SSC-HSC : दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षा मात्र होणार, कोरोनामुळे ठाकरे सरकारचा निर्णय

दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला.

"महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचं ठरलं," असं राजेश टोपे म्हणाले.

बारावीच्या परीक्षा मात्र होणार आहेत, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.

आरोग्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतच्या माहितीची व्हीडिओ ट्विटरवरून शेअर केला आणि त्यांनी सांगितलं की, "राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं लक्षात घेऊन, 12 एप्रिल 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला होता."

विद्यार्थ्यांचं अंतर्गत मूल्यांकन करून त्यांनी पुढील वर्गात बढती देण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

"आता शालेय शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतोय की, दहावीच्या परीक्षा रद्द करून, अंतर्गत मूल्यांकन करून ते पुढे कसे गेले पाहिजे, याबाबत आम्ही चर्चा करू. ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुणांची अपेक्षा असेल, त्यांच्याबाबतही भविष्यात निर्णय घेऊ. सर्व बोर्डात समानता असावी, म्हणून शालेय शिक्षणाच्या माध्यमातूनही आम्ही हा निर्णय घेत आहोत," असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

यापूर्वी म्हणजे 12 एप्रिल 2021 रोजी दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या नियोजित वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार होत्या. मात्र आता या परीक्षा 12 एप्रिल रोजी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

आता दहावीची परीक्षा पूर्णपणे रद्द, तर बारावीची परीक्षा होणार आहे, असा निर्णय घेण्यात आलाय.

बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्यात येईल, असं 12 एप्रिल रोजीच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)