You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिलीप कुमारांना राज कपूर यांनी म्हटलं होतं, 'तू आजवरचा सर्वांत महान अभिनेता आहेस'
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ही गोष्ट 1999 मधली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या एडीसीनं येऊन त्यांना सांगितलं की, भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा फोन आहे. त्यांना तुमच्याशी लगेच बोलायचं आहे.
शरीफ यांनी फोन घेतला तेव्हा वाजपेयी त्यांना म्हणाले, "एकीकडं तुम्ही आमचं लाहोरमध्ये अत्यंत उत्साहात स्वागत करत होते, पण दुसरीकडं तुमचं लष्कर कारगिलमध्ये आमच्या भूमीवर आक्रमण करत होतं.
नवाज शरीफ यांनी उत्तर दिलं की, याची मला काहीही माहिती नाही. मला थोडा वेळ द्या. मी आमचे लष्करप्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांच्याशी बोलून तुम्हाला लगेच फोन करतो.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद मेहमूद कसुरी यांनी त्यांच्या 'नीदर अ हॉक नॉर अ डव' या आत्मचरित्रामध्ये असं लिहिलं आहे की, "फोन ठेवण्यापूर्वी वाजपेयी यांनी नवाज शरीफ यांना म्हटलं होतं, माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही त्या व्यक्तीशी बोलावं जो सध्या माझ्या शेजारी बसला आहे आणि आपलं हे बोलणं ऐकत आहे."
नवाज शरीफ यांनी त्यांनतर फोनवर जो आवाज ऐकला तो केवळ शरीफच नव्हे तर संपूर्ण भारतीय उपखंडासाठी चांगलाच परिचयाचा होता. हा आवाज होता, अनेक पिढ्यांपासून भारत आणि पाकिस्तानच्या चित्रपट प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिलीप कुमार यांचा.
दिलीप कुमार म्हणाले, 'मियाँ साहेब, आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्हाला कदाचित माहिती नाही की, प्रत्येक वेळी जेव्हा भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणावाचं वातावरण निर्माण होतं, तेव्हा भारतीय मुस्लिमांची स्थिती अत्यंत विचित्र होते. त्यांना घराबाहेर निघणंही कठीण होतं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही तरी करा.'
दिलीप कुमार यानी सहा दशकांच्या अभिनयाच्या दीर्घ कारकिर्दीमध्ये केवळ 63 चित्रपट केले होते. पण त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय कलेला एक वेगळी ओळख मिळवून दिली होती.
एक काळ असा होता, जेव्हा दिलीप कुमार भारताचे 'सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू' बनण्याचं स्वप्न पाहत होते.
खालसा कॉलेजमध्ये त्यांच्याबरोबर शिकणारे राज कपूर जेव्हा पारसी तरुणींशी फ्लर्ट करत होते, तेव्हा टांग्याच्या एका कोपऱ्यात बसलेले, लाजाळू स्वभावाचे दिलीप कुमार त्यांना न्याहळत असायचे.
त्यावेळी कुणालाही असं वाटलं नसेल की, हा व्यक्ती एक दिवस भारतीय चित्रपट चाहत्यांना मौनाची भाषा काय असते ते शिकवेल.
आणि त्यांच्या केवळ एका नजरेनं, त्या सर्व भावना प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकतील, ज्या अनेक पानांवर लिहिलेल्या डायलॉगमधूनही पोहोचवणं एखाद्याला शक्य होणार नाही!
दिलीप कुमार, राज कपूर आणि देव आनंद यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील त्रिमूर्ती म्हणून ओळखलं जातं. पण अभिनयाचे जेवढे अधिक पैलू दिलीप कुमार यांच्या अभिनयात होते, तेवढे कदाचित या दोघांच्या अभिनयामध्येही नव्हते.
राज कपूर यांनी चार्ली चॅप्लिन यांना आदर्श मानलं, तर देव आनंद ग्रेगरी पेक यांच्यासारख्या सुसंस्कृत, एक वेगळी छटा असलेल्या व्यक्तीच्या इमेजमधून बाहेरच आले नाहीत.
दिलीप कुमार यांनी 'गंगा जमना'मध्ये एका ग्रामीण भागातील व्यक्तीची भूमिका जेवढ्या सुंदर पद्धतीनं साकारली होती, तेवढाच न्याय त्यांनी 'मुघल-ए-आझम' मधील शहजाद्याच्या भूमिकेला दिला होता.
देविका राणी यांच्याबरोबर योगायोगानं झालेल्या भेटीनं दिलीप कुमार यांचं अवघं जीवनच बदलून टाकलं. तसं पाहता देविका राणी चाळीसच्या दशकात भारतीय चित्रपट सृष्टीतील फार मोठं नाव होतं, पण त्यापेक्षाही चित्रपट सृष्टीला त्यांचं योगदान म्हणजे, पेशावरमधील फळ व्यापाऱ्यांचा मुलगा युसूफ खानला 'दिलीप कुमार' बनवणं.
एका चित्रपटाची शुटिंग पाहण्यासाठी बॉम्बे टॉकीजला गेलेल्या हँडसम युसूफ खान यांना त्यांनी विचारलं होतं की, तुम्हाला उर्दू येतं का? युसूफ यांनी 'हो' म्हणताच त्यांचा दुसरा प्रश्न होता, तुम्हाला अभिनेता बनायला आवडेल का? त्यानंतर जे घडलं तो भारतीय चित्रपट सृष्टीचा सुवर्णइतिहास आहे.
युसूफ खान बनले दिलीप कुमार
देविका राणी यांना असं वाटत होतं की, एका रोमँटिक हिरोपेक्षा अधिक दिलीप कुमार यांना फार नाव कमावता येणार नाही.
त्यावेळी बॉम्बे टॉकीजमध्ये काम करणारे आणि नंतर हिंदीतील मोठे कवी म्हणून नावारुपाला आलेले नरेंद्र शर्मा यांनी त्यांना तीन नावं सुचवलं होती, जहाँगीर, वासुदेव आणि दिलीप कुमार. यूसुफ खान यांनी त्यांच्यासाठी दिलीप कुमार नाव निवडलं.
त्यामागं एक कारण हेही होतं की, या नावामुळं त्यांच्या जुन्या विचारांचा पगडा असलेल्या वडिलांना त्यांचं नेमकं काम काय हे कळणार नव्हतं. चित्रपट बनवणाऱ्यांबाबत त्यांच्या वडिलांची मतं फार चांगली नव्हती आणि ते अशा सर्वांना नौटंकीवाले म्हणून त्यांची खिल्ली उडवायचे.
रंजक बाब म्हणजे संपूर्ण कारकिर्दीमध्ये दिलीप कुमार यांनी केवळ एका चित्रपटात मुस्लिम पात्र साकारलं आणि तो चित्रपट होता के. आसिफ यांचा 'मुघल-ए-आझम'.
सितार वाजवण्याचं प्रशिक्षण
सहा दशकांच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये दिलीप कुमार यांनी एकूण 63 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आणि प्रत्येक भूमिकेत त्यांनी सर्वस्व ओतून अभिनय केला होता.
कोहिनूर चित्रपटाच्या एका गाण्यात सतार वाजण्याच्या भूमिकेसाठी त्यांनी अनेक वर्ष उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांच्याकडून सितार वाजवण्याचं प्रशिक्षण घेतलं. बीबीसी बरोबर बोलताना दिलीप कुमार यांनी म्हटलं होतं की, 'केवळ सतार कशी पकडायची हे शिकण्यासाठी मी सात वर्षे सितार वाजवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. एवढंच नाही तर सतारच्या तारांमुळं माझ्या हाताची बोटंही कापली होती.'
त्याचप्रमाणे 'नया दौर' चित्रपट तयार होत असतानाही त्यांनी टांगा चालवणाऱ्यांकडून प्रशिक्षण घेतलं होतं. त्यामुळंच प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजीत राय यांनी त्यांना सर्वोत्कृष्ट 'मेथड अभिनेता' अशी पदवी दिली होती.
मधुबालाबरोबर वाद
दिलीप कुमार यांनी अनेक अभिनेत्रींबरोबर काम केलं पण त्यांची जोडी सर्वाधिक पसंत केली गेली मधुबाला यांच्याबरोबर. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेमही जडलं होतं.
आत्मचरित्रामध्ये दिलीप कुमार यांनी हे स्वीकारलं की, मधुबाला यांच्याबद्दल त्यांना एक महिला म्हणून आणि एक कलाकार म्हणूनदेखील तेवढंच आकर्षण होतं. दिलीप कुमार म्हणतात की, मधुबाला अत्यंत आनंदी आणि उत्साही महिला होती. तिला माझ्यासारख्या लाजाळू आणि संकोच वाटणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधायलाही काहीच अडचण येत नव्हती.
पण मधुबाला यांच्या वडिलांमुळं दोघांचं प्रेम यशस्वी होऊ शकलं नाही. मधुबाला यांची लहान बहीण मधुर भूषण आठणी सांगतात म्हणतात की, "दिलीप कुमार यांचं वय त्यांच्यापेक्षा जास्त आहे, असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. खरं तर ते दोघं एकमेकांसाठी 'मेड फॉर इच अदर' होते. अत्यंत सुंदर अशी 'जोडी' होती. पण वडील म्हणायचे की, हा विषय सोडून द्या, हे योग्य नाही."
तरीही मधुबाला ऐकत नव्हत्या, त्या म्हणायच्या की माझं त्यांच्यावर प्रेम आहे. पण बी.आर.चोप्रा यांच्याबरोबर 'नया दौर'चित्रपटाच्या मुद्द्यावरून कोर्टापर्यंत प्रकरण पोहोचलं तेव्हा माझे वडील आणि दिलीप साहब यांच्यात वाद झाले. नंतर न्यायालयात त्यांचा वाद मिटला होता.
दिलीप साहब म्हणाले, "चल, आपण लग्न करून घेऊ. त्यावर मधुबाला म्हणाल्या की, मी लग्न जरूर करेल, पण आधी तुम्ही माझ्या वडिलांची माफी मागा. दिलीप कुमार यांनी मात्र माफी मागायला नकार दिला. मधुबाला असंही म्हणाल्या की, घरामध्येच त्यांच्याबरोबचा वाद मिटवा पण दिलीप कुमार त्यासाठीही राजी झाले नाही."
त्या मुद्द्यावरूनच या दोघांमध्ये ब्रेक अप झालं. 'मुघल-ए-आझम' तयार होत असताना हा वाद एवढा वाढलेला होता की, त्या दोघांनी एकमेकांशी बोलणंही बंद केलं होतं. 'मुघल-ए-आझम' चित्रपटातील क्लासिक समजला जाणारा रोमँटिक सीन अशा परिस्थितीत चित्रित करण्यात आला होता, जेव्हा या दोघांनी सार्वजनिकरित्या एकमेकांना ओळख देणंही बंद केलं होतं.
सायरा बानो यांच्याशी दिलीप कुमार यांच्या लग्नानंतर जेव्हा मधुबाला खूप आजारी होत्या, तेव्हा त्यांनी दिलीप कुमार यांना संदेश पाठवून त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
जेव्हा ते त्यांना भेटायला गेले, तेव्हा मधुबाला अत्यंत अशक्त झालेल्या होत्या. दिलीप कुमार यांना त्यांना पाहून अत्यंत दुःख झालं. कायम हसत राहणाऱ्या मधुबाला यांच्या ओठांवर त्यादिवशी खूप प्रयत्न केल्यानंतर एक अगदी हलकं हास्य उमटलं होतं.
मधुबालाने त्यांच्याकडं पाहत म्हटलं, "आमच्या शहजाद्यांना त्यांची शहजादी भेटली, मी खूप आनंदी आहे."
राजकपूर यांचं कौतुक
मुघल-ए-आझम नंतर ज्या चित्रपटात दिलीप कुमार यांचं सर्वाधिक कौतुक झालं, तो होता गंगा जमुना.
अमिताभ बच्चन यांच्या मते, ते जेव्हा अलाहाबादमध्ये शिकत होते, तेव्हा केवळ एका गोष्टीसाठी त्यांनी हा चित्रपट वारंवार पाहिला होता, ती म्हणजे एक असा पठाण ज्याचा उत्तर प्रदेशबरोबर दूर-दूर पर्यंत काहीही संबंध नव्हता, तो त्याठिकाणची भाषा एवढ्या अचूकपणे कशी बोलू शकतो.
त्यानंतर दोघांनी रमेश सिप्पी यांच्या 'शक्ती' चित्रपटात एकत्र काम केलं. त्यांचे समकालीन, प्रतिस्पर्धी आणि बालपणीचे मित्र 'राज कपूर' यांनी 'शक्ती' चित्रपट पाहिल्यानंतर फोन करून त्यांना म्हटलं होतं की, 'लाडे, आज यावर शिक्कामोर्तब झालं आहे की, तू आजवरचा सर्वात महान अभिनेता आहेस!'
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)