कोरोना कुठे जन्माला आला याचा तपास अमेरिकचे गुप्तहेर का करत आहेत?

    • Author, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी

चीनच्या वुहानमध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये कोरोना व्हायरस पहिल्यांदा सापडला आणि त्यानंतर तो झपाट्याने जगभर पसरत गेला.

हा व्हायरस वटवाघुळं, खवल्या मांजर यांच्यासारख्या कुठल्यातरी प्राण्यातून माणसांमध्ये शिरला असा एक तर्क होता, दुसरा तर्क होता की चीनच्या एका प्रयोगशाळेत हा तयार केला गेला आणि नंतर तो अपघाताने किंवा हेतुपूर्वक बाहेर पसरला.

या दुसऱ्या तर्काला 'लॅब लीक थेअरी' असंही म्हणतात. ती एक 'कॉन्स्पिरसी थेअरी' आहे असं म्हणत अनेकांनी ती धुडकावून लावली होती. पण आता ती पुन्हा चर्चेत आलीय. इतकी की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गुप्तचर यंत्रणांना याची शहानिशा करायला सांगितलंय. कोरोना व्हायरस लॅबमधून पसरला या दाव्यामागे काय नवीन पुरावे आलेत?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना कोरोनाचा उगम नेमका कसा झाला याबद्दल नव्याने तपास करून 90 दिवसांत त्यांना अहवाल द्यायला सांगितलंय आणि त्यामुळे कोरोनाचा जन्म चीनच्या वुहानमधल्या एका प्रयोगशाळेत झाला का? या प्रश्नाने पुन्हा डोकं वर काढलंय.

बायडन यांच्यापूर्वी सत्तेत असलेले डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या इतर मंत्र्‍यांनी अनेकदा हा चिनी व्हायरस असल्याचं किंवा चीनने मुद्दाम पसरवल्याचं म्हटलं होतं. पण त्यांनी कधीच आपल्या दाव्यांसाठी कुठलेच पुरावे सादर केले नव्हते.

आता हे सगळं प्रकरण इतकं तापण्यामागे कारणंही तशीच आहेत. अमेरिकन माध्यमांमध्ये गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने आलेल्या बातम्या, अनेक नावाजलेल्या तज्ज्ञांनी या लॅब थेअरीबद्दल आपलं बदललेलं मत आणि चीनच्या बाजूने पारदर्शकतेचा अभाव.

राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय की 'अमेरिकन गुप्तचर यंत्रणा दोन शक्यतांकडे बोट दाखवतेय पण निष्कर्षाप्रत आलेली नाही. गुप्तचर यंत्रणांपैकी दोन संस्था संसर्गित प्राण्याकडून व्हायरस माणसांमध्ये शिरला याकडे झुकतायत तर एक प्रयोगशाळेत मूळ असल्याकडे. पण कोणती शक्यता अधिक आहे हे ठरवण्यासाठी पुरेशी माहिती नसल्यावर बहुमत झालेलं आहे.'

पण बायडन यांच्यावर अशीही टीका होतेय की, अमेरिकन संसदेची आणि परराष्ट्र मंत्रालयाचीही या प्रकरणातली चौकशी थांबवून ते आता स्वतःच या प्रकरणी चौकशी करून घेतायत किंवा WHO कडे जबाबदारी सरकवतायत.

2021 च्या मार्च महिन्यात अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर WHO आणि चिनी शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे तयार केलेल्या एका अहवालात म्हटलं होतं की 'कोव्हिड 19 ची सुरुवात प्रयोगशाळेतून झाली असण्याची शक्यता अत्यंत अल्प होती.' पण यावर अधिक अभ्यास करण्याची गरज असल्याचंही WHO ने मान्य केलं होतं.

कोव्हिडच्या काळात सगळ्या जगाला माहीत झालेल्या डॉ. अँथनी फाऊचींनी मे महिन्यातच म्हटलं की, हा व्हायरस प्राण्यांमधून माणसांमध्ये शिरला याची त्यांना खात्री आहे. पण तो नैसर्गिकरीत्या जन्माला आल्याबद्दल आता आपल्याला खात्री नसल्याचंही त्यांनी मान्य केलं. अमेरिकेच्या आरोग्यमंत्र्यांनी WHO च्या एका बैठकीत बोलताना या प्रकरणी एका जागतिक आणि पारदर्शक चौकशीची गरज असल्याचं पुन्हा एकदा बोलून दाखवलं.

ट्रंप राष्ट्राध्यक्ष असताना अनेकदा Wuhan Institute of Virology या वुहानमधल्या एका मोठ्या प्रयोगशाळेतून हा व्हायरस लीक झाल्याने दावे खूपदा केले गेले.

ज्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी बद्दल अमेरिकन नेते सतत टीका करतायत त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर त्यांनी असं म्हटलंय की "देशाच्या लोकसंख्येच्या आरोग्याकडे लक्ष देणं, शेतीचा शाश्वत विकास, तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर विषाणूशास्त्राच्या क्षेत्रात जैवसुरक्षा तसंच नव्याने पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगांबद्दल संशोधन करणं" ही त्यांची भूमिका आहे. इतरही अनेक गोष्टी त्यांनी यात म्हटल्या आहेत.

जगभरातल्या प्रयोगशाळांसाठी बायोसेफ्टी लेव्हलचे मानक WHO ने घालून दिलेले आहेत. यातली सर्वोच्च पातळी असते BSL-4 म्हणजे Bio Safety Level 4.

माणसांना घातक ठरू शकणाऱ्या जैविक घटकांवर संशोधन करण्याची परवानगी फक्त BSL 4 गटात येणाऱ्या प्रयोगशाळांनाच असते. वुहान इन्स्टिट्यूट या गटात येतं. 2015 मध्ये फ्रेंच तज्ज्ञांच्या मदतीने ही लॅब उभारण्यात आली होती आणि या WIV चे अनेक आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळांबरोबरही प्रकल्प सुरू असतात.

अलिकडेच अमेरिकन तपासयंत्रणांच्या हवाल्याने आलेल्या बाम्यांमध्ये याच वुहान इन्स्टिट्यूटमधल्या 3 शास्त्रज्ञांना नोव्हेंबर 2019 मध्ये, चीनने कोरोना व्हायरसबद्दल जगाला माहिती देण्यापूर्वी हॉस्पिटलाईझ करावं लागलं होतं अशा बातम्या आल्या आणि ही लॅब पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली.

'लॅब लीक' बद्दल आतापर्यंत काय काय घडलं?

23 जानेवारी 2020 ला डेली मेल ने दिलेल्या एका बातमीत वुहानमध्ये चीनने सार्स व्हायरसचा अभ्यास करण्यासाठी प्रयोगशाळा बांधल्याचं आणि त्यातून व्हायरस लीक होण्याची शक्यता अमेरिकन बायोसेफ्टी एक्सपर्ट्सनी वर्तवल्याचं म्हटलं होतं.

जानेवारी संपता संपता कोरोनाच्या चीनमधल्या पहिल्या 41 केसेसपैकी 13 लोक वुहानच्या मांस बाजाराच्या संपर्कात आले नव्हते अशाही बातम्या आल्या.

30 जानेवारी 2020 ला अमेरिकन सिनेटर टॉम कॉटन यांनी वुहानमध्ये चीनची एकमेव BSL4 दर्जाची प्रयोगशाळा आहे जी कोरोनाव्हायरसवरही काम करते असं म्हणत संशय व्यक्त केला होता. 3 फेब्रुवारीला नेचर या विज्ञानविषयक नियतकालिकात WIV च्या तज्ज्ञांनी तेव्हा सापडत पसरत असलेला कोरोना व्हायरस हा ते काम करत असलेल्या वटवाघुळांमधील व्हायरसशी 96 टक्के मिळताजुळता असल्याचं म्हटलं. अमेरिकन आणि चिनी सरकारमध्ये यानंतर आरोप-प्रत्यारोप झाले.

फेब्रुवारी 2019 ला लॅन्सेट नियतकालिकात 27 शास्त्रज्ञांनी लेख लिहून 'लॅब लीक' थेअरीवर ताशेरे ओढले. पीटर डासाक यांनी पुढाकार घेऊन हा लेख लिहून आणला होता. इकोहेल्थ अलायन्सचे ते अध्यक्ष होते. याच संस्थेने अमेरिकन निधीच्या सहाय्याने WIV मध्ये होणाऱ्या संशोधनाला अर्थसाहाय्य केलं होतं. पुढच्या काळात या सत्तावीस पैकी 3 शास्त्रज्ञांनी लॅब लीकची शक्यता पडताळून पाहायला हवी असं मत दिलं.

27 मार्च 2020 ला पहिल्यांदाच अमेरिकेच्या Defence Intelligency Agency ने 'प्रयोगशाळेतील असुरक्षित कारवाईमुळे' कोरोनाचा उगम झालेला असू शकतो ही शक्यता मान्य केली. महिनाभरानंतर अमेरिकेने Wuhan Institute ला जात असलेली आर्थिक मदत बंद केली. डोनाल्ड ट्रंप यांनी या थेअरीवर खूप जोर दिला, पण त्यांनी कधीच यासाठी कोणतेच पुरावे समोर आणले नाहीत.

पण एकीकडे अमेरिकन निवडणुकांचा धुराळा उडत असताना जगभरातल्या वैद्यकीय नियतकालिकांमधून आणि न्यूजपेपर्समधून 'नॉव्हेल कोरोना व्हायरस' ज्यामुळे कोव्हिड 19 हा आजार होतो तो प्रयोगशाळेत जन्माला आला असू शकतो ही शक्यता गंभीरपणे घेतली जाऊ लागली.

जानेवारी महिन्यात जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. कोरोना व्हायरस प्राण्यांमधून माणसांमध्ये शिरला की त्याचा जन्म कुठल्या प्रयोगशाळेत झाला या दोन्ही शक्यतांची गुप्तचर यंत्रणांना त्यांनी पडताळणी करायला सांगितलं. मे महिन्यात या चौकशीचा अहवाल आला पण तो निष्कर्षाप्रत आलेला नसल्याने त्यांनी आता पुढच्या तीन महिन्यात अधिक चौकशी करून अहवाल द्यायला सांगितलंय.

कोरोना व्हायरस प्रयोगशाळेतून पसरला हा दावा ठोस आणि विश्वासार्ह पुराव्यांअभावी बराच काळ फेटाळला जात होता. सुरुवातीला ज्यांनी हा दावा हिरीरीने मांडला आणि ज्याप्रकारे मांडला त्यावरून ती एक राजकीय चाल किंवा बिनबुडाची गोष्ट होती असाच अनेकांचा समज झाला. पण आता जसेजसे दखलपात्र पुरावे समोर यायला लागलेत तसं याला गांभीर्य येत चाललंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता. )