कोरोना लॉकडाऊन : महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने महाराष्ट्रातल्या अमरावती, सोलापूर, वर्धा, बीड आणि लातूरमध्ये कडक लॉकडाऊन लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये याआधीच पूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

राज्यांतल्या 8 जिल्ह्यांतल्या कडक लॉकडाऊनमध्ये पुढीलप्रमाणे निर्बंध असतील.

अमरावती

अमरावती जिल्ह्यात पुढील सात दिवस कडक निर्बंध लावण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे. रविवारी (9मे) दुपारी 12 वाजल्या पासून ते 15 मे पर्यंत हे निर्बंध असणार आहेत.

यात भाजीपाल्याह किराणा दुकानेही बंद असतील. फक्त आवश्यक सेवांची ऑनलाइन सुविधा सुरू राहणार आहे.

यासोबतच जिल्ह्यातली हॉस्पिटल्स व औषधांची दुकानं सुरू असणार आहेत.

या निर्बंधांदरम्यान अकारण फिरणाऱ्यांची वाहनं जप्त केली जातील आणि त्यांना दंडही केला जाईल. तर इतर नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

लातूर

लातूरचे जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केलाय. शनिवार (8 मे)पासून 13 मे पर्यंत हे निर्बंध जिल्ह्यात लागू असतील.

या दरम्यान सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येईल.

अत्यावश्यक सेवांची ऑनलाईन ऑर्डर घेऊन डिलीव्हरी देता येईल, पण इतर सगळे व्यवहार बंद राहतील.

सोलापूर

शनिवार (8मे) च्या रात्री 8 वाजल्यापासून सोलापूर जिलह्यात लॉकडाऊन असेल. 15 मे पर्यंत हे निर्बंध कायम राहतील.

रुग्णालयं, औषधांची दुकानं, बँक, वर्तमानपत्रं अशा अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा या दरम्यान बंद राहतील.

जे पासधारक आहेत त्यांना दूध पिशव्या पोहचवण्याची मुभा असणार आहे. कडक लॉकडाऊन बाबतचा आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला आहे. हा आदेश सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी संयुक्तपणे लागू करण्यात येणार आहे.

वर्धा

वर्ध्यामध्ये शनिवार 8 मे सकाळपासून ते 13 मेच्या सकाळी 7 पर्यंत जिल्हा प्रशासनाने निर्बंध लावले आहेत.

यादरम्यान सर्व बँका, शासकीय व निमशासकीय कार्यालयं, पेट्रोल पंप, भाजी बाजार, हॉटेल व किराणा दुकानं बंद राहणार आहेत.

घरपोच सेवा सुरु असेल, पण ही डिलीव्हरी करणाऱ्याची आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी लागेल. हा अहवाल निगेटिव्ह असेल तरच घरपोच सेवा पुरवता येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कृषी क्षेत्रातील साहित्यं व बी- बियाणं घरपोच देण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी काढले आहेत.

बीड

बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनीही जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केलाय. 12 मे पर्यंत हे निर्बंध लागू असतील.

या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहतील. तर सकाळी 7 ते 10 या काळातच भाजी विक्री करायला परवानगी आहे.

बँकेचे व्यवहार सकाळ 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच सुरू राहतील.

कोल्हापू

कोल्हापूर जिल्ह्यात वाढती रूग्णसंख्या पाहता 5 मेपासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन लावण्यात आलाय.

जिल्ह्यात वाढणारी कोरोना रूग्णसंख्या, त्याप्रमाणात ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरची भासणारी कमतरता पाहता हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, "जिल्ह्यामध्ये सध्या ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. रुग्णसंख्या आणखी वाढत राहिली तर ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. रुग्णसंख्येची वाढती साखळी तोडण्यासाठी उद्या 11 वाजल्यापासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन करावा."

कोल्हापूर जिल्ह्यातील 2400 रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिल्हयातून पुरवला जात असल्याचं आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी म्हटलंय.

बुधवार (5 मे) सकाळी 11 पासून जिल्ह्यात पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.

सांगली

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात 5 मे रोजीच्या मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

सांगलीतील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलंय. प्रशासनाची चर्चा करून सांगली जिल्ह्यात 5 मे रोजी मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा कडक संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातल 1,568 कोव्हिड-19 रुग्ण आहे. सोमवारी (3 मे) जिल्ह्यात 40 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

सातारा

सातारा जिल्ह्यात 4 मे सकाळी सात वाजल्यापासून ते 10 मे रात्री 12 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

सातारा जिल्हयात कोरोना ‍विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लागू असलेले निर्बंध कडक करणं गरजेचं असल्याची माहिती प्रभारी जिल्हा दंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील सर्व किराणा माल, भाजीपाला दुकानं, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्यपदार्थ दुकानं (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह), पाळीव प्राण्यांच्या खाद्य पदार्थांची दुकानं, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पूर्णपणे बंद राहतील. पण या दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी आहे.

कृषी अवजारं व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकानं सकाळी 7.00 ते 11.00 या कालावधीतच चालू राहतील. पण या दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील.

हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खादयपदार्थ विक्री, दुकानं यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी 12.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंतच सुरू राहतील.

बारामतीत लॉकडाऊन

वरील 8 जिल्ह्यांव्यतिरिक्त कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 5 मे पासून बारामतीमध्येही लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. 11 मेपर्यंत हा लॉकडाऊन असेल.

याकाळात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत फक्त दूधविक्रीला परवानगी असेल. औषधांची दुकानं आणि हॉस्पिटल्स वगळता इतर सगळी दुकानं, भाजी मंडई या काळात बंद राहतील.

12 जिल्ह्यांमध्ये संसर्गात घट, तर 24 जिल्ह्यांतली वाढ कायम - टोपे

महाराष्ट्राच्या 12 जिल्ह्यांमध्ये संसर्गात घट होत असली तरी 24 जिल्ह्यांतली वाढ कायम असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये संसर्गात सर्वात जास्त वाढ होत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं.

राज्यातल रुग्ण पॉझिटिव्ह होण्याची संख्या आणि डिस्चार्ज होण्याची संख्या यातला फरक वाढल्याने देशाच्या रिकव्हरी रेटपेक्षा महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट चांगला असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय.

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 84 टक्के तर देशाचा रिकव्हरी रेट 81 टक्के आहे.

राज्याला होणाऱ्या रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्याचं वाटप सूत्रानुसार जिल्ह्यांना केलं जात असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे. पण राज्याला जितकी गरज आहे, तितक्या रेमडेसिव्हीरचा पुरवठा होत नसून अधिक पुरवठा व्हावा असं राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

राज्यामध्ये ऑक्सिजन ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं राजेश टोपेंनी जाहीर केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)