कोरोना- 'पीएम केअर' फंडातून मिळालेल्या व्हेन्टिलेटर्समध्ये घोटाळा झाल्याचा आरोप का होतोय?

व्हेंटीलेटर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 'पीएम केअर' फंडातून देण्यात आलेल्या व्हेन्टिलेटर्सच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. रुग्णालयाच्या टेक्निकल समितीने, "हे व्हेन्टिलेटर्स, कोव्हिडग्रस्तांसाठी योग्य नाहीत", असा अहवाल दिलाय.

रुग्णालयाच्या अधीष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी टेक्निकल समितीच्या रिपोर्टला दुजोरा दिलाय. "व्हेन्टिलेटर्स, ज्या वापरासाठी पाठवण्यात आले होते. त्या कामी ते आले नाहीत," असं डॉ. येळीकर म्हणाल्या.

तर, कंपनी व्यवस्थापनाशी याबाबत अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.

रुग्णालयाच्या या अहवालावरून आता राजकीय आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीये. तर, भाजपने व्हेन्टिलेटर्स धुळखात का पडले होते? असा पलटवार केलाय.

'पीएम केअर' फंडातून देण्यात येणाऱ्या व्हेन्टिलेटर्सबद्दल पंजाब आणि राजस्थानसारख्या राज्यांनीही तक्रार केली होती.

'व्हेन्टिलेटर्स कोव्हिड रुग्णांना फायदेशीर नाहीत'

कोव्हिड महामारीच्या काळात देशभरातील रुग्णालयांना मदत स्वरूपात 'PM Care' फंडातून व्हेन्टिलेटर्स आणि इतर वैद्यकीय उपकरणं पुरवण्यात आली होती. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालाही व्हेन्टिलेटर्स पुरवण्यात आले होते.

टेक्निकल समितीने दिलेल्या रिपोर्टबद्दल आम्ही औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्याशी संपर्क केला.

त्या म्हणाल्या, "टेक्निकल समितीने अहवाल दिला आहे. व्हेन्टिलेटर्स कामी येत नाहीत. व्हेन्टिलेटर्सच्या या मॉडेलमध्ये बिघाड आहे. कंपनीचे टेक्निशिअन ते दुरूस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना यश आलं तर चांगलंच आहे."

6 मे रोजी रुग्णालयाच्या टेक्निकल समितीने व्हॅन्टिलेटर्स योग्य नसल्याचा अहवाल दिला आहे.

डॉ. कानन येळीकर पुढे सांगतात, "गेल्यावर्षी देण्यात आलेले व्हेन्टिलेटर्स चांगले होते. त्यात काहीच बिघाड नव्हता."

रुग्णालयाच्या टेक्निकल समितीचा रिपोर्ट काय सांगतो?

एप्रिल महिन्याच्या 18 तारखेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वॉर्ड 6 ICU मध्ये व्हेन्टिलेटर्स लावण्यात आले. त्यानंतर कंपनीच्या टेक्निशिअनने याची तपासणी केली.

टेक्निकल कमिटीने आपल्या रिपोर्टमध्ये, चार महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत.

  • कोव्हिड रुग्णांसाठी व्हेन्टिलेशनच्या हेतूने याचा वापर होणार होता. पण, हा हेतू व्हेन्टिलेटर्स साध्य करत नाहीत
  • व्हेन्टिलेटर्स टायडल व्हॉल्यूम (श्वासोच्छवासात फुफ्फुसात आत-बाहेर करणारी हवा) देत नाहीत.
  • रुग्णांना याचा फायदा नाही.
  • त्यामुळे ICU व्हेन्टिलेटर्स म्हणून त्यांचा वापर करता आला नाही.

रुग्णालयाच्या अहवालानुसार, कंपनीचे अधिकारी व्हेन्टिलेटर्स दुरूस्त करून गेले. त्यानंतर व्हेन्टिलेटर्स पुन्हा रुग्णांसाठी वापरण्यात आले. पण, रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारत नव्हती.

औरंगाबादच्या रुग्णालयात गुजरातच्या ज्योती सीएनसी या कंपनीने व्हेन्टिलेटर्स दिले आहेत. या कंपनीच्या धमन-1 व्हॅन्टिलेटरबाबत अहमदाबादच्या डॉक्टरांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, तरी या कंपनीला ऑर्डर देण्यात आली होती.

चौकशीची मागणी

कोरोना महामारीच्या काळात सुरु करण्यात आलेला 'PM Care' फंड पहिल्यापासूनच वादाचा मुद्दा ठरलाय. विरोधकांनी 'PM Care' फंडला मिळालेल्या पैशाचं ऑडिट करण्याची मागणी केली होती.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

व्हेन्टिलेटर्स योग्य नसल्याचा रिपोर्ट रुग्णालय प्रशासनाने दिल्यामुळे, विरोधकांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीये.

याबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "पीएम केअर व्हेन्टिलेटर्सबाबत मोठ्या स्वरुपात तक्रार आली नाहीये. काही रुग्णालयातून तक्रारी येतात. त्यामुळे इंजिनिअर्स किंवा टेक्निकल लोक पाठवले तर त्याचा वापर करता येईल असं आम्ही सांगितलंय." "असं नाही की त्याचा वापर करता येत नाही. काही ठिकाणी बिघाड झाला असेल. मशिनमध्ये देखभालीची समस्या येऊ शकते." "बहुतांश व्हेन्टिलेटर्स वापरात आहेत. वापरात नसलेल्यांची देखभाल करावी लागेल. यावर राज्य सरकार लक्ष देईल. तंत्रज्ञ आणून त्याचा मेनटेनन्स करून घेईल."

यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणतात, "केंद्राने महाराष्ट्राला दिलेल्या सर्व व्हेन्टिलेटर्सची राज्यस्तरीय चौकशी झाली पाहिजे. हा खूप मोठा घोटाळा आहे. लोकांचा पैसा 'पीएम केअर' फंडच्या नावाखाली वाया गेलाय."

"केंद्राने सर्व कंपन्यांना या अपारदर्शक फंडात देणगी देण्यास भाग पाडलं. या फंडबाबत माहिती दिली नाही किंवा माहितीचा अधिकारी लागू केला नाही," असा आरोप त्यांनी केला.

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये 'पीएम केअर' फंडातून मिळालेले व्हेन्टिलेटर्स धुळखात पडल्याचं दिसून आलं होतं. तर, पुण्यातही व्हेन्टिलेटर्समध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

सचिन सावंत म्हणाले, "नाशिकमध्ये 60 व्हेन्टिलेटर्स पाठवण्यात आले. पण, सूटे पार्ट न मिळाल्यामुळे ते वापरण्यात आले नाहीत. अशा तक्रारी राज्याच्या इतर भागातूनही आल्यात."

व्हेन्टिलेटर्सचे कनेक्टर उपलब्ध नसल्याने ते वापरण्यात आले नाहीत, अशी माहिती नाशिक पालिका अधिकाऱ्यांनी दिली होती.

तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे औरंगाबादचे आमदार सतीश चव्हाण सांगतात, "औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाला 75 व्हेन्टिलेटर्स देण्यात आले होते. त्यापैकी 25 वापरण्यासाठी काढले. पण, हे निकृष्ठ दर्जाचे असल्याचा अहवाल रुग्णालयाने दिलाय."

व्हेंटीलेटर

फोटो स्रोत, Getty Images

"देशभरात 7500 व्हेन्टिलेटर्स दिले असल्याची माहिती आहे. तज्ज्ञांच्या समितीकडून याची चौकशी करण्यात यावी," असं ते पुढे म्हणतात.

'व्हेन्टिलेटर पडून का राहिले याची चौकशी करा'

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चौकशीच्या मागणीवर उत्तर देताना भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणतात, "व्हेन्टिलेटर्स निकृष्ट दर्जाचे असतील तर याची जरूर चौकशी करा. पण, त्याआधी पीएम केअर फंडातून आलेले व्हेन्टिलेटर्स पडून का होते. याची चौकशी सरकारने केली पाहिजे."

सरकार करणार का चौकशी?

औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयातील निकृष्ठ व्ह्न्टिलेटर्सबाबत चौकशी करणार का, हा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही विचारण्यात आला.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "पुण्यातही बरेच व्हेन्टिलेटर्स खराब होते. पुणे महापालिकेने ते दुरूस्त करून घेतले. कदाचीत औरंगाबादमध्ये असे टेक्निशिअन नसतील. पुणे महापालिका त्यांना व्हेन्टिलेटर्स दुरूस्त करणाऱ्या कंपनीचं नाव देईल."

"बंद पडले म्हणून रडत बसण्यापेक्षा ते दुरूस्त कसे होतील याकडे पाहिलं पाहिजे," असंही ते पुढे म्हणाले.

इतर राज्यातूनही व्हेन्टिलेटर्स बंद पडण्याच्या तक्रारी

द हिंदूच्या वृत्तानुसार, पंजाबमध्ये पीएम केअर फंडातून पुरवण्यात आलेल्या 320 व्हेन्टिलेटर्सपैकी 237 व्हेन्टिलेटर्स खराब निघाले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दुरूस्त झाल्यानंतरही याचा वापर करता येईल का नाही याबाबत डॉक्टरांना शंका आहे.

एप्रिल महिन्यात राजस्थान सरकारनेही केंद्राला पत्र लिहून निकृष्ट व्हेन्टिलेटर्सबाबत आलेल्या तक्रारींची माहिती दिली होती. सॉफ्टवेअर, प्रेशर ड्रॉप, काही वेळानंतर व्हेन्टिलेटर आपोआप बंद होण्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.

उदयपूरच्या रवींद्रनाथ टागोर मेडिकल कॉलेजचे मुख्याध्यापक डॉ. लखन पोसवाल बीबीसीशी बोलताना म्हणाले होते, "दोन-तीन तासात व्हेन्टिलेटर्स आपोआप बंद होतात. अनेकवेळा प्रेशर कमी होतं. यामध्ये ऑक्सिजन सेंसर नाहीत. त्यामुळे रुग्णाला किती ऑक्सिजन मिळतोय हे कळत नाही."

'पीएम केअर' फंडातून देण्यात आलेल्या व्हेन्टिलेटर्सचं फॅक्टचेक

बीबीसीने पीएम केअर फंडातून देण्यात आलेल्या व्हेन्टिलेटर्सबाबत फॅक्टचेक केलं होतं. त्यानुसार,

  • ऑर्डर करण्यात आलेल्या 58,850 व्हेन्टिलेटर्सपैकी 30 हजार खरेदी करण्यात आले.
  • कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर व्हेन्टिलेटर खरेदी कमी करण्यात आली.
  • बिहार, यूपी, राजस्थान, छत्तीसगढच्या रुग्णालयात व्हेन्टिलेटर्स धुळखात पडलेत.
  • काही ठिकाणी व्हेन्टिलेटर्स योग्य काम करत नसल्याच्या तक्रारी आल्या.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)