योगी आदित्यनाथ थेट मोदी-शाहांना आव्हान देत आहेत का?

योगी आदित्यनाथ

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, समीरात्मज मिश्र
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या बैठकींमागून बैठकी सुरू आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सरकार आणि पक्ष संघटनेत बदलाची शक्यता वर्तवली जात असतानाच दोन्ही आघाड्यांवर नेतृत्व बदलाची चर्चाही जोर धरू लागलीये. अर्थात, तरीही राजकीय विश्लेषकांना काही मोठा बदल घडेल, असं वाटत नाहीये. पण या सर्व घडामोडीत उत्तर प्रदेशच्या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी एक नाव आलं आहे- अरविंद कुमार शर्मा.

माजी सनदी अधिकारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिशय जवळचे मानले जाणाऱ्या अरविंद कुमार शर्मा यांना चार महिन्यांपूर्वी अचानक यूपीच्या राजकीय मैदानात उतरविण्यात आलं आणि आता त्यांच्याच माध्यमातून राज्यात बदल होईल असे संकेत दिले जात आहेत.

कोण आहेत अरविंद कुमार शर्मा?

शर्मा हे यावर्षी जानेवारी महिन्यात निवृत्त होणार होते, मात्र त्यांनी आपल्या निवृत्तीच्या काही दिवस आधीच राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपनंही त्यांना लगेचच विधान परिषदेवर पाठवलं. याच कारणामुळे राजकीय वर्तुळात राज्य सरकारमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली.

काही राजकीय विश्लेषकांनी तर अरविंद शर्मा यांना मुख्यमंत्री बनवलं जाऊ शकतं, असाही अंदाज व्यक्त केला. त्यांना उपमुख्यमंत्रिपद किंवा गृह खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात येईल, असंही सांगण्यात येत आहे.

अरविंद कुमार शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

या अंदाजामागचं थेट कारण हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रभाव कमी करणं किंवा त्यांच्या कथित मनमानी कारभाराला वेसण घालणं असल्याचं सांगितलं जात आहे.

अर्थात, चार महिने उलटून गेल्यानंतरही अरविंद शर्मा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाहीये किंवा इतर कोणतीही महत्त्वाची जबाबदारीही देण्यात आली नाहीये.

योगींनी थेट मोदींना आव्हान दिलं?

उत्तर प्रदेशमधील एका ज्येष्ठ नेत्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं, "मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की, अरविंद शर्मा यांना महत्त्वाचं खातं तर सोडा, कॅबिनेट मंत्रिपदही मिळणं अवघड आहे. राज्य मंत्रिपदाहून अधिक शर्मा यांना काही द्यायला ते तयार नाहीत."

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या पवित्र्याकडे सरळसरळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान तसंच त्यांचा अपमान म्हणून पाहिलं जात आहे.

Please wait...

दिल्लीमधील भारतीय जनता पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे की, 'पक्षाचं केंद्रीय नेतृत्व योगी आदित्यनाथ यांना तुम्ही कोणामुळे मुख्यमंत्री बनला आहात, याची सातत्यानं जाणीव करून देत असतं. दुसरीकडे योगी आदित्यनाथही सतत हे जाणवून देत असतात की, भाजपमध्ये मोदींनंतर पंतप्रधानपदासाठी त्यांच्याशिवाय पर्याय नाही.'

बऱ्याचदा अनेकांकडून योगी आदित्यनाथांना नरेंद्र मोदींचा पर्याय म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला जातो. काही छोट्या-मोठ्या संघटना आणि लोकांकडून सोशल मीडिया तसंच अन्य व्यासपीठांवरून 'पीएम कैसा हो, योगी जी जैसा हो' सारख्या मोहिमा चालवल्या जातात. यापाठीमागे आदित्यनाथ यांच्या निकटवर्तीयांची भूमिका असते हे भाजपचे अनेक नेतेही मान्य करतात.

योगी आदित्यनाथांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा?

योगी आदित्यनाथ यांच्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पाठबळ असल्याचं ज्येष्ठ पत्रकार योगेश मिश्र सांगतात.

ते सांगतात, "उत्तर प्रदेश मोठं राज्य आहे. या राज्याचा मुख्यमंत्री स्वतःला भावी पंतप्रधान म्हणून पहायलाच लागतो, मग तो प्रादेशिक पक्षांचा नेता असो की भाजपचा. दुसरं म्हणजे योगी आदित्यनाथ यांच्यासोबत संघ आहे. विरोध असतानाही संघाच्या पाठिंब्यामुळे ते मुख्यमंत्री झाले होते आणि आजही संघाची पसंती त्यांना आहे. अरविंद शर्मा यांना पॅराशूटप्रमाणे इथं पाठविणं संघालाही पसंत नाहीये."

योगी आदित्यनाथ

फोटो स्रोत, Getty Images

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वामधील भाजपचं सरकार आता जवळपास आपला कार्यकाळ पूर्ण करत आहे. मात्र राज्यात थेट मुख्यमंत्रीच बदलण्याची चर्चा आता जितकी वेग पकडत आहे, तितकी गेल्या चार वर्षांत कधीच झाली नव्हती. किंबहुना याआधी अशी कोणतीही चर्चा सुरू होण्याआधीच संपुष्टात यायची.

कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारवर उपस्थित झालेलं प्रश्नचिन्ह असो की भाजपचे नाराज आमदार विधानसभेतच धरणं देऊन बसल्याचं प्रकरण असो, योगींच्या नेतृत्वाला कधीच आव्हान मिळालं नाही.

ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ कलहंस सांगतात की, आरएसएस आणि भाजपच्या संघटनात्मक बैठकांमध्ये पहिल्या चार वर्षांत पहिल्यांदाच असं होत आहे की, मंत्र्यांना एकेकट्याला बोलवून त्यांचं मत जाणून घेतलं जात आहे.

कलहंस सांगतात, "ही लहान बाब नाहीये. आपल्याला महत्त्व दिलं जात नाही, काही निवडक अधिकारीच सरकार चालवत आहेत अशा तक्रारी मंत्री आणि आमदारांकडून येत आहेत. अशापरिस्थितीत संघ आणि भाजपमध्येही योगी आदित्यनाथ यांच्या कार्यशैलीवर विचारमंथन होणं स्वाभाविक आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडून वारंवार आपल्या सामर्थ्याची जाणीव करून दिली जात असते. त्यामुळे सध्या अशी परिस्थिती आहे की, भाजप योगींना हटवूही शकत नाहीये आणि त्यांच्या नेतृत्वात येणारी निवडणूक लढविण्याचं धाडसही करू इच्छित नाहीये."

नाराजीचं नेमकं कारण काय?

अरविंद शर्मा यांच्याबद्दल योगी आदित्यनाथ यांची जी भूमिका आहे, त्याबद्दल भाजपमध्ये कोणताही नेता किंवा प्रवक्ता काही बोलायला तयार नाही. मात्र पक्षात सगळंच काही आलबेल असल्याची परिस्थिती नाही, हे सगळेच मान्य करत आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलची नाराजी सार्वजनिकरित्या व्यक्त करणारे मंत्री आणि आमदारही या विषयावर बोलायला कचरत आहेत. पण नाव न सांगण्याच्या अटीवर बरंच काही सांगत आहेत.

योगी आदित्यनाथ

फोटो स्रोत, Getty Images

अशाच एका आमदाराचं म्हणणं आहे की, "कोव्हिडच्या काळात राज्य सरकारच्या कार्यशैलीवर केंद्रीय नेतृत्व प्रचंड नाराज आहे. सार्वजनिकरित्या भलेही ही गोष्ट दडपण्याचा प्रयत्न होत असला तरी आताच्या बैठका त्याचा परिणाम आहे. पंचायतीच्या निवडणुकांच्या निकालानंतर योगीही बॅकफूटवर आहेत."

गेल्या आठवड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबाळे हेसुद्धा उत्तर प्रदेशच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी लखनऊला आले होते.

त्याआधी तीन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये उत्तर प्रदेशमधल्या राजकीय वातावरणाबद्दल चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत दत्तात्रेय होसबाळेंची महत्त्वपूर्ण बैठक झाली होती.

या बैठकीत भाजप उत्तर प्रदेशचे संघटन मंत्री सुनील बन्सल हेसुद्धा उपस्थित होते. उत्तर प्रदेशच्या राजकारणावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला योगी आदित्यनाथ किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांना आमंत्रण नव्हतं. राजकीय विश्लेषकांच्या मते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ही गोष्ट खटकली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, "होसबाळे यांचं लखनऊला येणं आणि दोन दिवस थांबूनही योगींनी त्यांना न भेटणं याचा हा परिणाम होता. होसबाळे यांचा दोन दिवस थांबण्याचा कोणताही कार्यक्रम नव्हता. पण योगी त्याचदिवशी सोनभद्रला गेले होते. त्यामुळे होसबाळे यांना आपला दौरा लांबवावा लागला. होसबाळेंना दुसऱ्या दिवशीही थांबावं लागलं, पण योगीजी आले नाहीत. ते सोनभद्रवरून मिर्झापूर आणि पुढे गोरखपुरला गेले. होसबाळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला थांबू की मुंबईला जाऊ, असंही विचारलं. पण काहीच उत्तर मिळालं नाही. त्यानंतर ते लखनऊवरून मुंबईला निघून गेले."

या घटनाक्रमाला भाजपच्या काही नेत्यांनीही दुजोरा दिला. याचा सरळसाधा राजकीय अर्थ असाही काढता येतो की, योगी आदित्यनाथ केंद्र सरकार किंवा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे 'रबर स्टँप' म्हणून काम करू इच्छित नाहीत. केंद्रीय नेतृत्वालाही ते हाच संकेत देत आहेत.

योगी आदित्यनाथ किती सामर्थ्यवान?

ज्येष्ठ पत्रकार योगेश मिश्र सांगतात की, योगी आदित्यनाथ हे सध्या तरी केंद्रीय नेतृत्वाला आव्हान देण्याच्या परिस्थितीत नाहीत, मग त्यांनी कितीही प्रयत्न करू दे.

योगेश मिश्र सांगतात, "योगी हे अचिव्हर नाहीयेत, नामनिर्देशित आहेत. त्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची देण्यात आली आहे. ते पक्षाचे कोणतेही पदाधिकारीही नव्हते. त्यामुळेच ते केंद्रीय नेतृत्वाला आव्हान देऊ शकत नाहीत.

उत्तर प्रदेशमध्ये 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत जर पराभव पत्करावा लागला तर त्याचा परिणाम 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक निकालांवर होऊ शकतो. हीच केंद्रीय नेतृत्वाची अडचण आहे. पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ही भीती अजूनच वाढली आहे. केंद्रीय नेतृत्व त्यामुळेच उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणतीही जोखीम पत्करू इच्छित नाही."

आदित्यनाथ

फोटो स्रोत, Getty Images

काही राजकीय विश्लेषक असंही सांगतात की, योगी आदित्यनाथ यांच्या बाजूने ना मोठ्या संख्येनं आमदार आहेत ना मंत्री आहेत. सध्या संघही खंबीरपणे त्यांच्या बाजूने उभं राहत नाहीये.

संघाच्या पदाधिकाऱ्यांच्याही पक्षाच्या आमदारांप्रमाणे नोकरशाहीबद्दल तक्रारी आहेतच. पर्यवेक्षकांच्या मते पक्ष आणि संघ सध्या बैठका घेऊन योगींना हटवल्यामुळे किती नुकसान होऊ शकतं याचा अंदाज घेत आहेत.

सिद्धार्थ कलहंस सांगतात की, योगी आदित्यनाथ यांच्या बाजूने असलेली सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर वैयक्तिकरित्या कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही किंवा इतर कोणताही व्यक्तिगत आक्षेप नाही. या एका जमेच्या बाजूमुळे योगींच्या इतर उणीवा झाकल्या जात आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)