IPL 2021: आयपीएल रद्द झाली, आता टी-20 वर्ल्ड कपचं काय होणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
आयपीएलचा 2021चा हंगाम अर्ध्यातच रद्द करण्याचा निर्णय अखेर आयपीएल प्रशासन आणि बीसीसीआयला घ्यावा लागला. पण, कोरोनाचा कहर काही इतक्यात थांबणारा नाही. अशावेळी ऑक्टोबरमध्ये भारतातच होणाऱ्या टी-20 स्पर्धेचं नेमकं काय होणार?
अखेर आयपीएलचं जैव-सुरक्षा कवच म्हणजे बायो-बबल भेदून कोरोना व्हायरसने स्पर्धेत शिरकाव केला. आणि दोन दिवसांच्या इनिंग नंतर आयोजक आयपीएल प्रशासकीय मंडळ आणि बीसीसीआय यांना स्पर्धेचा हा हंगाम रद्द करण्यावाचून पर्याय उरला नाही.
कारण, भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आणि म्युटेटेड म्हणजे बदललेल्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे.
पण, अशावेळी फक्त आयपीएल स्पर्धेवरच याचा परिणाम होणार आहे की, आगामी टी-20 वर्ल्ड कप जो ऑक्टोबर महिन्यापासून भारतात रंगणार आहे, त्यावरही गदा येऊ शकते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
कारण, आता दुसरी लाट सुरू असतानाच देशात काही तज्ज्ञांनी सप्टेंबर महिन्यात तिसऱ्या लाटेचाही इशारा देऊन ठेवला आहे. अशावेळी सोळा आंतरराष्ट्रीय टीमचा समावेश असलेली ही स्पर्धा भारतात घेणं योग्य ठरेल का? मुळात ती भारतात होऊ शकेल का, यावरही आता चर्चा सुरू झाली आहे.
'कोव्हिड परिस्थितीसाठी आम्ही तयार आहोत'
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे स्पर्धा संचालक आणि बीसीसीआयचे पदाधिकारी धीरज मल्होत्रा यांनी गेल्याच आठवड्यात बीबीसी स्पोर्टच्या 'स्टम्प्ड' कार्यक्रमात याविषयी भाष्य केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images / Orbon Alija
ते म्हणाले, "स्पर्धा ऑक्टोबरमध्ये होणार आहे. आणि नोव्हेंबर 14 तारखेला फायनल आहे. तोपर्यंत आयोजन सुरळीतपणे करता येईल असी परिस्थिती देशात असेल अशी आम्ही आशा करतो. आम्ही नेहमीची परिस्थिती, कोव्हिड परिस्थिती आणि सर्वात वाईट कोव्हिड परिस्थिती अशा तीन शक्यता गृहित धरल्या आहेत."
त्यांचं पुढचं वाक्य महत्त्वाचं होतं. ते म्हणाले, "पहिल्या दोन शक्यतांसाठी आम्ही तयार आहोत. आमचं नियोजन आम्ही आयसीसीला कळवलं आहे. तिसऱ्या सगळ्यांत वाईट कोव्हिड परिस्थितीत स्पर्धा युएईला हलवण्याचा आमचा प्रस्ताव आहे."
अर्थात, तशी वेळ येऊ नये अशीच बीसीसीआयची इच्छा आहे.
कोव्हिड परिस्थितीत कसं करणार टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन?
स्पर्धा भरवायची की नाही, याचा अंतिम निर्णय अर्थात आयसीसी या क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय नियामक मंडळाचा असेल. पण, हा निर्णय घेताना भारत आयोजनासाठी सुरक्षित आहे का याची शाहानिशा आयसीसीला करावी लागेल. शिवाय अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि क्रिकेट मंडळ जे या स्पर्धेत सहभागी होणार आहेत, त्यांचं मतंही आयसीसीला विचारात घ्यावं लागेल.

फोटो स्रोत, BCCI/IPL
कारण, आताच आयपीएल दरम्यान, काही देशातल्या खेळाडूंनी भारतातील परिस्थिती लक्षात घेऊन स्पर्धा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला होता. परदेशातून असं दडपण आयसीसीवर येऊ शकतं.
आज आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यावर आयसीसीने अजून तरी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अधिकृत ट्विटर हँडलवर त्यांनी स्पर्धा रद्द झाल्याचं फक्त कळवलंय. पण, जेव्हा आयपीएल स्पर्धा सुरू झाली होती तेव्हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आयसीसीचे अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अॅलरडाईस यांनी दोन गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. त्या म्हणजे, सध्यातरी स्पर्धा भारतातच घेण्याचा विचार आहे. आणि दुसरं म्हणजे स्पर्धा भारतात झाली नाही तर इतर पर्याय त्यांच्यासमोर तयार आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
सध्या तरी बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, कोव्हिड परिस्थितीत टी-20 स्पर्धा कशी पार पाडणार याचं नियोजन त्यांनी आयसीसीला वेळोवेळी कळवलं आहे. आणि या संदर्भात ते आयसीसीशी सतत संपर्कात आहेत.
आयपीएल सुरू असताना बीसीसीआयने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांचं बायो-बबल तयार केलं होतं. आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक टीमला एक घरचं मैदान बहाल करण्याऐवजी यंदा पाच तटस्थ ठिकाणी हे सामने खेळवण्यात येत होते.
आणि विशेष म्हणजे आयपीएल स्पर्धेचं आयोजन हीच टी-20 स्पर्धेची रंगीत तालीम समजली जात होती. पण, आता आयपीएलमध्ये हे बायो-बबल कुचकामी ठरलेलं दिसतंय.

फोटो स्रोत, ANI
बीसीसीआयने कोव्हिडच्या काळात स्पर्धेचं नियोजन कसं करणार याविषयी काही माहिती मधल्या काळात प्रसार माध्यमांना दिली होती. त्यानुसार, टी-20 स्पर्धेसाठी अहमदाबाद, चेन्नई, मुंबई, धरमशाला, हैद्राबाद, लखनौ, दिल्ली, कोलकाता आणि बेंगळुरू या ठिकाणी सामने आयोजित करू असं म्हटलं होतं. आणि तेव्हाची परिस्थिती बघून प्रेक्षकांना प्रवेश द्यायचा की नाही हे ठरणार होतं.
पण, आता आयपीएलच स्थगित झाल्याने टी-20 भोवतालही अनिश्चितता वाढली आहे. मुळात ही स्पर्धा भरवण्याचीच गरज आहे का, असा प्रश्नही भारतात जोर धरू लागला आहे.
टी-20 स्पर्धा भारतात भरवण्याची गरज आहे का?
मूळात प्रस्तावित सातव्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन भारताकडे कसं आलं ही गंमतीची गोष्ट आहे. खरंतर ही स्पर्धा आधीच्या कार्यक्रमानुसार, 2020मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातच ऑस्ट्रेलियात होणार होती. पण, कोव्हिड परिस्थितीत स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलण्यात आली. आणि ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन विभागाने 2021 पर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी देशाच्या सीमा उघडणं शक्य होणार नाही, असा अहवाल दिल्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने 2021मध्येही स्पर्धा भरवण्यास असमर्थता दाखवली.
भारतीय क्रिकेट मंडळाने मात्र स्पर्धा भरवण्याचा उत्साहही दाखवला आणि त्या पुढचा म्हणजे 2022 चं वर्ल्ड कप आयोजन ऑस्ट्रेलियाला देऊ करून आताचं आयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवला. पण, सध्या भारतातलीच कोव्हिड परिस्थिती चिघळलेली दिसत आहे.
अशावेळी भारतात ही स्पर्धा घ्यावी का? ज्येष्ठ क्रीडा पत्रकार शरद कद्रेकर यांनी थोडं वेगळं मत मांडलं.
त्यांच्या मते आता कोरोनाचा उद्रेक असताना आयपीएल घ्यायला नको होती. मग सहा महिन्यांनी वर्ल्ड कपचं आयोजन सुरक्षितपणे करता आलं असतं. सहा महिन्यांत परिस्थिती बदलूही शकते.
"शेवटी वर्ल्ड कप ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. तिचं आयोजन आणि आयपीएलचं आयोजन या वेगळ्या गोष्टी आहेत. आता सुरू होता तो आयपीएल हंगाम वर्षातून दुसऱ्यांदा होत होता. सहा महिन्यांपूर्वी दुबईत झाल्यानंतर लगेच पुन्हा ही स्पर्धा भरवण्याचा अट्टाहास बीबीसीआयने करायला नको होता," असं कद्रेकर यांचं मत आहे.
वर्ल्ड कप आणखी सहा महिन्यांनी होणार आहे. त्याचं आयोजन कडेकोटपणे करता आलं असतं. पण, आयपीएलमध्ये घुसवल्यामुळे टी-20वरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं असं कद्रेकर यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE
त्यांनी आणखी एक मुद्दा मांडला. "मधल्या काळात कोव्हिड परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांनी क्रिकेट मालिका आयोजित करून दाखवल्या. पण, दोन्ही देशांनी मोठी शहरं आणि कोरना उद्रेक असलेली ठिकाणं टाळून लहान शहरांमध्ये आयोजन करण्याचं शहाणपण दाखवलं. तसं शहाणपणही बीसीसीआयला दाखवता आलं नाही. नियोजित नऊ ठिकाणं ही सगळी शहरंच आहेत. अशावेळी टी-20 स्पर्धा सुरक्षित आहे हे कसं सिद्ध करणार?"
थोडक्यात नोव्हेंबरमध्ये स्पर्धा भरवता येईल. पण, तोपर्यंत भारत आयोजनासाठी सुरक्षित देश आहे हे सिद्ध करण्याचं आव्हान बीसीसीआयसमोर आहे. सहा महिन्यांत देशात लसीकरण कुठपर्यंत झालंय, बाहेरून येणाऱ्या खेळाडूंना आपण काय संरक्षण देणार आहोत आणि याची काय हमी आयोजक देश म्हणून बीसीसीआय देऊ शकेल यावर स्पर्धेचं आयोजन अवलंबून आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








