लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, ANI
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. लालू प्रसाद यादव यांना जामीन
बहुचर्चित पशुपालन घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर झालाय. झारखंड हायकोर्टाचे न्यायाधीश अपरेश कुमार सिंह यांनी त्यांचा जामीन मंजूर केला.
तुरुंगातून बाहेर येण्यातले लालू प्रसाद यादव यांच्या मार्गातले अडथळे आता दूर झाले आहेत. या घोटाळ्यातल्या 4 प्रकरणांसंदर्भात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
यापैकी तीन प्रकरणांमध्ये त्यांना यापूर्वीच जामीन मिळालेला आहे.
लालू प्रसाद यादव यांच्यावर सध्या दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्स येथे उपचार करण्यात येत आहेत. फुफ्फुसात झालेल्या संसर्गामुळे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांची तब्येत ढासळली होती. सुरुवातीला त्यांच्यावर रांचीमध्ये उपचार करण्यात आले होते.
त्यांची तब्येत ढासळल्यानंतर त्यांना उपचारांसाठी एम्सला पाठवण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाने घेतला होता. तेव्हापासून ते एम्समधल्या डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत आहेत.
बीबीसी हिंदीने याविषयीची बातमी छापली आहे.
2. पोलिसांना चहा, पाणी किंवा शक्य असल्यास जेवण द्या - हेमंत नगराळे
राज्यात कोरोना व्हायरसचा प्रसार वाढत असल्यामुळे 15 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. पण तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी लोकांना भावनिक आवाहन केलं आहे.
"कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, याबाबत सगळी माहिती लोकांना दिलेली आहे. नागरिकांनी पोलिसांना शक्य तितकं सहकार्य करावं. त्यांनी पोलिसांना शक्य असल्यास जेवणही द्यावं, असं केल्यास आपली आपुलकी समोर येईल," असं हेमंत नगराळे म्हणाले.

फोटो स्रोत, facebook
कोणीही कडक पावलं उचलण्याची वेळ आणू नये, जर कोणाला समजत नसेल तर वेगळं पाऊल उचलावं लागेल. पोलिसांना जर कोणी शिव्या देत असेल ते योग्य नाही, असं कोणीही करू नये, असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिलाय.
"राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा सुरू आहे. मागच्या वेळीपेक्षा हा लॉकडाऊन थोडा वेगळा आहे. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून वागावे.
पोलीस आपली जबाबदारी पूर्ण करत आहेत. मागील वेळी 8000 पोलीस संक्रमित होते, आज 541 संक्रमित आहेत. एकूण 102 पोलीस मृत्युमुखी पडले आहेत, " अशी माहिती हेमंत नगराळे यांनी दिली.
ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
3. '...तर पूर्वीसारखा कडक लॉकडाऊन लावावा लागेल' - अजित पवार
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावर रोखण्यासाठी 15 दिवसांचे निर्बंध लावण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी गर्दी दिसत आहे.

फोटो स्रोत, facebook
लोकांनी परिस्थितिचं गांभीर्य ओळखून नियमांचं पालन करावं, नाही तर मागील वेळेसारखा कडक लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पुण्यातील कौन्सिल हॉलला आयोजित कोरोना आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.
"राज्यातील सगळ्या आमदारांना मिळणाऱ्या चार कोटी विकास निधीपैकी एक कोटी रुपये कोरोनासाठी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनासाठी 350 कोटी रुपये उभे राहणार आहेत. ऑक्सिजनसाठी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासोबत चर्चा केली आहे," अशी माहिती पवार यांनी दिली.
ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
4. राम मंदीर देणगी : 22 कोटी किंमतीचे तब्बल 15 हजार चेक बाऊन्स
राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी स्वरुपात देण्यात आलेले तब्बल 15 हजार चेक बाऊन्स झाल्याची माहिती श्री राम जन्म भूमी ट्रस्टच्या एका अहवालातून समोर आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बाऊन्स झालेल्या चेकची एकूण किंमत 22 कोटी रुपयांच्या आसपास होते. खात्यात पुरेसे पैसे नसणं किंवा इतर तांत्रिक अडचणींमुळे हे चेक बाऊन्स झाले आहेत, असंही या अहवालात म्हटलं आहे.
हे सर्व चेक विश्व हिंदू परिषदेने देणगी अभियानादरम्यान गोळा केले होते. विहिंपने 15 जानेवारी ते 17 फेब्रुवारीदरम्यान ही मोहीम राबवली होती.
बँक यादरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणींबाबत माहिती घेत आहेत. चेक वठू न शकलेल्या दात्यांनी पुन्हा दान करावं, असं आवाहन आम्ही केलं आहे, अशी माहिती ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी दिली.
ही बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
5. 'कालपर्यंत मुली उचलून आणण्याची भाषा करणारे आज साधूंसाठी आंदोलन करतात'
पालघरमधील 3 साधूंच्या हत्या प्रकरणाला शुक्रवारी (16 एप्रिल) एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्त भाजपआमदार राम कदम यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासमोर आंदोलन केलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"करून करून भागले आणि देवधर्माला लागले मराठीतली ही म्हण भाजपाच्या 'चमको' नेत्यांना तंतोतंत लागू पडते. कालपर्यंत मुली उचलून आणण्याची भाषा वापरणारे आज साधूंसाठी आंदोलन करतायत. जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आली आहे.
राम कदम यांच्याकडून पुन्हा एकदा पालघर घटनेवरुन राजकारण करणं हे त्यांच्या अपयशाचं प्रतीक आहे. करोना संकटाचं त्यांना कोणतंही गांभीर्य नाही, असंही राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं.
राम कदम यांच्याकड़ून अद्याप या टीकेला प्रत्युत्तर आलं नाही. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








