You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवार : 'मी वाटच बघतोय ते सरकार कधी कोसळवतात,' चंद्रकांत पाटलांच्या भाकिताला प्रत्युत्तर
महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळेल या चंद्रकांत पाटील यांच्या भाकितावर प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी "मी वाटच बघतोय की सरकार कधी कोसळवतात," असं मिश्किलपणे म्हटलंय.
महाविकास आघाडीचं हे सरकार कधीही कोसळू शकतं असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,
"अरे बाप रे, लोक झोपेत असताना! ते (चंद्रकांत पाटील) म्हणाले होते की, अजित पवारांनी माझ्या नादाला लागू नये. मी जर बोलायला लागलो तर फटकळ आहे, अमकं आहे तमकं आहे. कशाला उगीच त्यांच्या नादाला लागायचं. आपलं बरं आहे दुरून डोंगर साजरा."
पण पत्रकारांनी पुन्हा त्यांना तोच प्रश्न विचारल्यावर मात्र मिश्किलपणे अजित पवार म्हणाले,
"मी वाटच बघतोय ते कधी सरकार कोसळवतात. मी सारखं झोपेतून जागा होतो. अरे पडलं की काय सरकार? लगेच टीव्ही लावतो, हे चॅनेल लाव, ते चॅनेल लावं. पडलं, पडलं, पडलं. मी किती वेळा सांगितलं की हे तीन नेते एकत्र आहे तोपर्यंत कुणीही मायचा लाल सरकार पाडू शकत नाही. समजलं?"
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना शिस्त लावावी या देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना "उद्धव ठाकरे मी यांना सांगतो की त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची शिकवणी लावा मी पण त्यांच्याकडून शिकवणी घेतो," असं उत्तर दिलं आहे.
महाविकास आघाडीमध्ये सगळे जण एकोप्याने राहत असून, जिथे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी उमेदवार होते तिथे कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्याचा प्रयत्न करू, असंही अजित पवार म्हणाले.
वारीसाठी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती
वारीबाबत निर्णय घेण्यासाठी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर वारीबद्दलचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.
कुंभमेळा मोठा झाल्याने कोरोना वाढला, वारीमध्ये नुसत्या पादुका नेल्या तरी गर्दी होऊ शकते म्हणून सौरभ राव समितीच्या अहवालानुसार निर्णय घेणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय.
राज्यामध्ये म्युकर मायकोसिससाठीच्या इंजेक्शनची कमतरता अजूनही भासत असल्याचं अजित पवार म्हणाले. यासोबतच कोव्हिडच्या उपचारांसाठी लागणारी साधनं, औषधं याचे दर काय असावेत, याबाबत केंद्राच्या जीएसटी समितीमध्ये चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलंय.
खडकी कॅन्टोन्मेंट आणि पुणे कॅन्टोन्मेंट पुणे शहरात धरावेत, शहराचे नियम तिथे सुद्धा असावेत असं अजित पवारांनी म्हटलंय. सोबतच पुणे शहरातली सलून्स आणि ब्युटी पार्लरबाबत सोमवारी निर्णय घेण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. पुण्याचा पॉझिटिव्हट रेट असाच कमी राहिला तर निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याचा विचार करण्याचंही ते म्हणाले आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)