नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय स्थगित, सुप्रीम कोर्टाकडून दिलासा

फोटो स्रोत, Ganesh Pol/BBC
अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना सुप्रीम कोर्टानं तात्पुरता दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टानं नवनीत कौर राणांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं. या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे.
सुप्रीम कोर्टातील न्या. विनित सरन आणि न्या. दिनेश महेश्वरी यांच्या खंडपीठानं मुंबई हायकोर्टाच्या 8 जून 2021 रोजीच्या निर्णयाला स्थगिती दिली.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवरुन नवनीत कौर राणा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. या निवडणुकीसाठी नवनीत राणांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र केल्याचं म्हणत मुंबई हायकोर्टानं ते जात प्रमाणपत्र रद्द ठरवलं होतं. तसंच, नवनीत राणांना 2 लाखांचा दंडही ठोठावला होता.
यानंतर नवनीत राणांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले होते. त्यावर आज सुनावणी झाली.
तसचं, सुप्रीम कोर्टानं सर्व तक्रारदारांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.
काय आहे प्रकरण?
नवनीत राणांनी 2013 साली जात प्रमाणापत्र घेतलं होतं. हे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र हे दोन्ही मुंबई हायकोर्टानं 8 जून 2021 रोजी रद्द केलं. शिवाय त्यांना 2 लाख रुपायांचा दंड ठोठावला होता. याचिकाकर्त्यांचे वकील प्रमोद पाटील यांनी न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली होती.

"हे प्रमाणपत्र घेताना त्यांनी खोटी आणि बनावट कागदपत्र सादर केली होती असं निरीक्षण कोर्टांने नोंदवलं आहे. त्यांना 6 आठवड्यांमध्ये जातप्रमाणपत्र सरेंडर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत," असं प्रमोद पाटील यांनी म्हटलं होतं.
'या सर्व प्रकारामागे शिवसेनाच, मी त्यांचा विरोध करत राहाणार'- नवनीत राणा
खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलं होतं, त्यावेळी बीबीसी मराठीनं राणांशी संवाद साधला होता.
आपण शिवसेनेच्या विरोधात भूमिका मांडत असल्यामुळेच आपल्यावर ही वेळ आली तरीदेखील आपण मागे हटणार नाहीत, असं राणा म्हणाल्या होत्या.
यावेळीच नवनीत राणांनी मुंबई हायकोर्टाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचे सांगितले होते.
त्या म्हणाल्या होत्या, "हा निकाल मी पूर्ण वाचलेला नाही. सर्वोच्च न्यायालय चार आठवड्यांसाठी बंद आहे. आम्हाला सहा आठवड्यांचा वेळ मिळालेला आहे. त्यानंतर आम्ही दाद मागणार आहोत. पूर्वी हायकोर्टाने एकदा निर्णय देऊन एका समितीने चौकशी करुन मला जात प्रमाणपत्र दिले होते. मात्र शिवसेनेच्या खासदारांचा पराभव झाल्यावर ते हायकोर्टात परत गेले आणि अचानक हा निर्णय झालेला आहे. पण तरिही आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या अपेक्षेने जाणार आहोत. हा निर्णयाचा दिवस नव्हता. आज अचानक निर्णय झालेला आहे."
नवनीत राणांच्या जातप्रमाणपत्राविरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ कोर्टात गेले होते. अमरावती लोकसभा मतदारसंघातून राणा यांनी अडसूळ यांना हरवलं होतं.
'मी शिवसेनेच्या विरोधात उभी'
"कुठे ना कुठे खिचडी शिजलेली आहे. हायकोर्टानी दिलेल्या निर्णयानुसार मला जात प्रमाणपत्र दिलं होतं. मी ज्या प्रकारे महाराष्ट्राचा आवाज संसदेत मांडत आहे. शिवसेनेच्या विरोधात मी उभी आहे. शिवसेनेच्या विचारांचा विरोध मी करत आहे. ते मी करत राहाणार. यामागे शिवसेना आहे. ज्या पद्धतीनं मी त्यांच्याविरोधात उभी आहे ते पाहाता शिवसेनेने 'खिचडी शिजवलेली' आहे," असं नवनीत राणा मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर म्हणाल्या होत्या.
"माझा जन्म मुंबईतला आहे. माझी आई मुंबईतच लहानाची मोठी झाली आहे. माझी मुलं इथंच जन्मली आहेत. मी इथलीच मुलगी, इथलीच सून आहे. माझी कर्मभूमी महाराष्ट्रच आहे. मी कागदपत्रांच्या आधारावरच सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे," असंही त्या म्हणाल्या होत्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








