कोरोना महाराष्ट्र : लॉकडाऊनची अनिश्चितता कायम, मुख्यमंत्र्यांनी घेतल्या विविध बैठका

महाराष्ट्रावरची लॉकडाऊनची टांगती तलवार अजूनही कायम आहे. आजच्या दिवसभरात मुख्यमंत्र्यांनी विविध बैठका घेतल्या.

महाराष्ट्रात सरसकट लॉकडाऊन लावण्याला अनेक व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे. कठोर निर्बंध लावा, पण लॉकडाऊन नको, असा सूर आज दिवसभर ऐकायला मिळाला.

महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजना, राज्यातील राजकीय परिस्थिती व किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी संदर्भात चर्चा केली. या शिष्टमंडळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण सहभागी होते.

याशिवाय मुख्यमंत्र्यांनी आज विविध माध्यम समूहाचे प्रतिनिधी, संपादक आणि मालकांसोबत बैठक घेतली. विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, राज्यातल्या व्यायामशाळांचे मालक - संचालक, नाट्य निर्माता संघाचे प्रतिनिधी, थिएटर मालक यांचीही आज मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन भेट घेतली.

संसर्ग रोखण्यासाठी इतर काही पर्याय आहेत का याविषयीची चर्चा या बैठकांमध्ये करण्यात आली.

मुंबईमध्ये लावण्यात येणारे हे निर्बंध शेवटचे असतील आणि त्यांचं पालन झालं नाही, तर मुंबईत लॉकडाऊन लावावा लागेल असा इशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी TV9 या वृत्तवाहिनीशी बोलताना दिला.

तर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. त्यांनी येवला - लासलगावमधल्या कोव्हिड सेंटरला अचानक भेट देत तिथली पाहणी केली.

8 - 15 दिवसांचा लॉकडाऊन करून काहीही फरक पडणार नसल्याचं मत व्यक्त करत यापेक्षा मोठ्या कालावधीच्या लॉकडाऊनचे संकेत छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट आणि फडणवीसांची टीका

उद्धव ठाकरेंवर टीका करणं सोपं, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे, असं मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे.

त्यांनी ट्वीट करत म्हटलं, "पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत. त्यास सलाम!"

दरम्यान, विरोधक किंवा तज्ज्ञांचा दु:स्वास करून नव्हे, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबवण्यात अधित मदत करेल, असं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 मार्च रोजी सोशल मीडियाद्वारे कोरोनाच्या मुद्द्यावर जनतेशी संवाद साधल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे ही प्रतिक्रिया दिली. फडणवीसांनी पाच ते सहा ट्वीट्सद्वारे सरकारवर टीका केली आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाबत स्थिती सांगताना भारताव्यतिरिक्त इतर देशांची उदाहरणं दिली.

त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला. पण 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले. हंगेरीत 'वर्क फ्रॉम होम' आहे. पण युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला."

"डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती. पण एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज दिलं. ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत झाली. पण पण 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्‍यांना मदत करण्यात आली. एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना 800 युरोंपर्यंत मदत देण्यात आली," असं फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, "युके, जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच काही ना काही दिलंय. तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा."

काल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उद्देशून टीका केली. त्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत. आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची."

मुख्यमंत्र्यांच्या शुक्रवारच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला संबोधित करून सांगितलं की येत्या 2 दिवसांत कडक निर्बंधांची घोषणा होईल. परिस्थिती गंभीर आहे आणि 15-20 दिवसांत आरोग्य सुविधा अपुऱ्या पडतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

1. दोन दिवसांत निर्णय

कोरोनाचा राक्षस दुप्पट-तिपटीने अक्राळविक्राळ रूप धारण करून आलाय. येत्या 2 दिवसांत मी तज्ज्ञांशी बोलणार आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही तर काय पर्याय आहेत, यावर चर्चा करेन. मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय.

2. जीव वाचवणं महत्त्वाचं

लॉकडाऊन हवं की नको, या कात्रीत आपण अडकलो आहोत. एकीकडे जीव वाचवायचा आहे, दुसरीकडे अर्थचक्रही सुरू राहावं, याची काळजी घ्यावी लागणार आहे. रोजगारही गेला आणि जीवही गेला असं व्हायला नको. रोजगारापेक्षाही आपल्याला जीव महत्त्वाचा आहे. रोजगार आपण नंतर आणू शकतो, पण जीव आपण आणू शकत नाही.

3. बेड्स भरत आले

परिस्थिती अशीच राहिली तर आणखी 15-20 दिवसांमध्ये सुविधा अपु्ऱ्या पडतील. आज कदाचित 45 हजार रुग्णांचा आकडा आपण गाठू किंवा पार करू. राज्यातले 62 टक्के बेड्स भरले आहेत. 48 टक्के ICU बेड्स भरले आहेत. ऑक्सिजन बेड्स 25 टक्के भरले आहेत.

4. इतर देशांत लॉकडाऊन

इतर देशांमध्ये लाटा आल्यावर लॉकडाऊन लावावा लागला. फ्रान्समध्ये परिस्थिती नाजूक आहे. तिथं तिसऱ्यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांनी घरातूनच काम करावं, असं फ्रान्समध्ये सांगितलेलं आहे. हंगेरी, डेन्मार्कमध्ये वर्क फ्रॉम होम आहे.ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध हटवण्यात येत आहे. फिलिपिन्समध्ये मनिला आणि परिसरात लॉकडाऊन आहे. इटली, जर्मनी, पोलंडमध्येही तीच परिस्थिती आहे. युकेमध्ये तीन महिन्यांनंतर निर्बंध हळूहळू हटवण्यात येत आहे.

5. लॉकडाऊनचं राजकारण नको

राजकीय पक्षांनी जनतेच्या जिवाचं राजकारण करू नये. आपल्याला सर्वप्रथम जनतेचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. लॉकडाऊन केल्यानंतर रस्त्यावर उतरण्याची धमकी मला दिली जाते. पण कोरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरा, असं मी तुम्हाला सांगतो.

6. लशीने घातकता कमी

लस घेतल्यानंतरही मास्क घालणं अनिवार्य आहे. लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरसुद्धा काही जणांना संसर्ग झाला आहे. लस घेतली म्हणजे संसर्ग होणार नाही, असं नाही. पण त्याची घातकता कमी होईल. लस ही छत्री आहे, पण आता पाऊच नाही, तर वादळ आलंय. संपूर्ण देशात महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झालं आहे. राज्यात दररोज तीन लाख इतकं लसीकरण होत आहे.

7. लोकांना आवाहन

मी आरोग्य सुविधा वाढवीन. पण एका हाताने टाळी वाजत नाही. त्यामुळे तुमचंही सहकार्य मला हवं आहे. गेल्या वर्षभरात आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवली. पण आता आपण गाफील झालो आहोत. त्यामुळे कोरोनाने आपल्याला गाठलं. कोरोनाला आपण रोखू शकतो, पण त्याला रोखण्याची जिद्द तुमच्यात आहे की नाही, हे महत्त्वाचं आहे. अनावश्यक गर्दी टाळलीच पाहिजे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )