You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'अजित पवारांसोबतच्या शपथविधीमुळे प्रतिमेला तडा गेला' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) अजित पवारांसोबतच्या शपथविधीमुळे प्रतिमेला तडा गेला - फडणवीस
अजित पवारांसोबतच्या शपथविधीमुळे आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी हे सांगितलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणं हा चुकीचा निर्णय होता. राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करायला नको होतं."
तसंच, अजित पवार यांच्यासोबतच्या शपथविधीमुळे आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. राजकारणात तुम्ही मेलात तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसणाऱ्याला आम्हाला उत्तर द्यायचं होतं. त्यावेळच्या भावना आणि राग होता. त्यातून आम्ही ते केलं. परंतु ते चुकीचं होतं आणि आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही. त्यांच्यात माझी जी प्रतिमा होती त्याला काहीशा प्रमाणात तडा गेला," असं फडणवीस म्हणाले.
"आपला तो निर्णय चुकीचाच होता, पण त्याचा आता पश्चाताप नाही"असंही फडणवीसांनी नमूद केलं.
2) भारतानं रोडमॅप समोर ठेवावा, चर्चेला तयार - इम्रान खान
भारतानं काश्मीरचा जुना दर्जा पुन्हा देण्याच्या दृष्टीने रोडमॅप ठेवल्यास चर्चा करायला तयार आहोत, असं मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी (4 जून) व्यक्त केलं. रॉयटर्स या वृत्तसेवा संस्थेनं ही बातमी दिली आहे.
काश्मीरवरील नियंत्रणावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये वर्षानुवर्षे वाद सुरू आहे. 2019 मध्ये भारतानं काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढला आणि या वादाला नव्या चर्चेचं रूप आलंय.
"जर रोडमॅप असेल, तर होय, आम्ही चर्चेला तयार आहोत," असं इम्रान खान यांनी इस्लामाबादमधील त्यांच्या शासकीय निवासस्थानी रॉयटर्सशी बोलताना म्हटलं.
"संयुक्त राष्ट्राचा प्रस्ताव आणि आंतरराष्ट्रीय कायद्याविरोधात घेतलेले बेकायदेशीर निर्णय मागे घेण्यासाठी अशी पावलं उचलू, असा काही रोडमॅप असेल, तरच ते स्वीकारार्ह आहे," असंही इम्रान खान यांनी नमूद केलं.
भारतीय पराष्ट्र मंत्रालयानं अद्याप इम्रान खान यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली नाही.
3) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा राज्यात स्वबळाचा नारा
स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवेल, असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.
नाना पटोले म्हणाले, "काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम केले पाहिजे. उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता, आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून 2024 मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल यासाठी काम करा."
काँग्रेस पक्ष हा देशाला तारणारा, सर्व जाती-धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून भाजपनं खोटी स्वप्नं दाखवून देशाला अधोगतीकडं नेण्याचं काम केलंय, असंही पटोले म्हणाले.
धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी नाना पटोलेंनी उपस्थितांशी संवाद साधला.
4) नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा का आरक्षण दिलं नाही? - अजित पवार
शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही? असा प्रश्न विचारणाऱ्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.
"नारायण राणे मुख्यंमत्री होते, तेव्हा त्यांनी का नाही दिलं आरक्षण? ही काय पद्धत झाली का? हे इतक्यावेळी मुख्यमंत्री होते, ते तितक्यावेळी मुख्यमंत्री होते," असं म्हणत अजित पवारांनी राणेंवर निशाणा साधला. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
"इतरवेळी म्हणायचं शरद पवार आमचे नेते आहेत, शरद पवारांचं वाकून दर्शन घ्यायचं आणि नंतर आपण काहीतरी वेगळं सांगतोय, असं करून शरद पवारांबद्दल अशाप्रकारचं वक्तव्य करायचं," असंही अजित पवार राणेंना उद्देशून म्हणाले.
कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिकाच राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचंही अजित पवार म्हणाले.
5) कोरोनामुक्त गावांना मिळणार 50 लाखांचं बक्षीस
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं 'कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना' सुरू केली आहे. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय.
या योजनेअंतर्गत प्रत्येक महसुली विभागात पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख, 25 लाख आणि 15 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. याशिवाय, इतक्याच रकमेची विकासकामंही मंजूर केली जातील.
जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या योजनेत नाव नोंदवावं आणि सहभागी व्हावं, असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता. )