You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अशोक तुपे: कोरोनामुळे जीव गेलेल्या पत्रकाराने लिहिलेले शेवटचे शब्द होते...
अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे यांचं कोरोना आजारातून बरं झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र असतानाच पत्रकारितेतील तीन वरिष्ठांचं गुरुवारी (22 एप्रिल) निधन झालंय.
यामध्ये अहमदनगरचे लोकसत्ता प्रतिनिधी अशोक तुपे, उस्मानाबादचे ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा आणि सोपान बोंगाणे यांचा समावेश आहे. तर दिल्लीतही काही पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
न्यूज लाँड्रीचे पत्रकार आशिष येचुरी यांचं कोरोनाने निधन झाल्यावर पत्रकारिता वर्तुळात शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्रात कोरोनामुळं बळी घेतलेल्या पत्रकारांची संख्या आता 105 झाली आहे, अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेनी दिली आहे.
कोरोनाच्या काळात अनेक पत्रकारांनी प्रत्यक्ष फिल्डवर जात वृत्तांकन केले आहे, त्यांना अत्यावश्यक सेवेत गणलं जातं पण फ्रंटलाईन वर्कर म्हटलं जात नाही. त्यामुळेच धोका पत्करून फिल्डवर जाणाऱ्या अनेक पत्रकारांना अद्यापही कोरोनाची लस मिळाली नसल्याची खंत पत्रकारितेतील दिग्गजांनी व्यक्त केली आहे.
कोण होते अशोक तुपे?
अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे यांचं कोरोना आजारातून बरं झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुपे यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
अशोक तुपे हे राज्यातील पत्रकारिता क्षेत्रातलं महत्त्वाचं नाव होतं. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक कृषी पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. ते मूळचे श्रीरामपूर येथील असून लोकसत्ता वृत्तपत्राच्या अहमदनगर आवृत्तीचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते.
अशोक तुपे यांचा सहकार, शेती, ग्रामीण विकास, राजकारण अशा विषयांमध्ये हातखंडा होता. तसंच मानववंशशास्त्रापासून ते इतिहासापर्यंत अनेक गोष्टींचा त्यांचा अभ्यास होता, असं एबीपी माझाने म्हटलं आहे.
शेवटचा मेसेज व्हायरल
अशोक तुपे यांना कोरोनाने ग्रासलेले असताना त्यांनी आपल्या एका आप्तस्वकीयाला एक मेसेज पाठवला होता. हा मेसेज आता व्हायरल होत आहे.
या मेसेजमध्ये अशोक तुपे म्हणतात, "मला कोव्हिड झाला असून माझ्यावर उपचार सुरू आहेत. मित्राबरोबर मोटारीत गेलो होतो, त्यावेळी मला कोरोनाची बाधा झाली. दुचाकी असो किंवा चारचाकी, एकट्यानेच प्रवास करा. कुणालाही सोबत नेऊ नका. बाहेर जेवण करू नका, चहा किंवा नाष्टाही करू नका. डबल मास्क वापरा. घरी येईपर्यंत मास्क काढू नका. मी वाईट अनुभव घेत आहे. फोन बंदी आहे. मुलगा बाहेर गेलाय म्हणून मॅसेज करतोय. ऑक्सिजन लावलेला आहे. आणखी काही दिवस रुग्णालयातच मुक्काम असेल.
काळजी घ्या. श्राद्ध, अंत्यविधी, लग्न, साखरपुडा किंवा इतर कार्यक्रमांना जाऊ नका. कसलीच भीड बाळगू नका. लाखो रुपयांचा खर्च होतो. मी आणि पत्नी दोघेही एकाच खोलीत उपचार घेत आहोत. सहा दिवस झाले. पण आता प्रकृती स्थिर आहे."
या मेसेजनंतर काही दिवसांनी अशोक तुपे यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा कोव्हिड बरा झाला होता. पण अखेरीस हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं, अशी माहितीही समोर येत आहे.
तुपे यांचा हा मेसेज स्टेटसला ठेवून अनेक जण त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत. कोरोनाचा धोका आणि भयानक परिस्थिती यांची जाणीव लोक एकमेकांना करून देत आहेत.
महाराष्ट्र युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. तुपे यांच्या निधनाने मन सुन्न झाले असं ते म्हणाले आहेत.
भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. कृषी सहकार आणि ग्रामीण प्रश्नांची मांडणी करणारा अभ्यासू मित्र गमावला, असं ते म्हणाले.
एकाच दिवशी तीन पत्रकारांचा मृत्यू
राज्यात एकाच दिवशी अशोक तुपे यांच्यासह तीन पत्रकारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
उस्मानाबाद येथील समय सारथीचे संस्थापक, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा यांचं आज कोरोनानं हैदराबाद येथे निधन झालं. ते 69 वर्षांचे होते. उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रांत प्रतिनिधी म्हणून सध्या ते कार्यरत होते. महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाचे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं तसेच उस्मानाबाद येथील दैनिक समय सारथीचे ते संस्थापक संपादक होते.
तसंच ठाणे येथील वरिष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांचंही आज पुण्यात कोरोनानं निधन झालं.
राज्यात कोरोनामुळं बळी घेतलेल्या पत्रकारांची संख्या आता 105 झाली आहे, अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेच्या एस. एम. देशमुख तसंच ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनीही दिली आहे.
राज्यात एकाच दिवशी तीन ज्येष्ठ पत्रकारांच्या मृत्यूने त्यांच्या परिजनांसह पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा - निखिल वागळे
राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांनी कोरोनाने आपले प्राण गमावल्याने सोशल मीडियावर त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.
या निमित्ताने पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी पुन्हा एकदा केली आहे.
अनेक तरुण पत्रकार त्यांचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांना फ्रंटलाईन वर्कर असा दर्जा मिळाला पाहिजे, असं वागळे म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)