मुंबई कोरोना : रहिवासी सोसायट्यांसाठी बीएमसीने लागू केले 'हे' नवीन नियम

मुंबईत कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद गेल्या काही दिवसांपासून होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईतील छोट्या वस्त्या, झोपडपट्ट्या या भागांत कोरोना वेगाने पसरत होता. यावेळी मात्र मुंबईतील रहिवासी इमारतींमध्ये रुग्णसंख्या अधिक असल्याचं मुंबई महानगरपालिकेने सांगितलं आहे.

पालिकेने मुंबईतील शेकडो इमारती सील केल्या असून हजारो मजले आतापर्यंत सील करण्यात आले आहेत.

3 एप्रिल रोजी मुंबईत 9 हजार 90 नव्या रुग्णांची वाढ झाली तर 27 जणांचा मृत्यू झाला.

मुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहता आता रविवारीही लसीकरण केंद्र सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून विशेषत: रहिवासी इमारतींसाठी म्हणजेच सोसायट्यांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

हे आहेत नवीन नियम

• घराबाहेर पडताना प्रत्‍येकाने सॅनिटायझर, मास्‍क आणि हँडग्लोव्ह्ज वापरावेत.

• सोसायटीतील लहान मुले, ज्‍येष्‍ठ नागरिक हे घराबाहेर विनाकारण जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे.

• सोसायटी/वसाहतीमध्‍ये दोन व्‍यक्‍तींमध्‍ये किमान सहा फूट अंतर राखूनच संवाद साधावा.

• सोसायटीतील प्रतीक्षागृहाचा शक्‍यतो उपयोग करु नये. ते बंदच ठेवावे.

• सोसायटीत दरवाजा, कठडे (हॅण्‍ड रेलिंग), लिफ्ट, बाकं, वाहनतळ अशा विविध ठिकाणी कुठेही हात लावणे टाळावे.

• सोसायटीतील लिफ्टचा उपयोग करताना हातात कागद ठेवावा. लिफ्टची बटणे दाबताना कागदी पट्ट्यांचा उपयोग करावा. असे कागदी तुकडे वापरानंतर लगेच काळजीपूर्वक कच-याच्‍या डब्‍यात टाकावेत.

• सोसायटीतून/वसाहतीतून पुन्‍हा घरात येताच कुठेही स्‍पर्श न करता सर्वात आधी साबणाने हात स्‍वच्‍छ धुवावेत.

• सोसायटीमध्‍ये किंवा परिसरात बाहेरील कोणत्याही व्यक्तिला थेट प्रवेश देऊ नये.

• बाहेरुन येणारे मदतनीस, वाहन चालक, कचरा संकलक, सफाई कर्मचारी यांच्‍यासाठी शारीरिक तापमान तपासणी, प्राणवायू तपासणी, हात स्‍वच्‍छ धुण्‍याची सोय आदी बाबी उपलब्‍ध असल्‍याची खातरजमा करावी.

• ऑनलाईन पार्सल मागवल्‍यानंतर, ते थेट घरात न मागवता, सोसायटीच्‍या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाकडे / सुरक्षित अशा एकाच ठ‍िकाणी ठेवण्‍याची व्‍यवस्‍था करावी. तेथून निर्जंतुकीकरण करुन ते घरात न्‍यावे. शक्‍य असल्‍यास काही तास ते पार्सल खुल्‍या जागेत राहू द्यावे आण‍ि नंतर घरात न्‍यावे.

• सोसायटीतून बाहेर पडताना वाहनांना स्‍पर्श करण्‍यापूर्वी त्‍यांचे निर्जंतुकीकरण करावे.

• नजीकचे महापालिका आरोग्य केंद्र, रुग्णालय, विभागस्तरीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम), आदी महत्‍त्‍वाचे संपर्क क्रमांक इत्यादी ठळकपणे दिसतील अशारितीने सोसायटी परिसरात प्रदर्शित करावे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)