राजीव सातव यांना कोरोनाची लागण, पुण्यात ICU मध्ये उपचार सुरू

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली.

राजीव सातव यांनी ट्वीट करून 22 एप्रिल रोजी आपल्याला कोरोनाची लक्षणं जाणवत असल्याबाबत सांगितलं होतं. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली. तेव्हापासूनच त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, सातव यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात हलवण्याबाबत विचार केला जात होता.

पण त्यांच्यावर जहांगीर रुग्णालयातच उपचार करण्यात येत आहेत. तसंच मुंबईहून लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाला पुण्यात बोलावण्याबाबत हालचाली सुरू आहेत, अशी माहिती बागवे यांनी दिली आहे.

कोण आहेत राजीव सातव?

45 वर्षीय राजीव सातव हे सध्या कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्याकडे सध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं गुजरात प्रभारी पद आहे. तसंच काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे ते निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार आणि राज्यसभेच्या खासदार होत्या.

राजीव सातव यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी लाटेतही विजय मिळवण्याची कामगिरी केली होती. त्यांनी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पराभूत केलं होतं.

राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पुढे 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान सातव यांच्यावर गुजरात प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्या निवडणुकीत काँग्रेसने चांगलं यश मिळवलं.

पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली होती.

कॉंग्रेस आणि गांधी घराण्याशी असलेल्या निष्ठेमुळे त्यांच्यावर गुजरातच्या कॉंग्रेस प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युथ कॉंग्रेसचे अध्यक्षपद देखील त्यांच्याकडे होते. राहुल गांधी यांनी देखील डॉक्टरांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)