World Test Championship : रविंद्र जाडेजाला संघात स्थान, वाचा भारताच्या अंतिम 11 खेळाडूंच्या यादीत कुणाला मिळाली संधी?

फोटो स्रोत, Kai Schwoerer
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
पहिल्या वहिल्या जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 18 जूनपासून इंग्लंडच्या साऊदॅम्प्टन शहरात सुरू होणार आहे. या मॅचसाठी अंतिम 11 खेळाडूंची घोषणा सामन्याच्या एक दिवस आधी (गुरुवार) करण्यात आली.
या संघात हनुमा विहारी आणि रविंद्र जाडेजा यांच्यापैकी कुणाचा संघात समावेश होतो, याबाबत सर्वांना उत्सुकता होती. पण अखेर रविंद्र जाडेजाला संघात स्थान देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे.
कशी आहे अंतिम 11 खेळाडूंची भारतीय टीम?
विराट कोहली (कप्तान), अजिंक्य रहाणे (उपकप्तान), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील या टीममध्ये मयांक अगरवाल आणि के. एल. राहुल या दोन सलामीवीरांना वगळण्यात आलंय. याचा अर्थ सलामीला रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी उतरेल. मधल्या फळीची जबाबदारी स्वत: कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्यावर असेल.
हनुमा विहारी आणि रवींद्र जाडेजा या दोघांनाही पंधरा जणांमध्ये स्थान मिळालंय. पण दोघांपैकी एकच अंतिम सामन्यात खेळू शकेल अशी शक्यता आहे. हनुमा विहारी इंग्लंड विरुद्धच्या भारतातील सीरिजमध्ये दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळते की, जुन्या जाणत्या रवींद्र जाडेजाच्या बाजूने कोहली कौल देतो हे 18 तारखेला कळेलच.
जाडेजाचा वापर पार्ट टाईम स्पिन गोलंदाज म्हणूनही होऊ शकतो. ऋषभ पंतला विकेट कीपिंगसाठी 'बॅक अप' म्हणून वृद्धिमान साहाची निवड झालीय, तर रवीचंद्रन अश्विनवर स्पिनची धुरा असणार आहे.
पाच फास्ट बोलरची अंतिम टीममध्ये निवड झालीय. पण, यात महाराष्ट्राच्या शार्दुल ठाकूर ऐवजी उमेश यादवची वर्णी लागलीय. इतर गोलंदाज असतील ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा, महम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

फोटो स्रोत, Getty Images
18 जूनला भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी साडे तीनला ही मॅच सुरू होणार आहे. पण, साऊदॅम्पटनमध्ये मॅचच्या पाचही दिवसांसाठी 70-90% पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मॅच पूर्ण होईल का ही शंकाही उपस्थित केली जातेय. अंतिम मॅचसाठी 23 जून हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.
पहिलीच वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल होणार आहे. कसोटी प्रकाराची लोकप्रियता वाढावी यादृष्टीने पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियनशिप खेळवण्यात येणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इंग्लंडमधल्या साऊदॅम्पटन इथे ही फायनल होणार आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी दोन्ही टीम सध्या जय्यत तयारी करत आहेत. फायनल ड्रॉ किंवा टाय झाली तर कोणत्या संघाला विजेतेपद मिळणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. फायनल ड्रॉ म्हणजे अनिर्णित किंवा टाय म्हणजे बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघांना स्पर्धेचे संयुक्त विजेते म्हणून घोषित केलं जाईल असं आयसीसीने जाहीर केलं.
या फायनलसाठी 23 जून हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. पाच दिवसांच्या खेळात पावसामुळे किंवा कोणत्या अन्य कारणांमुळे अडथळा आला तर उर्वरित ओव्हर्स 23 जून रोजी खेळवण्यात येतील, असे आयसीसीने स्पष्ट केलं. मात्र पाच दिवस पूर्ण सामना झाल्यानंतरही निकाल न लागल्यास सहाव्या दिवशी खेळ होणार नाही.
हा सामना ग्रेड 1 ड्यूक बॉलने खेळवला जाणार आहे. याव्यतिरिक्त मैदानावरील अंपायरनी शॉर्ट रनच्या दिलेल्या निर्णयाचा रिव्ह्यू थर्ड अंपायर करणार आहे.
LBW चा निकाल दिल्यानंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमचा कॅप्टन किंवा आऊट झालेल्या बॅट्समन बॉल खेळण्याचा प्रयत्न केला होता का? हे मैदानातील अंपायरला विचारणा करुन प्लेयर रिव्ह्यू घेऊ शकतो.
LBW च्या निर्णयाची समीक्षा करण्यासाठी स्टम्पवर आदळणाऱ्या बॉलची उंची आणि लांबी यावरुन अम्पायर्स कॉलचा निर्णय घेण्यात येईल.
भारतीय संघासाठी काटेकोर उपाययोजना
भारतीय संघ इंग्लंडमध्ये 3 जून रोजी चार्टर्ड फ्लाईटद्वारे दाखल होईल. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ तसंच प्रशासकीय अधिकारी सगळ्यांना निगेटिव्ह पीसीआर टेस्ट रिपोर्ट सादर करावा लागेल.
इंग्लंडमध्ये दाखल होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू मुंबईत 14 दिवस क्वारंटीनमध्ये आहेत. त्यांच्या कोरोनाच्या नियमित चाचण्या सुरू आहेत.
इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर भारतीय संघ हॅम्पशायर बोल इथल्या मैदानाइथल्याच हॉटेलात वास्तव्य करेल. सगळ्यांच्या पुन्हा चाचण्या घेतल्या जातील.
त्यांना क्वारंटीनमध्ये राहावं लागेल. यादरम्यान नियमितपणे चाचण्या घेतल्या जातील. बायोबबलचं कठोर पालन करावं लागेल.
भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, लोकेश राहुल आणि वृद्धिमान साहा (फिटनेस सिद्ध केल्यास सहभागी), के.एस.भरत.
स्टँडबाय-अभिमन्यू इश्वरन, अवेश खान, प्रसिध कृष्णा, अर्झान नागवासवाला
भारताचा फायनलपर्यंतचा प्रवास
भारतीय संघाने वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीवर 2-0 असा विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली. भारताने पहिली कसोटी 318 तर दुसरी 257 धावांनी जिंकली होती.
इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनी भेदक गोलंदाजी करत विजयात निर्णायक भूमिका बजावली होती.
हनुमा विहारीने कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक झळकावलं होतं. विहारीला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला 3-0 असं नमवलं. रोहित शर्माने या मालिकेदरम्यान कसोटीत सलामीवीर म्हणून पदार्पण केलं.

फोटो स्रोत, Getty Images
मयांक अगरवालने सलग दोन शतकं झळकावली. रोहित शर्मानेही दोन शतकांची लयलूट केली. कर्णधार विराट कोहलीने द्विशतकी खेळी साकारली.
यानंतर भारतीय संघाने बांगलादेशचा 2-0 असा धुव्वा उडवला. इशांत शर्माला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
न्यूझीलंडविरुद्ध मात्र भारतीय संघाला सपशेल पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडने 2-0 असं हरवत दणदणीत विजय मिळवला. पहिल्या कसोटीत टीम साऊदीने तर दुसऱ्या कसोटीत कायले जेमिसनने भारतीय संघाची दाणादाण उडवली.
ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला चीतपट करणं अतिशय अवघड समजलं जातं. सलामीच्या कसोटीत भारतीय संघाचा 36 धावात खुर्दा उडाला. पॅटर्निटी लिव्हसाठी विराट कोहली मायदेशी परतला.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला दुखापतींनी बेजार केलं. अनुनभवी भारतीय संघाने सगळ्या अडथळ्यांना पार करत थरारक विजय साकारला.

फोटो स्रोत, David Ashdown
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवला. अजिंक्य रहाणेच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने दुसरी कसोटी जिंकली. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयाची संधी होती. मात्र ऋषभ पंतने दमदार खेळी करत भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. ऋषभ बाद झाल्यानंतर हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन यांनी चिवटपणे खेळ करत सामना अनिर्णित राखली.
चौथ्या कसोटीत ऋषभच्या आणखी एक दिमाखदार खेळीच्या बळावर भारतीय संघाने संस्मरणीय विजय साकारला. वॉशिंग्टन सुंदर, टी.नटराजन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शुभमन गिल या युवा खेळाडूंनी विजयात उल्लेखनीय योगदान दिलं.
यानंतर भारताने घरच्या मैदानावर इंग्लंडला 3-1 नमवलं. रवीचंद्रन अश्विनने 32विकेट्स पटकावत मालिकावीर पुरस्कार पटकावला.
इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम
18 ते 22 जून- भारत वि. न्यूझीलंड, साऊटॅम्प्टन, फायनल
4 ते 8 ऑगस्ट- भारत वि. इंग्लंड- नॉटिंगहॅम, पहिली कसोटी
12 ते 16 ऑगस्ट- भारत वि. इंग्लंड- लॉर्ड्स, दुसरी कसोटी
25 ते 29 ऑगस्ट- भारत वि. इंग्लंड-लीड्स, तिसरी कसोटी
2 ते 6 ऑगस्ट- भारत वि. इंग्लंड-ओव्हल, चौथी कसोटी
10 ते 14 ऑगस्ट- भारत वि. इंग्लंड-मँचेस्टर, पाचवी कसोटी
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








