SSC बोर्डाची परीक्षा रद्द झाली, मग अकरावीचे प्रवेश कसे होणार?

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची एसएससी, सीबीएसई आणि आयसीएसई अशा तिन्ही बोर्डाची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. पण परीक्षा न घेता मूल्यमापन कसे करायचे? आणि सरसकट निकाल जाहीर केल्यास अकरावीचे प्रवेश नि:पक्षपाती कसे करायचे? असा नवीन पेच शिक्षण विभागासमोर आहे.

वस्तुनिष्ठ निकष पद्धतीने निकाल जाहीर करू असं सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केलंय. यासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार की यापूर्वी घेतलेल्या अंतर्गत परीक्षांच्या आधारे गुण देणार हे मात्र अस्पष्ट आहे.

दुसऱ्या बाजूला एसएससी बोर्डाने मात्र दहावीचा निकाल कसा जाहीर केला जाईल? याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक किंवा इतर कोणत्या माध्यमातून केले जाईल याबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रम कायम आहे.

याबाबत गोंधळ आणि भीतीचे वातावरण असण्याचे कारण म्हणजे अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असते. नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांसाठी एक-एक टक्का महत्त्वाचा मानला जातो. अशा परिस्थितीमध्ये गुण देताना नि:पक्षपात आणि एकसमान पद्धती अवलंबण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

तेव्हा दहावीचा निकाल कसा जाहीर करणार? अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी पार पडणार? सीबीएसईप्रमाणे एसएससी बोर्ड सुद्धा वस्तुनिष्ठ निकष पद्धती (ऑब्जेक्टिव्ह) वापरणार की परीक्षेचा नवीन पर्याय शोधणार? आताच्या अपवादात्मक परिस्थितीत शिक्षण विभागासमोर कोणते पर्याय आहेत? याचा आढावा आपण या बातमीत घेणार आहोत.

एसएससी आणि सीबीएसई बोर्ड विद्यार्थ्यांना गुण कशाच्या आधारे देणार?

दहावीची परीक्षा रद्द केल्याने त्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापन करून किंवा इतर पर्यायी पद्धतीच्या आधारे करता येईल का याबाबत चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

"ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण अपेक्षित असतील त्यासाठी त्यांना कशी संधी देता येईल याबाबतही लवकरच निर्णय जाहीर करू. एकसमान पद्धती राबवण्यासाठी इतर बोर्डांप्रमाणेच असेसमेंटचा निर्णय घेण्यात येईल," असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

पण एसएससी बोर्डाच्या परीक्षा पद्धतीनुसार केवळ 20 गुणांसाठी अंतर्गत मूल्यमापन (तोंडी परीक्षा) केले जाते. त्यामुळे 20 गुणांच्या आधारे दहावीचा पूर्ण निकाल जाहीर केला जाऊ शकता का? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.

सीबीएसई बोर्डासाठी मात्र अंतर्गत मूल्यमापन आणि ऑब्जेक्टिव्ह परीक्षेचा पर्याय तुलनेने शक्य आहे असं शिक्षणतज्ज्ञ सांगतात.

याविषयी बोलताना सीबीएसई बोर्डाच्या पोद्दार शाळेच्या मुख्याध्यापिका अवनीता बीर सांगतात, "वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारावर म्हणजे केंद्रीय बोर्ड काही वेगळ्या पर्यायांचा विचार करत आहे असे दिसते. यात इंटरनल असेसमेंट, प्रोजेक्ट्स, असाईनमेंट्स किंवा ऑब्जेक्टिव्ह (MCQ) असे पर्याय असू शकतात. वर्षभरात शालेय स्तरावर घेतलेल्या अशाच परीक्षांच्या गुणांवरही निकाल जाहीर करू शकतात."

अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी पार पडते?

दहावीच्या निकालाच्या आधारे अकरावी, डिप्लोमा, आयटीआय, स्किल डेव्हलपमेंट अशा विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश होतात. यापैकी विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल अकरावी प्रवेशासाठी असतो.

एसएससी बोर्डाच्या माध्यमातून दरवर्षी जवळपास 14 लाख विद्यार्थी तर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातून सुमारे एक लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यामुळे राज्यात अकरावी प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा असते.

शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी जवळपास 5 लाख 60 हजार प्रवेशाच्या जागा आहेत. तर डिप्लोमासाठी 1 लाख 5 हजार आणि आयटीआयसाठी 1 लाख 45 हजार जागा उपलब्ध आहेत.

म्हणजेच परीक्षा देणारे विद्यार्थी पंधरा ते सोळा लाख आणि अकरावी प्रवेशाच्या जागा केवळ साडे सात लाख अशी परिस्थिती आहे.

यंदा लेखी परीक्षा होणार नसल्याने दहावीतून अकरावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे साहजिकच यंदा प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार आहे.

महाराष्ट्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून होतात. म्हणजेच विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयाकडून येणारा प्रवेश अर्ज भरावा लागतो. या प्रवेश अर्जात विद्यार्थ्यांना महाविद्यालये प्राधान्यक्रमानुसार निवडता येतात.

प्रत्येक महाविद्यालय तीन ते चार प्रवेश फेऱ्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण करतं. प्रत्येक फेरीसाठी कट ऑफ यादी जाहीर होते. यात विद्यार्थ्यांना किती गुण किंवा टक्के मिळाले आहेत त्यानुसार प्रवेशाची यादी महाविद्यालय जाहीर करतं.

तेव्हा विद्यार्थ्यांना कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार हे विद्यार्थ्याला किती टक्के गुण मिळाले आहेत यावर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दहावीच्या परीक्षेचा निकाल महत्त्वाचा असतो.

अकरावीसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा (एंट्रन्स) घेतली जाणार का?

दहावीची परीक्षा रद्द झाली असली अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र परीक्षा घेण्याबाबत नव्याने चर्चा सुरू झालीय.

दहावीच्या प्रत्येक विषयाची स्वतंत्र परीक्षा घेण्यापेक्षा केवळ एक दिवसात प्रवेश परीक्षा घेऊन त्याआधारे अकरावीचे प्रवेश केले जाऊ शकतात का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. पण केवळ एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा घेतली तर आक्षेप घेतला जाऊ शकतो असंही मत काही शिक्षणतज्ज्ञांनीही व्यक्त केलं.

शिवाय, सरकारने केवळ परीक्षाकेंद्री राहू नये तर अभ्यासक्रमातील संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट झाल्या आहेत की नाही हे देखील पाहावे? यासाठी ब्रीज कोर्स असावा अशीही मागणी केली जात आहे.

मुंबईतील एनएम महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य सुनील मंत्री यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सीबीएसई बोर्डाने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देणार असल्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आता अकरावीसाठी प्रवेश परीक्षा घ्यायची असल्यास याचा निर्णय राज्य सरकार एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊ शकतं. त्यामुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्यात येतील आणि एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मात्र प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. यामुळे पुन्हा नव्याने वाद निर्माण होऊ शकतो."

ते पुढे सांगतात, "शिक्षण विभाग सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा घेणार असेल तरच हा निर्णय योग्य ठरेल असं मला वाटतं. पण केंद्रीय बोर्डाने त्यांचा निर्णय आधीच जाहीर केला आहे."

"एक वर्ष शिक्षण विभागाने आणि राज्य शिक्षण मंडळाने काय केले? वर्षभरात याची तयारी का केली नाही?" असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दहावीच्या या विद्यार्थ्यांची परीक्षा गेल्यावर्षीही होऊ शकलेली नाही. म्हणजे नववीची परीक्षा न देताच विद्यार्थ्यांनी दहावीच्या वर्गात प्रवेश केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आकलन आणि गुणवत्ता शिक्षणाकडे भर द्यायला हवा असंही शिक्षक सांगतात.

जिल्हा परीषद शाळेचे शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मोठी आपत्ती येते तेव्हा काही पिढ्यांना ते भोगावे लागते. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आणि ही परिस्थिती निवळली तर प्रवेश परीक्षा घेण्यासही हरकत नाही."

"परीक्षा आणि मूल्यमापन नसेल तर विद्यार्थी अभ्यास करत नाहीत किंवा गांभीर्याने घेत नाहीत हे वास्तव आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आणि समजून घेण्याची उमेद ही परीक्षांमुळे असते. पण आता परिस्थिती अपवादात्मक आहे. वर्ष उलटून गेले तरी विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढे शिक्षण देता आलेले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का? विषय समजला आहे का? यासाठी आगामी काळात सखोल काम करावे लागणार आहे," असंही त्यांनी सांगितले.

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी मात्र यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले.

अकरावी प्रवेशासाठी कोणते पर्याय उपलब्ध?

1. शाळांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश (ज्युनियर कॉलेज)

राज्यातील अनेक शाळांचे कनिष्ठ महाविद्यालय सुद्धा आहेत. म्हणजेच शाळेच्या कॅम्पसमध्ये किंवा काही ठिकाणी स्वतंत्र असे कनिष्ठ महाविद्यालय आहेत.

नियमानुसार, विद्यार्थी दहावीचे शिक्षण घेत असलेल्या संस्थेचेच कनिष्ठ महाविद्यालय असल्यास त्याठिकाणी प्रवेशासाठी विद्यार्थ्याला प्राधान्य देण्यात येते.

यासाठी 10-20 टक्के इंटरनल कोटा आहे. तेव्हा अशा शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांच्यासाठी अकरावी प्रवेशाची स्पर्धा कमी होते.

सीबीएसई बोर्डाच्या बहुतांश शाळांची स्वत:ची कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना ते प्राधान्य देऊ शकतात. पण एसएससी बोर्डाची विद्यार्थीसंख्या ही सीबीएसईच्या तुलनेत पाच पटींनी जास्त आहे.

एसएससी बोर्डाच्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शाळांना जोडलेली कनिष्ठ महाविद्यालयं अपुरी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याला अकरावी प्रवेशासाठी स्पर्धेचा सामना करावा लागतो आणि म्हणूनच एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल महत्त्वाचा ठरतो.

2. असाईनमेंट्स किंवा गृहपाठाच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन

मुंबईतील बाल मोहन शाळेचे दहावीचे शिक्षक विलास परब सुचवतात, "यावर्षी विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण ऑनलाईन झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी सोडवण्यासाठी काही असाईनमेंट्स दिल्या आणि त्याचे गुण ग्राह्य धरले तरी ते गैर ठरणार नाही."

सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये असे उपक्रम आणि पूर्व तयारी परीक्षा वर्षभरात सातत्याने होत असतात. त्यामुळे यंदा एसएससी बोर्डाच्या शाळांनाही अशा सूचना केल्या जाऊ शकतात असंही काही शिक्षकांनी सांगितलं.

3. स्कॉलरशिप परीक्षेप्रमाणे ओएमआर पद्धतीने एक दिवसाची परीक्षा

ते पुढे सांगतात, "आपल्याकडे स्कॉलरशिप परीक्षा होतात. त्या ओएमआर पद्धतीने घेतल्या जातात. यात मुलांना पर्याय निवडायचे आहेत. या परीक्षेसाठी आपल्याकडे तयार यंत्रणा आहे. दहावीची नऊ विषयांची परीक्षा आहे. प्रत्येक विषयाचे एकूण गुण कमी केले तर एका दिवसातही ही परीक्षा घेता येणं शक्य आहे,"

"यामुळे उत्तरपत्रिका तपासणी रखडणार नाही. निकाल वेळेत जाहीर होईल आणि पुढील शैक्षणिक वर्षासाठी तयारी करण्यास आपल्याला पुरेसा वेळ मिळेल," परब सांगतात.

अशा विविध पर्यायांवर सध्या शिक्षण विभागाची चर्चा सुरू आहे. पण अकरावी प्रवेश कसे राबवायचे? असे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)