कोरोना: 'मास्कची आवश्यकता नाही,' भाजप नेते हेमंत बिस्वा सरमा यांचं विधान #5मोठ्या बातम्या

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. 'मास्कची आवश्यकता नाही', भाजप नेते हेमंत बिस्वा सरमा यांचं विधान

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मास्क घालण्याची आवश्यकता नाही असं धक्कादायक विधान आसामचे आरोग्य मंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी केलं आहे.

"केंद्र सरकारने कोरोना नियमावली जाहीर केली आहे. परंतु आसामचा विचार करता, इथे कोरोनाचा धोका नाही. त्यामुळे इथे भीती पसरवण्याचं कारण नाही असं सरमा म्हणाले," 'हिंदुस्तान टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

"मास्क घालण्याची वेळ येईल तेव्हा मी लोकांना सांगेन. सध्या अर्थव्यवस्था बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मास्क घातले तर ब्युटी पार्लर कसे चालतील. त्यांचंही काम सुरू राहायला हवं," असं सरमा म्हणाले.

देशातल्या अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. आसाममध्ये तशी परिस्थिती नाही. मात्र तिथेही कोरोनाचे रुग्ण काही प्रमाणात वाढू लागले आहेत.

2. 'नंदीग्राममधून निवडणूक लढवणं ही ममतांची मोठी चूक'-मोदी

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्याविरोधात निवडणूक लढवली. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधला आहे.

"ममता बॅनर्जींना नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा पश्चात्ताप होतो आहे. तृणमूल काँग्रेसमधले लोकं सांगतात की ममता बॅनर्जींनी रागात नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी ही सर्वांत मोठी चूक केली आहे," असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

ममता बॅनर्जी या दरवेळी कोलकातामधील भोवानीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवतात. यंदा मात्र त्यांनी हट्टाने नंदीग्राम मतदारसंघाची निवड केली. तृणमूलमधील त्यांचेच एकेकाळचे सहकारी शुभेंदू अधिकारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांनाच भाजपाने ममता बॅनर्जी यांच्याविरोधात नंदीग्राममधून उमेदवारी दिली आहे.

"ममता दीदी तुम्ही बंगालच्या नागरिकांवर विश्वास ठेवायला हवा. बंगालच्या लोकांनी त्यांचा कौल दिला आहे. त्यांचा निर्णय झालाय की तुम्हाला तुमची टाका मार कंपनी (टीएमसी) घेऊन इथून निघून जावं लागेल," असं मोदी म्हणाले.

3. 'मोदी-शहा फडणवीसांना गांभीर्याने घेत नाहीत'- नाना पटोले

केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला किती पॅकेज दिले यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

"सरकारला लक्ष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी पाश्चिमात्य देशातील आकडेवारी दिली. परंतु केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला या कठीण काळात किती मदत केली हे फडणवीस यांनी सांगायला हवं. 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी महाराष्ट्राला किती मिळाले? दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा फडणवीसांना गांभीर्याने घेत नाहीत. म्हणून ते राज्य सरकारच्या नावावर मोदींना सुचवत आहेत," अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

"महाराष्ट्र संकटात असताना भाजप नेते कटकास्थानं करत राहिले. केंद्रीत तपास यंत्रणांच्या आडून भाजप नेत्यांनी राज्यातील वातावरण गढूळ केलं. राज्याला आर्थिक मदतीची गरज असताना मुख्यमंत्री मदत निधीसाठी पैसे न देता भाजप नेत्यांनी पीएम केअर फंडात पैसे जमा केले," असंही पटोले म्हणाले.

4. 'कोव्हिडचा कहर आहे आणि महाराष्ट्र त्यात एक पाऊल पुढे आहे हे दुर्देव'- संजय राऊत

संपूर्ण देशात कोरोनाविषयक आणीबाणी आहे. भीती कोरोना विषाणूची नसून लॉकडाऊन नावाच्या सैतानाची आहे. संपूर्ण देशात कोव्हिडचा कहर आहे आणि महाराष्ट्र त्यात पुढे आहे हे दुर्देव असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरात म्हटलं आहे.

"लॉकडाऊन लागला तर उद्योग व्यापार कोसळून पडण्याची भीती आहे. कोरोना कुणालाच सोडत नाही. लोकांना टाळेबंदी हे नको हे मान्य पण कोरोनाला कसं थोपवायचं? स्वत:वर निर्बंध घालून शिस्त पाळायला कोणीच तयार नाही.

"मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा विरोधी पक्ष आता काय करणार आहे? असा सवाल राऊत यांनी केला. विरोधासाठी विरोध करत असताना आपण जनतेच्या जीवाशी व राज्याच्या प्रतिष्ठेशी खेळत आहोत याचे भान विरोधी पक्षाने ठेवले नाही. राज्याच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्री सांगतात ते योग्य आहे असं विरोधी पक्षाने सांगायला हवं होतं. त्यात सगळ्याचं हित होतं," असं राऊत म्हणाले.

5. दिपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी श्रीनिवास रेड्डी यांच्या अटकेचे आदेश

दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांचा अटकपूर्व जामीनअर्ज आज कोर्टाने फेटाळून लावला. तसेच रेड्डी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने रेड्डी यांच्या वकिलाने अचलपूर येथील तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक एक मध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज शनिवारी दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतली. मात्र न्यायमूर्ती एस. ए. मुंगीलवार यांनी श्रीनिवास रेड्डी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. रेड्डी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास रेड्डी फरार होण्याची शक्यता दर्शवण्यात आली. या युक्तिवादानंतर रेड्डी यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्राच्या अधिकारी आरएफओ दीपाली चव्हाण यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी दीपाली चव्हाण यांनी सुसाई़ड नोट लिहिली होती. ती नोट त्यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक रेड्डी यांना उद्देशून लिहिली होती. त्यातून उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)