परमबीर सिंह : गुप्तेश्वर पांडे यांच्या राजकारण प्रवेशावर मुंबई पोलीस कमिश्नर काय म्हणाले?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू, राजकारण आणि मुंबई पोलिसांवर होणारे आरोप. याबाबत बीबीसीने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी बातचीत केली.

प्रश्न - एम्सच्याडॉक्टरांनी सुशांतने आत्महत्या केल्याचा रिपोर्ट दिलाय. याबाबत तुम्ही काय सांगाल?

परमबीर सिंह- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर आम्ही चौकशी सुरू केली. या प्रकरणी ADR (Accidental Death Report) रजिस्टर करण्यात आला होता. 16 जूनला पोलिसांनी सुशांतचे वडील,3 बहिणी आणि बहिणीच्या नवऱ्याचा जबाब नोंदवला होता. सर्व नातेवाईकांनी सुशांतने आत्महत्या केली. त्यांना कोणावरही संशय नाही, यासाठी कोणी जबाबदार नाही असं सांगितलं. कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पोस्टमार्टम केलं फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी स्पॉटची पाहणी केली. सर्व पुरावे आणि माहिती गोळा होईपर्यंत क्राइम सिन योग्य पद्धतीने ठेवण्यात आला होता.

डॉक्टरांनी Aspexia Due to Hanging असा रिपोर्ट दिला. हा रिपोर्ट आत्महत्येकडे इशारा करत होता. त्यानंतरही आमची चौकशी सुरू राहिली. ही आत्महत्या असेल कर यासाठी कोणी जबाबदार आहे का? याबाबत आम्ही चौकशी सुरू केली. यासाठी लोकांचे जबाब नोंदवण्यात आले. डिप्रेशन, बायपोलर डिसऑर्डर, आर्थिक गैरव्यवहार, प्रोफेशनल रियवलरी (Professional Rivalry) याबाबत चौकशीसाठी 56 साक्षीदार तपासण्यात आले.

त्यानंतर 40-45 दिवसानंतर सुशांतचे वडील बिहारला गेले आणि त्यांनी एक गुन्हा दाखल केला. सुशांतने आत्महत्या केली, मात्र यासाठी काही लोक जबाबदार आहेत असा ओरोप त्यांनी केला. तेव्हाही त्यांचा आरोप खूनाचा नव्हता. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं. राज्य पोलिसांनी एक प्रोग्रेस रिपोर्ट सुप्रीम कोर्टात दिला. कोर्टानेही मुंबई पोलिसांचा तपास चुकीचा नाही असं सांगितलं.

मात्र त्यानंतर, अचानक काही आवड्यांपूर्वी मीडियाने ही हत्या होती. मुंबई पोलिसांनी हत्येचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पुरावे नष्ट केले. साक्षीदारांना धमकावल्याचा आरोप झाला. सोशल मीडिया अचानक खूप अक्टिव्ह झाला.

हे कुठून सुरू होतं याची माहिती आता बाहेर येत आहे. लाखो फेक अकाउंट बनवण्यात आले. याची माहिती बाहेर येत आहे. सायबर विभाग याची चौकशी करतोय. मीडियातील काही चॅनल्स खोट्या बातम्या दाखवत होते. या बातम्या मोठ्या करून दाखवण्या येत होत्या. पोलिसांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना चौकशीबाबत काही माहिती नव्हती. आता हे सर्व समोर येत आहे की, पोलिसांविरोधात एक अजेंडा आणि प्रोपगेंडा चालवण्यात आला होता. आणि आता आम्ही गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

प्रश्न - याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी खूप वेळ घेतला. जर पोलिसांकडे सुशांतने आत्महत्या केल्याचे पुरावे होते तर आधीच लोकांसमोर का नाही आणण्यात आले? यात उशीर झाला?

परमबीर सिंह- पोस्टमार्टम रिपोर्ट मीडियासमोर होते. मात्र काही एक्सपर्ट आणि सोशल मीडिया हा रिपोर्ट चुकीचा आहे, असा आरोप करत होते. मुंबई पोलिसांची चौकशी सुरू होती. रिपोर्ट सुप्रीम कोर्टाला दाखवण्यात येत होता. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही. कोर्टाला दिली जात नाही. तोपर्यंत लोकांना ही माहिती दिली जात नाही. कोर्टाने confidential रिपोर्ट मागितला आम्ही तो सूपूर्द केला. त्यामुळे पोलिसांनी उशीर केला असं म्हणणं चुकीचं आहे. 40-45 दिवसांचा कालावधी उशीर नाही. ADR च्या तपासासाठी 3 ते 6 महिने लागतात. कोणताही तपास 40-45 दिवसात पूर्ण होत नाही.

सीबीआयकडे चौकशी जावून महिला उलटून केला. एम्सच्या डॉक्टरांनी रिपोर्टसाठी जवळपास 45 दिवस घेतले. आमच्या डॉक्टरांनी 2-3 आठवड्यात सर्व रिपोर्ट दिले. आम्ही आत्महत्याच नाही तर आत्महत्येसाठी कोणी जबाबदार आहे का याची चौकशी करत होतो.

प्रश्न - तुम्ही म्हणताय फेक अकाउंट तयार करण्यात आले. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यात आली. मग हे केलं कोणी?

परमबीर सिंह- आम्ही फेसबूक, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडून याची माहिती देण्याची मागणी केली आहे. त्यांना समन्स पाठवून रेकॉर्ड देण्यास सांगण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांविरोधात मोहिम कोणी चालवली? हा प्रोपगेंडा कोणी सुरू केला? याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोव्हिडच्या काळात पोलीस दल लढत असताना हा अजेंडा का चालवण्यात आला हे मला कळत नाहीये.

प्रश्न - हा अजेंडा कोणाचा होता?

परमबीर सिंह - आमची चौकशी सुरू आहे. लवकरच आम्ही याच्या तळात पोहोचू आणि सत्य बाहेर येईल. हे अकाउंट जुने नाहीत. सुशांतच्या controversy नंतर तयार करण्यात आलेले नवीन अकाउंट आहेत. हे अकाउंट मुंबंई पोलिसांना बदनाम करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले बाकी याचा उद्देश काही नव्हता.

प्रश्न - काँग्रेसने आरोप केलाय हा अजेंडा भाजपच्या आयटी सेलने राबवला. पोलीस यांचा तपास करणार का?

परमबीर सिंह- आम्ही राजकीय दृष्टीकोनातून याचा तपास करत नाही. फेक अकाउंट कोणी तयार केले. पोस्ट कोणी केल्या. याबाबत आम्ही चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत राजकीय दृष्टीकोन नाही.

प्रश्न - हे अकाउंट कुठून बनवण्यात आले?

परमबीर सिंह- विदेशातील विविध देशातून हे अकाउंट सुरू करण्यात आले याची माहिती मिळाली आहे. नक्की कोणी केले, केव्हा केले याची माहिती चौकशीतून समोर येईल.

प्रश्न - या मुद्यावर राजकारण झालं. बिहारचे माजी डीजीपी निवडणूक लढवणार आहेत. या मुद्याचा वापर राजकारणासाठी झाला?

परमबीर सिंह- माझ्यापेक्षा सर्व्हिसमध्ये सिनिअर असलेल्या अधिकाराचं आचरण त्यांची आकांक्षा यावर मी काही बोलणार नाही. मला राजकीय अजेंडावर काहीही बोलायचं नाही.

प्रश्न - रिया चक्रवर्तीला एनसीबीच्या प्रकरणात जामीन मंजूर झालाय. रियावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप आहे. तुमच्या चौकशीत काय पुढे आलं?

परमबीर सिंह- आमची चौकशी सुरू होती. आत्महत्येसाठी कोणी प्रवृत्त केलं का? हे खरं होतं? असेल तर कोण जबाबदार? याबाबत चौकशी सुरू होती. आम्ही ठोस निष्कर्षाला पोहोचलो नव्हतो. सुप्रीम कोर्टाने बिहारची चौकशी साबीआयला दिल्यानंतर आम्ही चौकशी थांबवली. त्यामुळे दोन एजन्सी चौकशी करू नये म्हणून का निर्णय घेतला.

हायकोर्टाच्या आदेशात डृग्जच्या प्रकरणाचा सुशांत केसशी संबंध नाही असं म्हणण्यात आलंय. मुंबई पोलीस काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत होते असं पसरवण्यात आलं. पण एनसीबीने दोन्ही प्रकरणं वेगळी आहेत हे मान्य केल. हायकोर्टात हे देखील समोर आलं की सुशांत डृग्ज घेत होता. कोर्टाच्या आदेशाबाबत मी जास्त बोलणार नाही.

प्रश्न - एका बड्या नेत्याला वाचवण्यासाठी पोलिसांनी चौकशी केली नाही या आरोपावर तुम्ही काय म्हणाल?

परमबीर सिंह- आम्ही कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. आमची चौकशी प्रोफेशनल होती. आमची चौकशी योग्य होती हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. त्यामुळे आमच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. हा अजेंडा पसरवणाऱ्या सूत्रधारांवर कारवाई केली जाईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)