You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कौमार्य परीक्षेत नापास झाल्याचं सांगत दोन सख्ख्या बहिणींना माहेरी पाठवलं
- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूरहून
(पीडित मुलींची ओळख जपण्यासाठी या प्रकरणातील आरोपींची नावे देखील या बातमीत दिली गेली नाहीत.)
कौमार्य परीक्षेत नापास झाल्याचा ठपका ठेवत कोल्हापूर मधील दोन सख्ख्या बहिणींना लग्नानंतर माहेरी पाठवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
विशेष म्हणजे याबाबत समाजाच्या जात पंचायतीने मुलींचा काडीमोड झाल्याचा निर्णय दिला. कोल्हापूरमधील अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे याबाबत तक्रार आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात 8 जणाविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बहिणींवर अशा प्रकारे अन्याय झाल्यानं सगळीकडे संताप व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूरमधील कंजारभाट समाजातील एका कुटुंबातील दोन मुलींचा विवाह बेळगाव येथे झाला. दोन्ही बहिणींचा विवाह एकाच एकाच कुटुंबातील दोन भावांसोबत लावून देण्यात आला.
27 नोव्हेंबर 2020 रोजी हा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर समाजाच्या प्रथेनुसार लग्नानंतर या मुलींना कौमार्य चाचणी द्यावी लागली. त्यादरम्यान एक बहिण कौमार्य चाचणीत नापास झाल्याचं सासरच्या मंडळींनी म्हटलं. यावरुन आम्हा दोन्ही बहिणींच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करत घरच्या सदस्यांकडून मानसिक आणि शारीरिक अत्याचार करण्यात आले, असं या मुलींनी तक्रारीत सांगितलं.
लग्न झाल्यानंतर अवघ्या 3 ऱ्या दिवशी या दोन बहिणींना खोटं सांगत कोल्हापूरमध्ये माहेरी सोडण्यात आले. चारित्र्य सिद्ध करण्यात अपयशी ठरलेल्या या मुलींकडे सासरच्या लोकांनी 10 लाख रुपयांचा हुंडा मागितल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.
मुलींची घरची परिस्थिती हलाखीची असून आई धुणीभांड्याचं काम करते. त्यामुळं इतकी रक्कम जमा करणं अशक्य असल्याने या मुलींना खोटं सांगून माहेरी पाठवण्यात आल्याचं या मुलींनी सांगितलं.
7 एप्रिल रोजी या मुलींनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करत न्याय मागण्यासाठी दाद मागितली तेव्हा या प्रकरणाला वाचा फुटली.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या गीता हसुरकर यांनी सांगितलं की, "या मुलींनी समितीकडे तक्रार दिल्यानंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यात याबाबत संबंधित दोषीवर गुन्हा दाखल करण्यासाठी समितीने या मुलींना मदतीचा हात दिला."
दरम्यान पोलिस तक्रार करण्याआधी या बहिणींनी कंजारभाट समाजातील लोकांकडे न्यायासाठी मदत मागितली होती. मात्र याबाबत न्यायनिवाडा करण्याऱ्या जात पंचायतीने अजब निर्णय देत या मुलींवरच अन्याय केला.
या प्रकरणाचा निकाल देण्यासाठी कोल्हापूरमधील एका मंदिरात ही जातपंचायत भरवण्यात आली. यावेळी जातपंचायतीतील लोकांनी बाभळीच्या झाडाच्या काड्या मोडत या मुलींना त्यांचा काडीमोड झाल्याचं सांगितलं.
त्यानंतर या दोन्ही मुलींना तसेच मुलांना आपल्या इच्छेनुसार इतरत्र विवाह करण्याची मुभा असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. विशेष म्हणजे हा काडीमोड करण्यासाठी एका डमी मुलाला नवरा म्हणून उभं करण्यात आलं होतं.
याबाबत अखेर काल रात्री उशिरा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वावर मुलींचे मानसिक आणि शारिरिक शोषण केल्याच्या आरोपाखाली 498 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे मुलींवर अन्याय झाल्याचं बोललं जातंय. याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी होतेय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)