कोरोना : 'भारतात 33 कोटी देव असूनही ऑक्सिजनचा तुटवडा', शार्ली एब्दोनं छापलं व्यंगचित्र

शार्ली हेब्दो

फोटो स्रोत, Getty Images

भारतातील संपूर्ण यंत्रणाच कोव्हिड संकट हाताळण्यात अपुरी पडत असल्याचं चित्र आहे. यावर फ्रांन्समधल्या 'शार्ली एब्दो' या नियतकालिकाने एक बोचरं व्यंगचित्र छापलं आहे.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट हाताळण्यात भारतीय आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कुचकामी ठरली आहे आणि सरकारही हतबल दिसतंय.

हॉस्पिटलमध्ये आजही ऑक्सिजन तुटवड्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागतोय. यावरच शार्ली एब्दोने 28 एप्रिल 2021 च्या आपल्या अंकात एक व्यंगचित्र छापलं आहे. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन, हाच या व्यंगचित्राचा विषय आहे.

"भारतात कोट्यवधी देवी-देवता आहेत. मात्र कुणीही ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढू शकत नाही," अशी उपरोधिक टीका यात करण्यात आली आहे. हिंदू मान्यतेनुसार 33 कोटी देवी-देवता आहेत.

इस्लाम, ख्रिस्ती किंवा इतर अनेक धर्मांप्रमाणे हिंदू धर्म एकेश्वरवादी नाही. इथे स्त्री रुपातील आणि पुरूष रुपातील अनेक देवांची पूजा करतात. हिंदू धर्मात अनेक देवी-देवता आहेत आणि सर्वांची पूजा होते.

मात्र, शार्ली एब्दोने आपल्या व्यंगचित्रात 33 कोटींऐवजी 33 दशलक्ष (मिलियन) देवी-देवता असा उल्लेख केला आहे. 33 दशलक्ष म्हणजे 3.3 कोटी. हे व्यंगचित्र सोशल मीडियावर अनेकजण शेअर करत आहेत.

शार्ली हेब्दो

फोटो स्रोत, AFP

सुमित कश्यप नावाच्या एका यूजरने हे व्यंगचित्र ट्वीट करत लिहिलंय, "मानवतेच्या सेवेत शार्ली एब्दो महत्त्वाचं काम बजावत आहे. प्रश्न दुखावणारे असले तरी प्रश्न विचारायला हवे. यातूनच आपण मानवतेला पुढे नेऊ शकतो."

हिंदू धर्म आणि भारतीय पुराण कथांची व्याख्या करणारे सुप्रसिद्ध लेखक देवदत्त पटनाईक यांनीही यासंदर्भात ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, "हिंदुत्त्वावाद्यांना हे व्यंगचित्र दाखवल्यावर ते काय म्हणतील? (1) 33 दशलक्ष का? याऐवजी 330 दशलक्ष असायला हवं का? 'खरंतर' फक्त 33. (2) आम्ही त्यांच्यासारखं शीर कलम करत नाही. आम्ही श्रेष्ठ आहोत. ते काय बघणार नाहीत? (1) शोकांतिका, (2) नेत्यांची अकार्यक्षमता."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

सर्वोच्च न्यायालयातील वकील बृजेश कलप्पा यांनी हे व्यंगचित्र ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात,"शार्ली एब्दोने इस्लामवर व्यंगचित्र काढलं त्यावेळी भाजप आयटी सेलने आनंद साजरा केला होता आणि आता?"

शार्ली एब्दोने कायमच प्रथा-परंपरा आणि धार्मिक श्रद्धा यांच्यावर बोट ठेवलं. पाकिस्तानात कट्टरतावादी इस्लामिक संघटना शार्ली एब्दोविरोधातच निदर्शनं करत आहेत. तहरिक-ए-लब्बैक या संघटनेने केलेली निदर्शनं इमरान खान सरकारची डोकेदुखी ठरली होती.

ही संघटना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांचा विरोध करत होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मोहम्मद पैगंबर यांचं एक वादग्रस्त व्यंगचित्र शिकवणी सुरू असताना वर्गातील विद्यार्थ्यांना दाखवणारे प्राध्यापक सॅम्युअल पेटी यांच्यावर एकाने चाकू हल्ला करत त्यांचा गळा चिरला. या घटनेचे फ्रान्समध्ये तीव्र पडसाद उमटले होते.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी मोहम्मद पैगंबर यांचं वादग्रस्त व्यंगचित्र दाखवणं चुकीचं नव्हतं, असं म्हणतं प्राध्यापक सॅम्युअल पेटी यांचा बचाव केला होता. तसंच मुस्लिम कट्टरतावादी संघटनांविरोधात कारवाई करणार असल्याचंही ते म्हणाले होते.

ते म्हणाले होते, "फ्रान्समध्ये अंदाजे 60 लाख मुस्लिम आहेत. यातील एका अल्पसंख्यक गटाकडून 'काउंटर-सोसायटी' निर्माण होण्याची भीती आहे. काउंटर-सोसायटी किंवा काउंटर-कल्चर म्हणजे एक असा समाज तयार करणे जो त्या देशाच्या मूळ संस्कृतीपासून वेगळा असतो."

यानंतर फ्रान्सच्या नीस शहरातील नॉट्रे-डेम बॅसिलिका चर्चमध्ये एका व्यक्तीने चाकूने हल्ला करून दोन महिला आणि एका पुरूषाचा खून केला होता.

इमॅन्यूएल मॅक्रॉन

फोटो स्रोत, Getty Images

यावर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो म्हणाले होते, "माझा हा संदेश इस्लामिक दहशतवादाचा मूखर्पणा झेलणाऱ्या नीस आणि नीसच्या जनतेसाठी आहे. तुमच्या शहरात अतिरेकी हल्ला होण्याची ही तिसरी वेळ आहे. संपूर्ण देश तुमच्यासोबत उभा आहे."

"आपल्यावर पुन्हा हल्ला झाला तर तो आपला आपल्या मूल्यांप्रती संकल्प, स्वातंत्र्याप्रती आपली वचनबद्धता आणि दहशतवादासमोर गुडघे न टेकल्यामुळे असेल. आम्ही कुणासमोरही वाकणार नाही. दहशतवादाचा सामना करण्यासाठी आम्ही आपल्या सुरक्षेत अधिक वाढ केली आहे."

इॅम्युनएल मॅक्रो यांच्या या वक्तव्यावर काही इस्लामिक राष्ट्रांनी नाराजीही व्यक्त केली होती. काही राष्ट्रांनी फ्रान्सच्या वस्तूंचा बहिष्कारही करण्याचं आवाहनही केलं. फ्रान्समध्ये मुस्लिमांचं दमन झाल्यास जगभरातील नेते मुस्लिमांच्या सुरक्षेसाठी सरसावतील, असं तुर्कीचे अध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांनी म्हटलं होतं.

शिक्षक सॅम्युअल पॅटी

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, शिक्षक सॅम्युअल पॅटी

अशाच प्रकारची निदर्शनं पाकिस्तानाही झाली. तहरिक-ए-लब्बैक एक कट्टरतावादी इस्लामिक संघटना आहे. फ्रान्सच्या राजदूतांना इस्लामाबादमधून बाहेर काढावं, अशी त्यांची मागणी आहे. या मुद्द्यावरून इमरान खान सरकारला संसदेत चर्चाही करावी लागली होती.

शार्ली एब्दोची वादग्रस्त व्यंगचित्रं

शार्ली एब्दोने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मोहम्मद पैगंबरांवरची तीच वादग्रस्त व्यंगचित्र पुन्हा प्रकाशित केली होती ज्या व्यंगचित्रांमुळे 2015 साली त्यांच्यावर मोठा अतिरेकी हल्ला झाला होता.

या हल्ल्यात मदत करण्याच्या आरोपावरून 14 जणांवर खटला सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही व्यंगचित्र पुनर्प्रकाशित करण्यात आली होती.

शार्ली हेब्दो

फोटो स्रोत, Getty Images

या हल्ल्यात या नियतकालिकेतील प्रसिद्ध व्यंगचित्रकारासह 12 जणांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांनंतर पॅरिसमध्ये याच संदर्भातील एक हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यांनंतर फ्रान्समध्ये अतिरेकी हल्ल्यांना सुरुवात झाली होती.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नियतकालिकाच्या ताज्या अंकाच्या मुखपृष्ठावर मोहम्मद पैगंबरांची तीच 12 व्यंगचित्र छापण्यात आली होती जी शार्ली एब्दोमध्ये प्रकाशित होण्याआधी डेन्मार्कच्या एका वृत्तपत्राने छापली होती. यापैकी एका व्यंगचित्रात मोहम्मद पैगंबरांच्या डोक्याला बॉम्ब बांधल्याचं दाखवलं होतं. यासोबत फ्रेंच भाषेत जी हेडलाईन होती त्याचा अर्थ होता - 'जे घडलं ते यामुळेच'

शार्ली एब्दोची बाजू

2015 च्या हल्ल्यापासूनच पैगंबरांवर व्यंगचित्र छापणं सुरू ठेवा, असं आम्हाला सांगितलं जात असल्याचं या नियतकालिकाच्या अग्रलेखात म्हटलं होतं.

या अग्रलेखात म्हटलं होतं, "आम्ही हे करायला कायमच नकार देत आलोय. यावर बंदी होती म्हणून नव्हे. कायदा आम्हाला परवानगी देतो. मात्र, असं करण्यासाठी ठोस कारण हवं. असं कारण ज्याला काहीतरी अर्थ असेल आणि ज्यातून एक चर्चा सुरू होऊ शकेल."

"ही व्यंगचित्र जानेवारी 2015 ला झालेल्या हल्ल्याच्या खटल्याची सुनावणी सुरू होणाऱ्या आठवड्यात छापणं, आम्हाला योग्य वाटलं."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

2015 साली काय घडलं?

7 जानेवारी रोजी सॅड आणि चेरिफ कोची नावाच्या दोन भावांनी शार्ली एब्दोच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला आणि संपादक स्टिफेन चार्बोनिअर, चार व्यंगचित्रकार, दोन स्तंभलेखक, एक कॉपी एडिटर, एक केअरटेकर आणि एका गेस्टची हत्या केली होती. हल्ल्यात एडिटरचे सुरक्षा रक्षक आणि एका पोलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला होता.

पोलिसांनी या भावांचा शोध सुरू केला त्यावेळी एकाला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या त्या आरोपीने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करत ज्यु सुपर मार्केटमध्ये अनेकांना ओलीस धरलं.

9 जानेवारी रोजी त्याने 4 ज्यूंची हत्या केली. त्यानंतर त्या आरोपीचाही पोलीस गोळीबारात मृत्यू झाला. स्वतःला इस्लामिक स्टेट म्हणवणाऱ्या एका गटाद्वारे हे हल्ले करण्यात आल्याचं, या आरोपीने मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेल्या एका व्हिडियोमध्ये म्हटलं होतं.

शार्ली एब्दोवर हल्ला करणाऱ्या त्या दोन भावांचाही पोलीस गोळीबारात मृत्यू झाला होता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)