लॉकडाऊन नियमावली: निर्बंध आणखी कठोर, या आहेत महत्त्वाच्या 3 घोषणा

ब्रेक द चेन अंतर्गत राज्यातील लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

13 तारखेला जारी करण्यात आलेले नियम नव्या अतिरिक्त नियमांसह 1 मे पर्यंत लागू असणार आहेत. काय असतील नवे नियम जाणून घेऊया.

लग्न समारंभ

आता लग्न समारंभासाठी फक्त 25 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. याआधी लग्नाकरता 50 लोकांना परवानगी होती मात्र आता हे प्रमाण निम्म्यावर आलं आहे. एकाच हॅालमध्ये 2 तासात लग्न समारंभ आयोजित करता येऊ शकतो. लग्न समारंभात नियमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार दंड ठोठावण्यात येईल.

प्रवासी वाहतूक

आंतरजिल्हा प्रवास महत्त्वाच्या कारणांसाठीच केला जाऊ शकतो. मुंबईत खासगी गाडीत प्रवास 50 टक्के क्षमतेने करण्यात येईल. खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने चालवल्या जाऊ शकतात. उभ्याने प्रवास करता येणार नाही.

आंतरजिल्हा प्रवासासाठी स्थानिक आपात्कालीन व्यवस्थापनाची परवानगी आवश्यक असेल.

लोकल ट्रेनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश असेल. आयकार्ड तपासून प्रवेश देण्यात येईल.

सरकारी कार्यालयासाठी नियम

सरकारी कार्यालय 15 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

मंगळवारी (20 एप्रिल) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनीही कठोर लॉकडाऊनच्या निर्णयबाबत सहमती दर्शवली. राज्यात कडक लॉकडाऊन लावून राज्यातील नागरिकांचे लसीकरण व्हावे अशी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात कठोर लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. याबाबतची नियमावली राज्य सरकार जाहीर करेल असंही त्यांनी म्हटलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा असं आवाहन राज्यांना केलं आहे. देलॉकडाऊन हा शेवटचा पर्याय समजावा, कारण लॉकडाऊनमुळे खूप मोठे आर्थिक नुकसान होते, असं मोदींनी म्हटलं होतं.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधत लॉकडॉऊनची घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

14 एप्रिलपासून राज्यात संचार बंदीसह कडक निर्बंध लागू करण्यात आले. पण तरीही सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. आवश्यक कामांच्या नावाखाली लोक घराबाहेर पडत आहेत आणि यावर काही ठोस उपाय केला पाहिजे अशी चर्चाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली.

किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा

किराणा मालाच्या दुकानांची वेळही आता शासनाकडून बदलण्यात आली आहे. निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्यात अनेक जण कोरोनाच्या नियमांचं पालन करताना दिसत नाहीये त्यामुळे हा निर्णय घ्यावं लागल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती.

या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे (व्हीसीद्वारे), वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (व्हीसीद्वारे), अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रेल्वे प्रवासासाठी नवी नियमावली

राज्य सरकारच्या 'ब्रेक द चेन' या उपक्रमाअंतर्गत आता रेल्वे प्रवासासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि उत्तराखंड या सहा राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे.

ही सहा राज्ये कोरोना संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत. या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना 48 तासांपूर्वीचे RT- PCR टेस्ट बंधनकारक करण्यात आले आहेत.

अनेक प्रवाशांकडे RT-PCR चे रिपोर्ट नसू शकतात, अशा परिस्थिती रेल्वेने रॅपिड अँटीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करावी असंही या नियमांमध्ये म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)