अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकाकी पडले होते का?

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार असल्यानं देशमुख यांनी राजीनामा दिला आहे.

या प्रकरणाची सीबीआय चौकशी होत असल्याने पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याचं अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

पण, गेल्या वर्षभरातील त्यांचा कार्यकाळ आणि त्या दरम्यानच्या घटना पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते एकाकी पडले होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तो का हे समजून घेण्यासाठी गेल्या वर्षभरातील घडामोडींवर नजर टाकू.

शरद पवारांनी दिली संधी

2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांच्या सारखे दिग्गज नेते निवडून आले होते. पण असं असतानाही शरद पवारांनी गृहमंत्रिपद अनिल देशमुखांना देँण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.

सत्ता स्थापनेच्या काळात गृहखात्यात नेमकं काय काय घडलं होतं याची आता बरीच चर्चा सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर बहुदा पवारांना गृहमंत्रिपदी अशी व्यक्ती हवी होती जी त्यांच्या मर्जीच्या बाहेर जाऊ शकणार नाही आणि ती व्यक्ती त्यांना अनिल देशमुख यांच्या रुपाने सापडली.

अनिल देशमुख हे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या जवळचे मानले जातात.

गेल्या वर्षभरात अनिल देशमुख यांच्या रुपानं गृहखात्यावर शरद पवार यांचा किती वचक होता हे सर्वांनी पाहिलं आहे.

पण हे मंत्रालय हाताळताना अनिल देशमुख त्यांच्या पक्षातच एकटे पडले होते का असा सवाल आता उपस्थित होत आहे.

त्याला तशी कारणंसुद्धा आहेत.

पक्षात एकाकी पडल्याचं चित्र

गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात विरोधकांनी अनिल देशमुख यांना पुरतं भांबावून सोडलं होतं. पण, त्यांच्या मदतीला त्यांच्या पक्षातले नेते फारसे धावून आल्याच दिसलं नाही.

सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांनी अनिल देशमुख यांची पुरती कोंडी केली होती. तेच तेच स्पष्टीकरण देशमुख सतत सभागृहात देत होते.

पण विरोधकांची धार काही कमी होत नव्हती. एक वेळतर आली की विरोधकांच्या हल्ल्याला उत्तर देतांना देशमुख कमी पडत आहेत की काय अशी स्थिती निर्माण झाली. तेव्हा छगन भुजबळ, अजित पवार यांच्या सारखे वरिष्ठ राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते, पण त्यांच्या मदतीला मात्र कुणी फारसे धावून येताना दिसले नाहीत.

जितेंद्र आव्हाड आणि अनिल परब तवढे काय त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करत होतो तेवढंच.

या आधीसुद्धा सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ते एकटेच किल्ला लवढवत होतो. एकटेच बाजू मांडत होतो. त्या उलट अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी देशमुखांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली आणि त्यांनाच कोंडीत आणण्याचा प्रयत्न केला होता.

पक्षातूनच कोंडी?

सलग पंधरा वर्षाच्या सत्तेत राष्ट्रवादीकडून आर.आर. पाटील, छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी गृहमंत्रिपद सांभाळलं आहे.

त्यापैकी आर. आर. पाटील यांच्याकडे सर्वांत जास्त काळ गृहमंत्रिपद होतं. पण 2008 च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर त्यांनी दिलेल्या एक वक्तव्यामुळे त्यांचं पद गेलं होतं.

तर बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्यासारखे निर्णय छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात घेण्यात आले होते.

ही तिन्ही नेते मंडळी ज्येष्ठ आहेत अनुभवी आहेत. तसंच स्वतः निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात.

पण तीन पक्षाचं सरकार चालवताना गृहमंत्रिपद अत्यंत महत्त्वाचं आहे. अशावेळी ते अनुभवी मंत्र्याकडे देण्यात येईल असं वारंवार बोललं गेलं. अजित पवार यांना गृहमंत्री केलं जाईल अशीसुद्धा चर्चा झाली. पण, तसं झालं नाही. त्याला त्यांचा पहाटेचा शपथविधी कारणीभूत ठरल्याचीसुद्धा चर्चा रंगली.

तर गृहमंत्री होण्याची इच्छा नसल्याचं जयंत पाटील यांनी माझ्याशी बोलताना म्हटलं होतं. मधल्या काळातही त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी इच्छा नसल्याचं म्हटलं होतं.

पण ज्यावेळी अनिल देशमुख अडचणीत यायला सुरुवात झाली तेव्हा मात्र काही इच्छुक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली. त्यात जितेंद्र आव्हाड यांचंसुद्धा नाव आहे. त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी फेसबुकवर मोहीमसुद्धा सुरू केली. पण ती फारशी वेग पकडू शकली नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)