मुंबई कोरोना: हे नियम मोडल्यास दाखल होऊ शकतो गुन्हा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. कोरोना रुग्णवाढ बघता मुंबई महापालिकेने नवीन नियमावली जारी केली आहे. यानुसार होम क्वारंटाईनसह लग्न समारंभ आणि सार्वजनिक आयोजनांचे नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी हे नवे आदेश काढले आहेत.

काय आहेत नवीन नियम?

कोव्हिड-19 चा धोका अजून टळलेला नाही. कोरोनाच्या नव्या स्वरुपातल्या विषाणूने जगातल्या काही देशांमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपायांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने नवीन नियम जारी केले आहेत.

त्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज महापालिकेचे इतर आयुक्त आणि अधिकाऱ्यांची व्हिडियो कॉन्फरंसिंगद्वारे बैठक घेतली.

"जून-जुलै 2020च्या तुलनेत आजही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. असं असलं तरी रुग्ण वाढत असल्याने यंत्रणेने दक्ष राहणे गरजेचं आहे. कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. नियमांचं पालन होत नसल्यास अधिक कठोरपणे कारवाई करून संसर्गाला वेळीच अटकाव करणं गरजेच आहे", असं आयुक्त चहल यांनी या बैठकीत सांगितलं.

होम क्वारंटाईन

होम क्वारंटाईनचे नियम यापुढे काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. होम क्वारंटाईन असणाऱ्या लक्षणं नसणाऱ्या रुग्णांना पूर्वीप्रमाणे हातावर शिक्के मारले जातील. वॉर्ड वॉर रुम त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून असेल. अशा व्यक्तींना दिवसातून 4 ते 5 वेळा कॉल करून ते घरीच आहे की नाही, याची खातरजमा केली जाईल.

लक्षणं नसणारी कोरोनाबाधित व्यक्ती होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण होण्याआधीच घराबाहेर पडल्यास सोसायटीने वॉर्ड वॉर रुमला कळवावे, असे आदेश देण्यात आले आहेत. वॉर्ड रुम अशा कोरोनाबाधितांवर गुन्हे दाखल करेल.

सार्वजनिक ठिकाणं

लग्न कार्यालयं, जिमखाना/क्लब्ज, नाईट क्लब्ज, हॉटेल, रेस्टॉरंट्स, थिएटर, धार्मिक स्थळं, खेळाची मैदानं, शॉपिंग मॉल, खाजगी ऑफिसेस अशा सर्वच ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे. अशा ठिकाणी मास्कचा वापर होत नाहीय किंवा 50 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्या, असं दिसल्यास संबंधितांवर गुन्हे तर दाखल होतीलच. शिवाय, संबंधित आस्थापनं आणि व्यवस्थापनावरही गुन्हे दाखल होतील.

लग्न समारंभ

दररोज किमान 5 लग्नाची सभागृह किंवा कार्यालयांवर धाडी टाकण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तिथे नियमांचं पालन होत नसल्यास आयोजकांसह कार्यालय व्यवस्थापनावरही गुन्हे दाखल होतील. सध्या लग्नकार्यासाठी जास्तीत जास्त — जणं एकत्र येण्यास परवानगी आहे.

मुंबई लोकल

मुंबई लोकलमध्ये प्रवासी मास्क घालूनच प्रवास करत आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर लाईनवर प्रत्येकी 100 अशाप्रकारे एकूण 300 मार्शल्स तैनात करण्यात येणार आहेत.

प्रार्थना स्थळं

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांमध्येही नियमांचं काटेकोर पालन आवश्यक असणार आहे. या ठिकाणी पुरुषांसोबतच महिला मार्शल्स नेमून देखरेख ठेवण्यात येईल. विना मास्क फिरणे, 50 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येणे असे प्रकार आढळल्यास धार्मिक स्थळांमध्येही गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल.

मार्शल्सची संख्या वाढवणार

सध्या मुंबई रस्त्यावर थुंकणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी 2400 मार्शल्स तैनात आहेत. मात्र, ही संख्या आता दुप्पट म्हणजेच 4800 करण्यात येणार आहे. विना मास्क दिसणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर हे मार्शल्स दंडात्मक कारवाई करतील. हेच अधिकार पोलिसांनाही देण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे विनामास्क दिसणाऱ्या व्यक्तींकडून पोलीसही दंड आकारू शकतात.

महापालिकेच्या इमारती, हॉस्पिटल्स अशा ठिकाणी महानगरपालिकेच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. हे शिक्षकही नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठावू शकतील.

चाचण्या वाढवणार

ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होत असेल तिथे मिशन झिरोच्या धर्तीवर कार्यवाही होणार आहे. म्हणजेच अशा ठिकाणी एरिया मॅपिंग करून चाचण्यांची संख्या वाढवली जाईल. तसंच अशा भागांमध्ये कोरोनाबाधित व्यक्तीच्या नजिकच्या संपर्कात आलेल्या 15 व्यक्तींना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल.

झोपडपट्ट्या, अरुंद किंवा दाट वस्त्यांमध्ये एनजीओंच्या मदतीने आरोग्य शिबीरं आयोजित करून संशयितांच्या तपासणी करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत. फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातूनही संशयितांची तपासणी केली जाईल.

ब्राझिलमधून आलेले प्रवासी

केंद्र सरकारच्या नियमानुसार ब्राझिलमधून आलेल्या प्रवाशांना 7 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन रहाणं, बंधनकारक असणार आहे. या नियमाची अंमलबजावणीही सुरू झालेली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)