कोरोना लॉकडाऊन : महाराष्ट्रातले निर्बंध 15 मे पर्यंत कायम, राज्य सरकारची घोषणा

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

राज्यातले कोरोनासाठीचे निर्बंध 15 मेच्या सकाळपर्यंत कायम राहणार असल्याचं सरकारने जाहीर केलंय.

'ब्रेक द चेन' धोरणाअंतर्गत महाराष्ट्रात लागू करण्यात आलेले निर्बंध 15 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत कायम राहणार असल्याचं राज्य सरकारने आदेशांमध्ये म्हटलंय.

महाराष्ट्रातला लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवावा असं कॅबिनेटमधल्या सर्वांचं मत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल बोलून दाखवलं होतं.

टोपे काय म्हणाले होते?

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "महाराष्ट्रात दोन आठवडे लॉकडाऊन वाढवावा यासंबंधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळ्यांनी मत व्यक्त केलंय. माझ्या अंदाजानुसार 2 आठवडे लॉकडाऊन वाढवावा लागणार आहे. या संबंधी निर्णय 30 एप्रिलला घेण्यात येईल. या दिवशी सध्याच्या निर्बंधांचा शेवटचा दिवस आहे."

राज्याकडे सगळ्यांचं लसीकरण करण्याची क्षमता आहे, पण पुरेशा लशीच नसल्याने 1 मे पासून 18 वर्षांवरील सगळ्यांचं लसीकरण शक्य होणार नसल्याचंही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय

लॉकडाऊनबाबत तज्ज्ञ काय म्हणतात?

महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता, 24 एप्रिलपासून लावण्यात आलेला लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे का, हे आम्ही तज्ज्ञांशी बोलून तपासलं होतं. त्याबाबतचा आढावा खालीलप्रमाणे :

मुंबई-पुण्यातील रुग्णसंख्या स्थिर झाल्यानंतर लॉकडाऊन हटवण्यात यावा असा एक सूर आहे तर अद्यापही राज्याला लॉकडाऊनची गरज आहे असं म्हणणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. अशा परिस्थितीत राज्यात लॉकडाऊन संपणार की वाढणार हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महाराष्ट्रात झपाट्याने पसरणाऱ्या कोव्हिड-19 च्या त्सुनामीवर ब्रेक लावण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध घातले.

बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी दुकानांवर निर्बंध आले. मुंबईत सामान्यांचा लोकल प्रवास बंद झाला. तर, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी रस्त्या-रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली.

तज्ज्ञांच्या मते, मिनी लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिसून येतोय. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू स्थिरावतेय. त्यामुळे, निर्बंध आणखी काही दिवस सुरू ठेवले पाहिजेत.

कोरोनाव्हायरस संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी, सरकारने जाहीर केलेला मिनी लॉकडाऊन 1 मे ला संपतोय. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार की संपणार? हा सवाल प्रत्येकाचा मनात आहे.

लॉकडाऊनबाबत मंत्री काय म्हणाले होते?

आघडीच्या मंत्र्यांनी लॉकडाऊन 15 दिवसाने वाढण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले होते.

राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, "लॉकडाऊन वाढवण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. कडक निर्बंध लागू केल्यानंतर मुंबईत रुग्णसंख्या कमी झालीये. पण, विदर्भ-मराठवाडा आणि इतर भागात रुग्ण अजूनही वाढतायत."

कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी सरकारने जिल्ह्यांतर्गत प्रवासावर बंधन घातलं आहे.

राज्यात लॉकडाऊन वाढणार का? यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना ग्रामविकासमंत्री जयंत पाटील म्हणाले, "राज्य सरकार परिस्थितीचा रिव्हू घेणार आहे. ऑक्सिजनची गरज आणि उपलब्धता, बेड्सची उपलब्धता याची परिस्थिती पाहून मुख्यमंत्री लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय घेतील."

तर, "लॉडकडाऊनमुळे राज्यातील रुग्णांची संख्या कमी झालीये," अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

तर, शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात, "मुंबईत लॉकडाऊनचा परिणाम दिसू लागलाय. निर्बंधामुळे रुग्णसंख्या, संक्रमण कमी होत असेल. तर, सरकारने काही कठोर निर्बंध घातले तर सरकारला पाठिंबा द्यावा लागेल."

तज्ज्ञांचं मत काय?

महाराष्ट्रात मार्चपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली. डबल म्युटेशनमुळे राज्यात संसर्गाचा प्रसार तीव्रतेने झाल्याचं तज्ज्ञ सांगतात.

कोरोनाग्रस्तांचे आकडे 60 हजारापार गेल्यानतंर एप्रिलमध्ये राज्यभरात कडक निर्बंध घालण्यात आले.

राज्य सरकारने निर्बंध आणखी काही दिवस सुरू ठेवावे? यावर बोलताना कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणतात, "सरकारने निर्बंध हटवले तर मुंबईत रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात निर्बंध कायम राहीले पाहिजेत."

तज्ज्ञांच्या मते, या निर्बंधांचा फायदा झाल्याचं दिसून येत आहे. मुंबईत रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. तर, राज्यात रुग्णांची संख्या सरासरी 66 हजारावर स्थिरावलीये.

"मुंबईत अजूनही हर्ड इम्युनिटी (सामूहिक रोगप्रतिकारशक्ती) आलेली नाही. निर्बंध हटवले तर झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव होण्याची शक्यता आहे," असं डॉ. जोशी म्हणतात.

मुंबईत गेल्या काही दिवसात टेस्टचं प्रमाण कमी झालंय. रुग्णसंख्या कमी दिसण्याचं हे देखील एक कारण असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

आरोग्यविभागातील अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "राज्यातील रुग्णवाढ स्थिरावल्याचं एक कारण लॉकडाऊन आहे. त्यामुळे सद्य स्थितीत सरसकट निर्बंध शिथिल करता येणार नाहीत."

"आरोग्य यंत्रणांवरील ताण कमी करण्यासाठी, रुग्णसंख्या नियंत्रणात आली पाहिजे. त्याआधी निर्बंध शिथिल करणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे, सरकारने लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवावा अशी सूचना केली आहे," असं ते म्हणाले.

महाराष्ट्रात रुग्णसंख्येच्या तुलनेत बेड्सची उपलब्धता अपुरी आहे. रेमडेसिवीरच्या तुटवडा भासतोय. तर, ऑक्सिजन संकटाचा सामना रुग्णांना करावा लागतोय.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर सांगतात, "सरकारने मागच्यावेळी केलेली, निर्बंध अगोदर उघडायची चूक पुन्हा करू नये. रुग्णसंख्या 15 मे पर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे 15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढलाच पाहिजे."

"महाराष्ट्रात जरी रुग्णसंख्या कमी झाली. तरी, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यात रुग्ण मोठ्याप्रमाणावर वाढत आहेत. या राज्यातून लोकांची ये-जा सुरू होईल. यावेळी ढिलाई करून चालणार नाही. सरकारने सद्य स्थितीत निर्बंध उघडू नयेत," असं डॉ. वानखेडकर म्हणाले.

राज्यात तिसरी लाट येणार?

तज्ज्ञांच्या मते, महामारीमध्ये संसर्गाची लाट येत असते. त्यामुळे, राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यातील तिसऱ्या लाटेबाबत भीती व्यक्त करताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येईल असं म्हटलं जातंय. त्यामुळे तयारी असायला हवी."

"पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेतून आपण शहाणे झालोय. त्यामुळे संसर्गाचा सामना करताना आपल्याला ऑक्सिजनसाठी स्वयंपूर्ण व्हावं लागेल. औषध, बेड्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या याकडे लक्ष द्यावं लागेल," असं आरोग्यमंत्री पुढे म्हणाले.

लॉकडाऊनबाबत केंद्राची भूमिका?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन हा सर्वांत शेवटचा पर्याय ठेवा, अशी सूचना सर्व राज्यांना केली होती. पण, देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची दिवसेंदिवस बिघडणारी परिस्थिती पहाता निर्बंध घालण्यात आले आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, देशातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 15 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या 150 जिल्ह्यांमध्ये, लॉकडाऊन किंवा निर्बंध घालण्याचा विचार केंद्र सरकारने सुरू केलाय. केंद्र सरकार लवकरच राज्यांसोबत चर्चाकरून याचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळतेय.

या जिल्ह्यांमध्ये कोरोनाव्हायरसची चेन ब्रेक करण्यासाठी तात्काळ उपाययोजना गरजेच्या आहेत, असं तज्ज्ञांच मत आहे.

संसर्ग रोखण्यासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना

देशात दिवसेंदिवस वाढणारा कोरोनासंसर्ग पाहाता, केंद्र सरकारने 25 एप्रिलला सर्व राज्यांना पत्र लिहून काही सूचना दिल्या. कोरोनावाढीचा दर स्थिर नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात असे आदेश मोदी सरकारने दिले.

या जिल्ह्यांमध्ये तात्काळ उपाययोजना गरजेच्या

· एका आठवड्यात टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असलेले जिल्हे

· उपलब्ध ऑक्सिजन, ICU बेड्समधील 60 टक्के बेड्सवर रुग्ण उपचार घेत असतील तर

· या जिल्ह्यांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी कंटेनमेंट रणनिती आखावी

· लोकांचा एकमेकांशी संपर्क थांबवण्यासाठी 14 दिवसांचा वेळ घ्यावा

· या जिल्ह्यांमध्ये निर्बंधांची योग्य अंमलबजावणी होते का हे पहाण्यासाठी नोडल अधिकारी नेमावेत.

· जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांनी दररोज कंटेनमेंट झोनचा आढावा घ्यावा

· राज्यांनी याचा रिपोर्ट केंद्राकडे पाठवावा

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)