंगाची अंगठी परिधान केली होती. त्यावेळी उम्मेद इद्रीसीदेखील तिथं उपस्थित होते. उम्मेद हे समाजवादी पक्षाचे स्थानिक नेते असल्याचा दावा करतात. त्यांनीच सर्वात आधी 7 जून रोजी अब्दुल समद सैफी यांच्याबरोबर फेसबूक लाईव्ह करत, त्यांना मारहाण केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
समद सैफी यांनी बीबीसीला सांगितलं की, "माझ्यावर चार जणांनी हल्ला केला. त्यांनी माझा चेहरा झाकला आणि मला नेऊन एका खोलीत डांबून ठेवलं. त्याठिकाणी गाय बांधलेली होती. मला त्यांनी दोन-तीन तास डांबून ठेवलं."
परवेश गुर्जर आणि इंतेजार या नावाच्या लोकांना ओळखता का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, "माझी परवेश गुर्जरबरोबर कोणत्याही प्रकारची ओळख नाही. मी इंतेजारला ओळखतो आणि त्याठिकाणी माझे भाचे राहतात, त्यामुळे आमची ओळख आहे."
"मी अल्लाह-अल्लाह ओरडत होतो. त्यावेळी ते मला म्हणत होते, अल्लाहचं नाव का घेत आहे? त्यावर मी त्यांनी म्हटलं की, माझा जीव अल्लाहच्या हाती आहे, त्याची इच्छा असेल तर तो मला वाचवेल," असं समद सैफी यांनी या घटनेबाबत बोलताना सांगितलं.

''आम्हाला न्याय मिळेल अशी आमची सरकारकडून अपेक्षा आहे. योगी आदित्यनाथ आमचे मुख्यमंत्री आहेत, ते आम्हाला न्याय मिळवून देतील आणि माझ्या वडिलांना मारहाण करणाऱ्या सर्वांना अटक केली जाईल, असा विश्वास आम्हाला आहे," असं अब्दुल समद सैफी यांचा मुलगा तैय्यब सैफी म्हणाला.
वक्तव्यांमध्ये तफावत
स्थानिक पत्रकार उस्मान यांनीही 14 जून रोजी समद सैफी यांची याबाबत मुलाखत घेतली होती.
त्यात "माझं नाव सुफी अब्दुल समद आहे. मी बेहटाला जात होतो. त्यावेळी गोलचक्कर नहरीजवळ रिक्षावाल्यानं मला रिक्षात बसवलं. त्यानंतर रिक्षामध्ये आणखी दोन मुलं बसले. त्यांनी माझ्या डोक्याला बंदूक लावली आणि मला जंगलातील एका खोलीमध्ये नेलं. मला खूप मारहाण केली. मला पाकिस्तानी आणि दहशतवादी म्हटलं. त्यानंतर मला धमकी देत म्हटलं की, आम्ही आतापर्यंत 19 मुस्लिमांना मारलं आहे, तुम्हालाही मारू. मी खूप ओरडत होतो आणि ते जय श्री रामच्या घोषणा देत होते," असं त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
अनुपशहरमध्ये त्यांच्या घराच्या जवळपास राहणाऱ्या बहुतांश लोकांनी ओळख जाहीर करून माध्यमांशी बोलायलाच नकार दिला. ज्यांच्याशी आम्ही बोललो त्यांनी सांगितलं की, समद सैफी यांचं कुटुंब लाकूड आणि लोखंडाचा व्यवसाय करतं हे त्यांना माहिती आहे. पण त्यांनी पीर किंवा सुफी (धार्मिक गुरू) असल्याचं कुणालाही सांगितलं नव्हतं.
शेजाऱ्यांचं असं म्हणणं होतं की, ते जर सुफी किंवा बाबा म्हणून काम करत असतील तर याबाबत त्यांना काहीही माहिती नाही. पण या प्रकारानंतर शेजारच्या वस्त्यांमधील लोकही त्यांची भेट घेण्यासाठी घरी येत होते.
अशाच एका तरुणानं, "एका वृद्ध व्यक्तिची दाढी कापल्याचा व्हीडिओ पाहून मला अत्यंत वाईट वाटलं. भारतात अशा घटना घडायला नको," असं म्हटलं.
एफआयआर
अब्दुल समद सैफी यांनी केलेल्या दाव्यानुसार, समद यांनी आधी 06 जूनला लोनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली होती. त्यात त्यांनी अज्ञात तरुणांनी मारहाण केल्याचा आणि जय श्री राम च्या घोषणा देण्यासाठी बळजबरी केल्याचे आरोप केले होते.

तर, उम्मेद पहलवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना फोनवरून सैफी यांना झालेल्या मारहाणीबाबत समजलं. ते समद सैफी यांना भेटायला पोहोचले तर त्यांना सांगण्यात आलं की, ते लोनी ठाण्यात गेले होते.
"पण पोलिसांनी त्यांना दोन हजार रुपये देऊन परत पाठवलं. त्यांच्या तक्रारीवर काहीच कारवाईदेखील झाली नाही. कारवाई झाली नाही म्हणून मी त्यांच्याबरोबर फेसबूक लाईव्ह केलं आणि त्यानंतर दोन तासांमध्ये गुन्हा दाखल झाला," असा दावा ते करतात.
उम्मेद पहलवान यांनी ते समद सैफी किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर कोणालाही ओळखत नव्हते, असा दावा केला आहे. तर इराज राजा यांनी, "पोलिस ठाण्यात तक्रार देण्यापूर्वीच समद सैफी उम्मेद पहलवानच्या संपर्कात आले असण्याची शक्यता आहे. त्यांचा संपर्क कधी झाला होता, याचा तपास करत आहोत," असं म्हटलं आहे.
गाझियाबाद पोलिसांनी 6 जूनला अशी कोणतीही तक्रार आली नसल्याचं म्हटलं आहे.
"आम्हाला 6 जूनला कोणतीही तक्रार मिळाली नाही. सैफी यांचे कुटुंबीय अशा तक्रारीबद्दल का बोलत आहेत, ते आम्हाला माहिती नाही. पोलिसांना 7 जूनला तक्रार मिळाली होती आणि त्याआधारे अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित सैफी यांनी तक्रारीत म्हटलं होतं की, त्यांना जंगलात नेण्यात आलं. पण हल्ला परवेश गुर्जरच्या घरी झाला. तिथं चारही बाजुला पक्कं घर आहे."
इंतेजारच्या सांगण्यावरून सद्दाम अब्दुल समद यांना घेऊन परवेश गुर्जरच्या घरी आला होता. त्यानंतर तिथं आदिल, इंतेजार आणि कल्लू गुर्जरही आले, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
हे सर्वजण हल्ल्यामध्ये सहभागी होते आणि त्यांचा अटक करण्यात आली आहे. हल्ल्यात सात-आठ लोक सहभागी असण्याची शक्यता आहे. सर्वांची ओळख पटली असून, सर्वाना लवकरच अटक होईल, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
मात्र, बीबीसीबरोबर बोलताना अब्दुल समद सैफी यांनी, त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये कोणत्याही मुस्लीम व्यक्तीचा समावेश नव्हता, असं म्हटलं आहे.
"अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळं पोलिसांना तपासातही अडचणी आल्या. त्यामुळंच अटक करायला सहा दिवस लागले. जर आरोपींची ओळख आधीच जाहीर केली असती, तर त्यांना लगेचच अटक करण्यात आली असती," असं लोनी परिसराचे सर्कल ऑफिसर अतुल सोनकर यांनी म्हटलं.
भाजपची बाजू
भाजपचे प्रवक्ते शलभमणी त्रिपाठी यांनी ट्विटरवर दोन व्हीडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. एकामध्ये आरोपी परवेश हे वृद्ध सैफी यांच्याकडं विचारपूस करत आहेत, त्यावेळी समद सैफी यांनी इंतेजारच्या सांगण्यावरून परवेश यांच्या घरी तावीज दिल्याचं मान्य करत आहेत. तर दुसऱ्या व्हीडिओमध्ये समद सैफी यांना मारहाण करणाऱ्या आरोपी सद्दाम याचं म्हणणं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
गाझियाबाद पोलीस अधिकाऱ्यांनी या व्हीडिओची दखल घेतली असून, त्याची चौकशी केली जात आहे. 'हे व्हीडिओ सैफी यांच्यावरील ह्ल्ल्यादरम्यान रेकॉर्ड केलेल्या व्हीडिओचा भाग असू शकतात,' असं अतुल सोनकर म्हणाले आहेत.
व्हीडिओ कोणी व्हायरल केला?
सैफी यांना मारहाण झाल्याचा हा व्हीडिओ आरोपी परवेश गुर्जर यांच्या मोबाईल फोनद्वारे तयार करण्यात आला असल्याचं, पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र हा व्हीडिओ सोशल मीडियावर सर्वात आधी कोणी व्हायरल केला हे अद्याप स्पष्ट नाही.
सर्वात आधी व्हीडिओचा एडिट केलेला भाग व्हायरल झाला होता. त्यामधून आवाज काढून टाकण्यात आला होता. सर्वात आधी व्हीडिओ व्हायरल करणाऱ्याचा शोध घेतला जात असून, त्याला लवकरच अटक केली जाईल असं पोलिसांचं म्हणणं आहे.
तर उम्मेद इद्रीसी यांनी हा व्हीडिओ सर्वात आधी परवेश गुर्जर यांनीच पोस्ट केला होता, असा आरोप केला आहे. "परवेशनं हिंदुंमध्ये स्वतःचं नाव, चर्चा व्हावी म्हणून हा व्हीडिओ तयार करून तो प्रसिद्ध केला होता," असा आरोप उम्मेद यांनी केला आहे.
अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीतच :
अब्दुल समद सैफी हल्लेखोरांना ओळखत होते तर, त्यांनी अज्ञातांच्या विरोधात FIR का दाखल केला?
व्हीडिओ एडिट करून सर्वांत आधी कोणी पोस्ट केला?
व्हीडिओमधून मूळ आवाज हटवण्यात आला का? तसं झालं असेल तर त्याचं कारण काय?
मूळ व्हीडिओ कुठं आहे?
व्हीडिओ फक्त परवेशच्या फोनमध्ये होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. मग हा व्हीडिओ इतरांपर्यंत कसा पोहोचला? शलभ मणी यांनी ट्विट केलेला व्हीडिओचा दुसरा भाग कसा समोर आला?
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








