You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणजे काय? याचा वापर कोणी करावा?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोरोना रुग्णांवरच्या उपचारांमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा सातत्याने उपयोग होताना दिसतो आहे. काय आहे हे उपकरण?
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणजे काय? याचा वापर कोणी करावा?
भारतात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनासंसर्गासोबत ऑक्सिजची मागणी प्रचंड वाढलीये. ज्यामुळे, ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा भासतोय. याचा, थेट परिणाम झालाय घरी ऑक्सिजनवर उपचार घेणारे आणि होम क्वारेंन्टाईन रुग्णांवर.
ऑक्सिजन सिलेंडरला पर्याय म्हणून "ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर" सद्य स्थितीत चर्चेचा विषय आहेत.
तज्ज्ञांच्या मते, मध्यम स्वरूपाचा कोरोनासंसर्ग असलेल्यांना आणि ज्यांची ऑक्सिजन लेव्हल 85 ते 90 मध्ये आहे. अशांना घरी "ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर" चा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.
तज्ज्ञांच्या मदतीने आपण जाणून घेऊया, "ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर" म्हणजे काय आणि रुग्णांना याचा फायदा कसा होतो.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरम्हणजे काय?
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे इलेक्ट्रिसिटीवर चालणारं एक मशीन आहे.
फुफ्फुसांचे आजार असलेल्या किंवा कोरोना रुग्णांना गरज पडल्यास घरच्या-घरी या मशीनच्या मदतीने ऑक्सिजन दिला जाऊ शकतो.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमशिन कसं काम करतं?
आपल्या सर्वांना माहित आहे की, वातावरणात 21 टक्के ऑक्सिजन आणि 78 टक्के नायट्रोजन आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणते, घरातील हवा घेऊन हे मशिन धुलीकण, जीवाणू, नायट्रोजन आणि इतर गोष्टी वेगळ्या करतं आणि चांगला ऑक्सिजन आपल्याला देतं.
मुंबईच्या व्होकार्ट रुग्णालयातील फुफ्फुस विकारतज्ज्ञ डॉ. जिमन शाह सांगतात, "हवा या मशिनमधून पास होताना, नायट्रोजन आत खेचला जातो. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या हवेत ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आणि नायट्रोजन फार कमी प्रमाणात रहातो."
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ऑक्सिजन टॅंक किंवा सिलेंडर प्रमाणेच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन ऑक्सिजनचा पुरवठा करतं.
ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णाला ऑक्सिजन मास्क, ट्यूब आणि कॅन्युलाद्वारे प्राणवायू दिला जातो. तज्ज्ञ सांगतात, ऑक्सिजन सिलेंडर संपला की पुन्हा भरावा लागतो. पण, 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' चा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे हे मशिन 24 तास काम करतं.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा वापर कोणी करावा?
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, दिर्घकाळासाठी रुग्णाला घरीच ऑक्सिजन थेरपी देण्याची गरज असल्यास "ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर" चा वापर केला जातो.
नानवटी सुपर-मॅक्स रुग्णालयाच्या क्रिटिकल केअर विभागाचे प्रमुख डॉ. अब्दुल अन्सारी म्हणतात, "फुफ्फुसांच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. या रुग्णांनी "ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर" घरी ठेवावा."
तर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाली म्हणजे आपल्याला याचा वापर करण्याची गरज आहे असं अजिबात नाही.
"रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 90 पेक्षा कमी झाली. 85-88 पर्यंत असेल तर, 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' मशिनचा वापर केला जातो," असं डॉ. शाह पुढे सांगतात.
तज्ज्ञ सांगतात, ऑक्सिजन 85 पेक्षा कमी झाला. तर, हाय-फ्लो ऑक्सिजन लागतो. अशावेळी ऑक्सिजन सिलेंडरची गरज भासते.
कोव्हिड रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर फायदेशीर आहे?
कोव्हिडच्या काळात प्राणवायूच्या प्रत्येक थेंबासाठी रुग्ण व्याकूळ झालेत. रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजन मिळवण्यासाठी जीवाची शर्थ करत आहेत. पण, ऑक्सिजन सिलेंडर मिळत नाहीत.
पुण्याच्या बी.जे.मेडिकल कॉलेजच्या अॅनेस्थेशिया (भूलतज्ज्ञ) विभागप्रमुख डॉ. संयोगिता नाईक म्हणतात, "कोव्हिड-19 चा मध्यम स्वरूपाचा संसर्ग असलेले रुग्ण याचा वापर करू शकतात. ऑक्सिजनची पातळी कमी झाली आणि जास्तीत-जास्त 5 लीटर प्रति-मिनिट ऑक्सिजनची गरज असेल तर याचा वापर केला जावा."
तज्ज्ञ सांगतात, कोव्हिडग्रस्त रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल 90 ते 94 मध्ये असल्यास ते घरीच तज्ज्ञांच्या सल्लानुसार 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' वर अवलंबून राहू शकतात.
कोव्हिडमुक्त रुग्णांना याचा फायदा होईल?
कोव्हिड फुफ्फुसांवर हल्ला करतो. यामुळे काही रुग्णांची फुफ्फुसं निकामी होतात. दिर्घकाळ हाय-फ्लो ऑक्सिजन किंवा व्हॅन्टिलेटरवर ठेवण्यात आल्याने फुफ्फुसांना इजा होते.
डॉ. संयोगिता नाईक सांगतात, "पोस्ट कोव्हिड गुंतागुंतीमुळे ऑक्सिजन थेरपीची गरज असलेल्या रुग्णांना 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' चा फायदा होतो."
याचा वापर कसा करावा?
डॉ. जमिन शाह 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' मशिनचा वापर कसा करावा याबद्दल अधिक माहिती देतात.
- मशिनला असलेल्या एका पोर्टमधून ऑक्सिजन बाहेर येतो
- या पोर्टला एक ट्यूब असते. ही ट्यूब नाकाला लावली जाते.
- ऑक्सिजन मास्क असेल तर तोंडावर लावावं.
तज्ज्ञ सांगतात, यामुळे रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढते.
ते पुढे सांगतात, हे मशीन सतत सुरू ठेवलं तर गरम होऊन बिघाड होण्याची शक्यता असते. त्यामुळे आठ-दहा तास वापर केल्यानंतर काहीवेळ मशीन बंद करून ठेवण्याची गरज आहे.
वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापर नको
PIBच्या वेबिनारमध्ये बोलताना सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज, बंगळुरूचे कोव्हिड समन्वयक डॉ. चैतन्य बालकृष्णन यांनी, वैद्यकीय सल्लाशिवाय 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' चा वापर करता कामा नये अशी सूचना दिली आहे.
ते म्हणतात, "कोव्हिडमुळे मध्यम स्वरूपाचा न्यूमोनिया झालेल्या रुग्णांना ज्यांची ऑक्सिजन लेव्हल 94 पेक्षा कमी आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल होईपर्यंत 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' चा फायदा होतो. योग्य वैद्यकीय सल्ल्याशिवाय याचा वापर करू नये."
"ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, एक वैद्यकीय उपकरण आहे. याचा वापर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच केला पाहिजे. रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल कमी होत असल्यास, रुग्णालयात उपचार मिळेपर्यंत याचा वापर करण्यात यावा," असं नानावटी रुग्णालयाचे डॉ. अन्सारी म्हणतात.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर चे प्रकार
दोन प्रकारचे 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' असतात.
- सतत ऑक्सिजन पुरवणारं, ज्याला वैद्यकीय भाषेत Continuous Flow म्हणतात. रुग्ण ऑक्सिजन घेत नसेल तरी मशीन दर मिनिटाला ऑक्सिजन पुरवठा करत रहाणार.
- दुसरं पल्स डोस 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर'- श्वास घेण्याचा पॅटर्ननुसार ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतं
डॉ. शाह सांगतात, "या मशीनमध्ये 1 ते 5 पर्यंत सेटिंग असतात. काही मशिन दर मिनिटाला 5 लीटर तर काही 10 लीटर ऑक्सिजन देतात. रुग्णाला गरज असेल तेवढाच ऑक्सिजन दिला पाहिजे. गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन दिल्यास धोका असतो."
कोणत्या कंपन्या 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' बनवतात?
फिलिप्स, बीपीएल मेडिकल टेक्नॉलॉजी, मेडट्रोनिक, इनोजेन यांसारख्या कंपन्या 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' बनवतात.
3,5, 7, आणि 10 लीटर प्रतिमिनिट ऑक्सिजन तयार करणारे "ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर" बाजारात उपलब्ध आहेत.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी वाढलीये?
कोरोनामुक्त झालेल्या अनेक रुग्णांना फुफ्फुसांना इजा झाल्यामुळे घरी ऑक्सिजन द्यावा लागतोय.
अमोल सबनीस (नाव बदललेलं) यांचे वडील 20 दिवस ICU मध्ये होते. ऑक्सिजन लेव्हल सुधारतेय पण, डॉक्टरांनी घरी ऑक्सिजन सुरू ठेवण्यास सांगितलंय.
ते म्हणतात, "वडिलांना ऑक्सिजन थेरपीची गरज आहे. घरी पाच लीटरपर्यंत ऑक्सिजन लागेल असं डॉक्टरांनी सांगितलंय. त्यामुळे 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' विकत घेतलंय."
'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर'च्या होलसेल डीलर सोनाली शेळके सांगतात, "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागणी वाढलीये. काही रुग्णांना डिस्चार्जनंतर घरी ऑक्सिजन लागतोय. अशांना डॉक्टर घरीच "ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर" ठेवण्याची सूचना करत आहेत. जेणेकरून रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल वाढण्यास मदत होईल आणि ते घरीच स्थिर राहू शकतील."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)