मधुबनी हत्याकांडानंतर बिहारमध्ये जातीचं राजकारण का उफाळलं?

    • Author, नीरज प्रियदर्शी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, बिहारमधून

धुळवडीच्या दिवशी म्हणजे 29 मार्च रोजी बिहारमधील बेनीपट्टी ठाण्याच्या हद्दीतील मोहम्मदपूर गावात एकाच कुटुंबातील 5 लोकांची हत्या करण्यात आली.

मधुबनी पोलिसांच्या मतानुसार या हत्याकांडामागे आपसातील वैमनस्य असावं. या घटनेतील 35 जणांपैकी 11 लोकांना अटक करण्यात आलेली आहे. परंतु मुख्य आरोपीला अजूनही पकडता आलेलं नाही.

आता हे हत्याकांड बिहारच्या राजकारणाचं नवं केंद्र झालं आहे. मंगळवारी पीडित कुटुंबाला भेटायला आलेले विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी ही घटना म्हणजे नरसंहार आहे असं सांगितलं. तसेच पोलीस, प्रशासन आणि भाजपाचे स्थानिक आमदार आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या घटनेची चौकशी केली जात असून वेगवान ट्रायलद्वारे सुनावणी होईल असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले आहे. कोणत्याही दोषी व्यक्तीची गय केली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय.

हत्याकांडाचं कारण काय?

स्थानिक माध्यमांच्या बातम्यांनुसार या हत्याकाडांच मूळ कारण दोन गटांमधी पूर्ववैमनस्यात आहे. हा वाद एका मठाच्या जागेवरुन आहे. या जागेवर मठाच्या महंतांचा ताबा होता.

पोलीस रेकॉर्डनुसार गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात या मठाच्या हद्दीत मासेमारी करण्यावरुन दोन गटांत हाणामारी झाली होती. ते प्रकरण बेनीपट्टी ठाण्यात एससी/एसटी कायद्यानुसार नोंदवलं गेलंय. त्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही गजाआड आहे.

मधुबनीचे एसपी डॉ. सत्यप्रकाश बीबीसीला म्हणाले, "आतापर्यंत तपासातून मिळालेल्या माहितीनुसार हे हत्याकांड मासे पकडण्याच्या वेळेस झालेल्या हाणामारीचाच भाग आहे. घटनास्थळावरुन एकूण पाच मोटरसायकली, गोळ्यांचे आठ खोके, एक मोबाइल, रक्त लागलेल्या दोन सळ्या आणि रक्त सांडलेली माती गोळा केली आहे. न्यायवैद्यक चाचणीतून सर्व काही स्पष्ट होईल."

या हत्याकांडाचा तपासणी अहवाल सीपीआयने (एमल) प्रसिद्ध केला आहे. त्या अहवालानुसार या हत्येमागे पूर्ववैमनस्य आहेच पण गुटखा खरेदीवरुन झालेला तात्कालीक वादही आहे.

सीपीआय (एमएल) चे राज्य सचिव कॉमरेड कुणाल सांगतात, "आरोपी गटाच्या लोकांनी महंतांच्या मुलाच्या टपरीवरुन गुटखा घेतला पण पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे हाणामारी झाली. त्यानंतर काही वेळाने आरोपींच्या गटाच्या 2 डझनाहून जास्त सशस्त्र लोकांनी महंतांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला असं आम्हाला तपासात दिसलं आहे."

पीडित काय सांगतात?

या पीडितांचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यामध्ये तीन भावांसह पाच जणांची हत्या झालेले कुटुंब दुःखात बुडालेलं दिसतं. या कुटुंबाचे प्रमुख सुरेंद्र सिंह बीबीसीला फोनवर म्हणाले, "माझ्या तीन मुलांना मारुन टाकलं, एक मुलगा जेलमध्ये होता म्हणून वाचला. तो असता तर त्यालाही मारलं असतं. ते लोक पूर्ण तयारीनं आलेले."

मठाची जमीन आणि मासेमारीच्या वादाबद्दल ते म्हणाले, "मठाची जमीन आम्हाला आमच्या पूर्वजांनी दिलेली. आमच्या कुटुंबातील लोक नेहमीच मठाच्या महंतपदी राहिलेत. मागच्या वर्षी जेव्हा त्या लोकांनी (आरोपी) तिथं मासेमारी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही त्यांना थांबवलं. त्यांनी माझ्या मोठ्या मुलाचे पाय कापून टाकले आणि त्याच्याच विरोधात एससी/एसटी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आणि त्याला तुरुंगात टाकलं."

राजकीय उठबस जास्त असल्यामुळे स्थानिक पोलीस आणि प्रशासन आरोपींना नेहमीच संरक्षण देत आलं आहे असा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे.

सुरेंद्र सिंह म्हणतात, " तुम्हीच विचार करुन पाहा, माझ्या मुलाचा पाय कापला आणि त्यालाच तुरुंगात टाकलं. या घटनेवेळेस पोलिसांना अनेकदा फोन केला तेव्गा चार तासांनी पोलीस आले. तोपर्यंत सर्व आरोपपी पळून गेले होते. आता पोलीस सांगतायत की आरोपी फरार आहे, पण आमच्या माहितीनुसार तो उजळमाथ्यानं फिरत आहे."

कोण आहे आरोपी?

तसं पाहायला गेलं तर या हत्याकांडात 35 आरोपींचं नाव पोलीस डायरीत नोंद आहे. पण सर्वांत विशेष नावं प्रवीण झा आणि नवीन झा यांची आहेत. या दोघांनाही मुख्य आरोपी बनवण्यात आलं आहे.

प्रवीण झा यांच्या फेसबूक प्रोफाइलनुसार ते आगामी पंचायत निवडणुकीत सरपंचाची निवडणूक लढण्याची तयारी करत होते. ते स्वतःला भावी सरपंचही म्हणवतात.

स्थानिक पत्रकार विजय कुमार म्हणतात, "प्रवीण झा बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष आहे आणि रावणसेना नावाने एक स्थानिक संघटनाही चालवतात. ही संघटना कथितरित्या ब्राह्मणहिताचा विचार करते आणि राजकीयदृष्ट्या ते बरेच सक्रीय आहेत."

मधुबनीचे पोलीस प्रमुख डॉ. सत्य प्रकाश म्हणाले, सध्या दोन्ही मुख्य आरोपी फरार आहेत.

जातीचे राजकारण

मधुबनी हत्याकांडाबाबतीत जातीवरुनही चर्चा होत आहे. दोन्ही पक्षात जातीय तणावही होता. पीडित परिवार राजपूत आणि आरोपी मुख्यतः ब्राह्मण आहेत.

स्थानिक पत्रकार विजय म्हणतात, "पीडितांच्या घरी सांत्वनासाठी राज्यभरातून राजपूत नेते येत आहे. सत्ताधारी पक्षाचे आणि विरोधी पक्षाचेही नेते त्यात आहेत. स्थानिक स्तरावर याला ब्राह्मण आणि राजपुतांचा वाद मानला जात आहे. दोन्ही गटांमध्ये मठाचे महंत होण्यासाठी पिढ्यानपिढ्या वाद होत आहे."

मधुबनी हत्याकांडानंतर अखिल भारतीय करणी सेनासुद्धा भरपूर सक्रिय झाली आहे. करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांनी या प्रकरणी एक व्हीडिओ संदेश प्रसारित केला आहे. जर यातील आरोपींना सात दिवसांमध्ये अटक झाली नाही तर त्यांची संघटना मोठं आंदोलन करेल असं ते या व्हीडिओत म्हणत आहेत.

करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील सिंह बीबीसीला म्हणाले, "नितिश कुमार यांच्या राजवटीमध्ये राजपुतांवर अत्याचाराची परिसिमा गाठली आहे. पहिल्यांदा आम्हाला राज्याच्या राजकारणातून हटवण्याचे प्रयत्न झाले. आता आमच्या समाजातील लोकांना दिवसाढवळ्या मारलं जात आहे. हे सगळं सरकारच्या संरक्षणाखाली होत आहे."

सुनिल सिंह म्हणतात, "1993 सालीसुद्धा त्या लोकांनी मठाच्या महंतांची हत्या केली होती. तेव्हाही काही झालं नाही. आता तर महंतांच्या पूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करुन टाकलं. तरीसुद्धा काहीही होत नाहीये. मी पिडितांना दोनवेळा भेटून आलो. ते लोक एकटे पडू नयेत म्हणून आमचे करणी सैनिक तिथे जमत आहेत. मुख्य आरोपी उघडपणे फिरत आहेत कारण स्थानिक आमदार त्यांच्या बाजूने आहेत."

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी मंगळवारी आपलं स्पष्टीकरण दिलं.

संजय जयस्वाल म्हणाले, "पीडित कुटुंबाकडे सर्वांत आधी आमचे मंत्री नीरज सिंह बबलू पोहोचले होते. सर्वांत आधी आमच्यातर्फे कारवाईची मागणी करण्यात आळी. आमच्या नेत्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. अशास्थितीत कुणाला वाचवण्याचा प्रश्न येतोच कोठे? अशी चर्चा करणारे राजकारण करत आहेत."

पोलीस काय म्हणतात?

सध्यातरी या प्रकरणाला जातीय संघर्ष मानण्यास पोलीस प्रशासन नकार गेत आहे. दरभंगा रेंजचे आयजी अजिताभ कुमार यांनी महमदपूर गावात जाऊन हत्याकांडाची चौकशी केली होती. त्याबद्दल ते म्हणतात, "हे प्रकरण दोन जातींमधलं नाही तर दोन गटांमधील वैमनस्याचं आहे. पोलिसांकडे असलेल्या पुराव्याच्या आधारे आरोपींना अटक करण्यासाठी छापेमारी केली जात आहे. आयटी सेलचीही मदत केली जात आहे."

या हत्याकांडाच्या तपासात पोलीस ढिसाळपणे काम आणि आऱोपींना आरक्षण देत आहेत या आरोपाबद्दल मधुबनीचे एसपी सत्य प्रकाश म्हणाले, "ढिसाळ कामाच्या आरोपाखाली बेनीपट्टी ठाण्याच्या प्रभारींना हटवलेलं आहे. घटना घडलेल्या रात्रीच एसआयटी स्थापन करुन तपास सुरू केला होता. त्याच रात्री 8 आरोपींना अटक केली होती. आता हे प्रकरण इतकं मोठं झालं आहे की आता कोणाला संरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही."

पोलीस जरी या प्रकरणात जातीचा मुद्दा नसल्याचं सांगितलं असलं तरी या प्रकरणात राजकारण इतकं वाढलं आहे की आरोपींवर लवकर कारवाई करण्याची मागणी जदयूचेच राजपूत नेते नितिश कुमार यांच्याकडे करत आहेत.

मंगळवारी जदयू नेतांच्या एका शिष्ट मंडळानं मुख्यमंत्री निवासस्थानी म्हणजे 1, अणे मार्ग येथे जाऊन त्यांची भेट घेतली. यात राज्यातील माजी मंत्री जयकुमार सिंह, माजी आमदार मंजित सिंह, राणा रणधीर सिंह, शैलेंद्र प्रताप सिंह, ललन सिंह, विजय सिंह आणि जदयू प्रवक्ते डॉ. सुनील सिंह सहभागी होते. त्यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्यांनी डीजीपींशी बोलून पीडित कुटंबाला संरक्षण देण्याचे आदेश दिले.

आता येणाऱ्या काळात पोलीस काय आणि किती लवकर कारवाई करते आणि राजकारणाच्या मैदानात याचे प्रतिध्वनी किती दूरवर उमटत राहातील हे पाहावं लागेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)