WTC: पाकिस्तानने भारताच्या पर्यायी क्रिकेट संघातील बदलाला आक्षेप घेतला होता तेव्हा...

फोटो स्रोत, OLI SCARFF
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दौऱ्यावर आहे. त्याच वेळी पर्यायी भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे.
एकाचवेळी दोन भारतीय संघ खेळतील. मात्र याआधी जेव्हा भारताने दोन संघांचा प्रयोग केला होता तेव्हा पाकिस्तानने त्यातील बदलाला आक्षेप घेतला होता. काय झालं होतं तेव्हा नेमकं जाणून घेऊया.
ही गोष्ट 1998 मधली. त्या वर्षी मलेशियातल्या क्वालालंपूर इथे कॉमनवेल्थ गेम्स अर्थात राष्ट्रकुल स्पर्धा होणार होती. त्याच काळात कॅनडातल्या टोरंटो इथे सहारा कप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रकुल स्पर्धेत त्यावेळी पहिल्यांदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. 16 संघ सहभागी झाले होते.
दुसरीकडे सहारा कप भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान आयोजित करण्यात आलेली वनडे सामन्यांची स्पर्धा होती. लोकप्रियता आणि पैशाचा विचार करता भारत आणि पाकिस्तान मुकाबला खपणीय होता. कारण त्यावेळी भारत आणि पाकिस्तान सामन्यांच्या वेळी प्रचंड उत्कंठा असे. या सामन्यांना टीव्हीवर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकवर्ग असे. बोर्ड तसंच प्रक्षेपणकर्त्या कंपनीसाठी भारत-पाकिस्तान मालिका म्हणजे पैसा आणि यशाची बेगमी असे.
याउलट राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच समावेश होत असल्याने तिथल्या सामन्यांबद्दल तेवढी उत्सुकता नव्हती. राष्ट्रकुल स्पर्धेत बाकी खेळप्रकारात सहभागी होणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या कामगिरीबाबत उत्सुकता होती. एकप्रकारे सहारा कप आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सहभाग हे एकीकडे पैसा तर दुसरीकडे देशासाठी पदक जिंकणं यातला मुकाबला होता.
बीसीसीआयने दोन्ही ठिकाणी संघ पाठवायचं ठरवलं. मुख्य संघ एकीकडे आणि दुय्यम संघ दुसरीकडे अशी विभागणी न करता बीसीसीआयने प्रमुख खेळाडूंना दोन संघात विभागलं आणि त्यांच्या जोडीला नव्या खेळाडूंची फौज दिली.
कॅनडात होणाऱ्या सहारा कपसाठी मोहम्मद अझरुद्दीन कर्णधार होता. या संघात सौरव गांगुली, नवज्योत सिंग सिद्धू, राहुल द्रविड, हृषिकेश कानिटकर, जतीन परांजपे, नयन मोंगिया, सुनील जोशी, अजित आगरकर, जवागल श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद, संजय राऊल यांचा समावेश होता.
क्वालालंपूर इथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी अजय जडेजाकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. अनिल कुंबळे उपकर्णधार होता. या संघात सचिन तेंडुलकर, निखिल चोप्रा, रोहन गावस्कर, हरभजन सिंग, गगन खोडा, अमेय खुरासिया, व्हीव्हीएस लक्ष्मण, पारस म्हांब्रे, देबाशिष मोहंती, एमएसके. प्रसाद, राहुल संघवी, रॉबिन सिंग यांचा समावेश होता.
यात मेख अशी होती की राष्ट्रकुल स्पर्धेत होणाऱ्या सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा नव्हता. या सगळ्या सामन्यांना 'लिस्ट ए' मॅचचा दर्जा देण्यात आला होता. सोप्या शब्दात सांगायचं तर राष्ट्रकुल स्पर्धेतली कामगिरी खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनता नोंदवली जाणार नव्हती. यामुळे साहजिकच भारत-पाकिस्तान मालिकेचं वजन वाढलं. कारण ही दोन देशांदरम्यान होत असलेली वनडे मालिका होती.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी कशी झाली?
राष्ट्रकुल स्पर्धेत 16 संघांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. ब गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, अँटिगा अँड बार्बुडा, कॅनडा यांचा समावेश होता. गटातील अव्वल संघ पुढच्या फेरीत जाणार होता. ऑस्ट्रेलिया आणि भारताचं पारडं जड होतं.

फोटो स्रोत, WILLIAM WEST
अँटिगाने भारताविरुद्ध 41 षटकांच्या सामन्यात 164 धावा केल्या. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारताची 30/2 अशी स्थिती होती. पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. हा सामना 9 सप्टेंबरला झाला.
अमेय खुरासियाच्या 83 धावांच्या खेळीच्या बळावर भारताने कॅनडाविरुद्ध 157 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना कॅनडाचा डाव 45 धावांतच आटोपला. कुंबळेने अकरा धावात 4 विकेट्स घेतल्या. हा सामना 12 सप्टेंबरला झाला.
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 255 धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव वॉने नाबाद 100 तर टॉम मूडीने नाबाद 78 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताचा डाव 109 धावांतच आटोपला. ब्रॅड यंगने 4 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागल्याने भारतीय क्रिकेट संघाचं राष्ट्रकुल स्पर्धेतलं आव्हान 15 सप्टेंबर रोजी संपुष्टात आलं.

फोटो स्रोत, Laurence Griffiths
राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम मुकाबला रंगला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
सहारा कपमध्ये काय घडत होतं?
12 सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला 189 धावाच करता आल्या. जवागल श्रीनाथ आणि सौरव गांगुली यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. गांगुलीने फलंदाजीतही चमक दाखवताना 54 धावांची खेळी केली. गांगुलीलाच सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं.

फोटो स्रोत, CARLO ALLEGRI
13 सप्टेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने 246 धावांची मजल मारली. मोईन खानने सर्वाधिक 69 तर शाहिद आफ्रिदीने 56 धावा केल्या. भारताचा डाव 195 धावांतच आटोपला. सलीम मलिकने चार तर अब्दुल रझ्झाकने तीन विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानने का घेतला भारतीय संघातील बदलाला आक्षेप?
तिसरी लढत 16 सप्टेंबर रोजी झाली. याचाच अर्थ हा सामना सुरू व्हायच्या एक दिवस आधी दूरवर मलेशियात राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणाऱ्या पर्यायी भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं होतं.
पाकिस्तानविरुद्धची ही मालिका महत्त्वाची असल्याने बीसीसीआयने राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघातील प्रमुख खेळाडूंना कॅनडाला पाठवण्याची तयारी सुरू केली. मात्र हे खेळाडू कॅनडात दाखल झाले तर भारतीय संघाला कुमक मिळेल, त्यांचा संघ बळकट होईल हे ओळखून पाकिस्तानने आक्षेप नोंदवला.

फोटो स्रोत, CARLO ALLEGRI
मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघात घाऊक बदल करणे हे योग्य नसल्याने बीसीसीआयने थोडं नमतं घेतलं.
बीसीसीआयने टोरंटोतल्या उर्वरित सामन्यांसाठी सचिन तेंडुलकर आणि अजय जडेजाला पाठवण्याचा निर्णय घेतला. मलेशिया, भारत, कॅनडा असा खेळाडूंचा प्रवास होणार होता. यादरम्यान 16 तारखेला तिसरा सामना झाला.
पाकिस्तानने या सामन्यात 257 धावा केल्या. इंझमाम उल हकने 81 धावांची शानदार खेळी केली. भारताचा डाव अवघ्या 180 धावातच आटोपला.

फोटो स्रोत, CARLO ALLEGRI
19 सप्टेंबरला झालेल्या चौथ्या सामन्यात क्वालालंपूरहून दाखल झालेला अजय जडेजा खेळला. पाकिस्तानने कामगिरीत सुधारणा करत 316 धावांचा डोंगर उभारला. त्याकाळी तीनशे धावा सहज होत नसत.
शाहिद आफ्रिदीने शतकी खेळी साकारली. इंझमामने 78 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. भारतीय संघाची फलंदाजी या सामन्यातही चालली नाही आणि डाव 182 धावातच गडगडला.
सकलेन मुश्ताकने तीन तर आमीर सोहेलने दोन विकेट्स घेतल्या. या विजयासह पाकिस्तानने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. पाचवा सामना डेड रबर (मालिकेत विजय पक्का झाल्यानंतर उरलेल्या लढतीचं महत्त्व कमी होतं) ठरणार होता.
दुसऱ्याच दिवशी म्हणजे 20 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात सचिन तेंडुलकरही खेळला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 256 धावा केल्या. कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने 101 धावांची खेळी केली. आपल्या समावेशाची ताकद दाखवून देत सचिन तेंडुलकरने 77 धावांचं योगदान दिलं.
पाकिस्तानने आमिर सोहेल (नाबाद 97) आणि सईद अन्वर (83) यांच्या बळावर पाच विकेट्स राखून सामना जिंकला. पाकिस्तानने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली.

फोटो स्रोत, CARLO ALLEGRI
इंझमाम उल हकला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं तर टोरंटो इथे झालेल्या मालिकेत पाकिस्तानने दणदणीत वर्चस्वासह विजय मिळवला.
यावेळेस परिस्थिती वेगळी कशी?
इंग्लंड दौऱ्यात प्रमुख भारतीय खेळाडू असणार आहेत तर श्रीलंका दौऱ्यात भारताचं प्रतिनिधित्व केलेले मात्र इंग्लंड दौऱ्यासाठी निवड न झालेले तसंच वनडे आणि ट्वेन्टी-20 विशेषज्ञांचा समावेश आहे.
इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे तर श्रीलंका दौऱ्यात वनडे आणि ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर भारतीय संघ महिनाभर इंग्लंडमध्येच असणार आहे. मात्र या काळात इंग्लंडहून श्रीलंकेला जाऊन, क्वारंटीन प्रक्रिया पूर्ण करून, वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिका खेळणं, पुन्हा इंग्लंडमध्ये परतून क्वारंटीनला सामोरं जाणं हे अवघड असल्याने बीसीसीआयने श्रीलंकेच्या दौऱ्यावर पर्यायी भारतीय संघ पाठवण्याचं ठरवलं.
इंग्लंड दौऱ्यासाठीचा संघ
विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, लोकेश राहुल, वृद्धिमान साहा, के.एस.भरत
राखीव-अभिमन्यू इश्वरन, अवेश खान, प्रसिध कृष्णा, अर्झान नागवासवाला
श्रीलंका दौऱ्यासाठी संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, मनीष पांडे, कृणाल आणि हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, देवदत्त पड्डीकल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, कृष्णप्पा गौतम, वरुण चक्रवर्ती, चेतन सकारिया.
राखीव-इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साईकिशोर, सिमरजीत सिंग
इंग्लंड दौ्ऱ्याचा कार्यक्रम
18 ते 22 जून- भारत वि. न्यूझीलंड, साऊटॅम्प्टन, फायनल
4 ते 8 ऑगस्ट- भारत वि. इंग्लंड- नॉटिंगहॅम, पहिली कसोटी
12 ते 16 ऑगस्ट- भारत वि. इंग्लंड- लॉर्ड्स, दुसरी कसोटी
25 ते 29 ऑगस्ट- भारत वि. इंग्लंड-लीड्स, तिसरी कसोटी
2 ते 6 ऑगस्ट- भारत वि. इंग्लंड-ओव्हल, चौथी कसोटी
10 ते 14 ऑगस्ट- भारत वि. इंग्लंड-मँचेस्टर, पाचवी कसोटी
श्रीलंका दौऱ्याचा कार्यक्रम
13 जुलै- पहिली वनडे-कोलंबो
16 जुलै-दुसरी वनडे-कोलंबो
18 जुलै- तिसरी वनडे-कोलंबो
21 जुलै- पहिली ट्वेन्टी20- कोलंबो
23 जुलै-दुसरी ट्वेन्टी-20 कोलंबो
25 जुलै-तिसरी ट्वेन्टी-20 कोलंबो
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








