You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पश्चिम बंगाल निवडणूक: नंदीग्रामच्या निवडणुकीत मुख्तार उद्धव ठाकरेंचं नाव का घेतोय?
- Author, आशिष दीक्षित
- Role, संपादक, बीबीसी मराठी, नंदीग्रामहून
"उद्धव ठाकरेंच्या घरामागेच मी राहायचो," नंदीग्रामशेजारच्या गावातले मुख्तार खान म्हणाले. "आज माझं इथे छोटं फर्निचरचं दुकान आहे. मी हे घर बांधू शकलोय, त्याचं श्रेय मी महाराष्ट्राला देतो. 23 वर्षं तिथे राहिलोय मी."
मुख्तार हे बंगाल सोडून कामानिमित्त बाहेर पडणारे एकटे नाहीत. नंदीग्रामच्या प्रत्येक गावातले हजारो तरुण मुंबई, पुणे, दिल्ली, बंगलोर, चेन्नईला नोकरी करतात. कारण इथे नोकऱ्याच नाहीत, असं ते म्हणतात. आणि तो या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा जाणवतो.
तसं पाहायला गेलं तर नंदीग्राम हे बंगालच्या उपसागराशेजारी वसलेलं साधं, छोटं गाव. पण इथे सध्या कमालीची लगबग सुरू आहे. भातशेतांतून जाणाऱ्या अरुंद, नागमोडी रस्त्यांवर ट्रॅफिक जाम होताहेत. दुतर्फा लावलेल्या नारळ आणि केळीवर गाड्यांनी लोटलेले धुळीचे थर जमलेत.
पोलिसांच्या गाड्या, निमलष्करी दलांच्या गाड्या, निवडणूक आयोगाच्या गाड्या, नेत्यांच्या गाड्या, पत्रकारांच्या गाड्या. नुसत्या गाड्याच गाड्या! इथल्या तापलेल्या रस्त्यांवरून या एअर कंडिशनर गाड्या हॉर्न वाजवत जातात, तेव्हा गावातली म्हातारी माणसं उपरण्याने वारा घेत हा पंचवार्षिक सोहळा शांतपणे पाहतात. त्यांच्या चेहऱ्यावर ना आनंद, ना दुःख.
इथून विधानसभेच्या रिंगणात यावेळी उतरल्या आहेत खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. त्यांना आव्हान देताहेत त्यांचे आधीचे पट्टशिष्य शुभेंदू अधिकारी. आता ते भाजपच्या तिकिटावर उभे आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलंय. कारण इथे ममता पडल्या तर त्याचे पडसाद देशाच्या राजकारणावर उमटतील.
त्यामुळेच मुख्यमंत्री नंदीग्राममध्ये ठाण मांडून बसल्या आहेत. दूर दूर वसलेल्या वाड्या-वस्त्या त्यांनी व्हीलचेअरवरून फिरून पिंजून काढल्या आहेत. दुसरीकडे देशाचे गृहमंत्री अमित शहांनीही मोठाले रोड शो केले.
दुर्गा पूजेच्या विसर्जनाची मिरवणूक निघते, तसे अमित शहांचे रोड शो होते. ढोल-ताशे, तालावर नाचणारे तरुण. नजर फिरवावी तिकडे भगवा रंग. भगवे झेंडे, भगवे ट्रक, भगव्या टोप्या, भगव्या साड्या. सगळं सिंक्रोनाइज्ड आणि काळजीपूर्वक प्लॅन केलेलं.
दुसरीकडे ममतांचे व्हीलचेअरवचे रोडशो तुलनेने साधे. त्यांची व्हीलचेअर अतिशय वेगाने धावते. त्या ज्या स्पीडने चालतात, त्याच स्पीडने व्हीलचेअर धावते. जायबंदी झाल्या तरी त्यांचा स्थायीभाव बदलेला दिसत नाही.
'आमच्याकडून चूक झाली'
नंदीग्राम हा पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यालता मतदारसंघ. इथल्या सुपीक जमिनीवर 2007 साली तेव्हाच्या डाव्या सरकारने उद्योग-धंदे आणण्याचा घाट घातला. इथून हाल्दिया आणि इतर बंदरं जवळ आहेत. त्यामुळे ते व्यापाऱ्याच्या दृष्टीने सोयीचं झालं असतं.
जसा महाराष्ट्रात आधी जैतापूरला किंवा आता नाणारला विरोध झाला, तसाच इथल्या शेतकऱ्यांनी जमिनी द्यायला विरोध केला. त्या विरोधाला पाठिंबा दिला ममता बॅनर्जींनी. त्या तेव्हा विरोधी पक्षात होत्या.
विरोध इतका तीव्र झाला की कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ओढावली. गोळीबार झाला. त्यात अनेकांचे जीव गेले. या आंदोलनामुळे ममता बॅनर्जी केंद्रस्थानी आल्या आणि त्यांनी डाव्यांची तीन दशकांची सत्ता उलथवून लावली.
उद्योगांविरोधात आंदोलन करून ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या. नंदीग्रामची रासायनिक औद्योगिक वसाहत रद्द झाली आणि सिंगूरचा टाटा नॅनोचा कारखाना गुजरातला गेला. मुख्यमंत्री झाल्यावर उद्योगांना बंगालमध्ये आणणं ममतांना जड गेलं.आधीच गरीब आणि मागास असलेल्या या राज्यात उद्योगधंदे आल्याशिवाय रोजगार निर्मिती होणं कठीण. आम्ही ज्यावेळी इथल्या गावांमध्ये फिरलो तेव्हा नोकरी आणि धर्म हेच दोन मुद्दे जाणवले. आधी नोकरीविषयी बोलूया.
रेयापाडा नावाच्या गावातला चंदन भुनिया नावाचा तरुण म्हणाला, "आलेल्या उद्योगांविरुद्ध आंदोलन करणं ही आमची चूक होती. आता आमच्याकडे नोकऱ्याच नाहीत," इतर गावकऱ्यांनी होकारार्थी मान डोलावली. चंदन आता जेमतेम तिशीत आहे. तो, त्याची बायको सुदेष्णा आणि दोन मुलं एका अर्ध्या पक्क्या घरात राहतात.
"प्रधानमंत्री योजनेतून घराचे अर्धेच पैसे आले. अर्धे पैसे तृणमूलच्या लोकांनी मध्येच खाल्ले असावेत," चंदन हताशपणे सांगतो. तो या छोट्याशा गावात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईत घर चालवतो.
इथे जवळपास प्रत्येक घराला लागून 'पुकुर' म्हणजे छोटं तळं असतं. त्यातले मासे पोटाची भूक भागवतात. पुकुरमधलं पाणी अंघोळीसाठी आणि कपडे-भांडी धुण्यासाठीही वापरतात. पुकुर हा यांच्या घराचा आणि जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. आजूबाजूला नद्यांची मोठी पात्रं आणि शेजारीच समुद्र असल्यामुळे सगळे पुकुर पाण्याने भरलेले असतात.
चंदनची पत्नी सुदेष्णा पुकुरमध्ये कपडे धुवून हात पुसत येते आणि आमच्याशी बोलू लागते. "मी बारावीपर्यंत शिकले, पण नोकरीच नाही. आता आम्हाला परिवर्तन हवं. ममता वाईट नाहीत, पण त्यांनी 10 वर्षांत नोकऱ्या दिल्या नाहीत. भाजप देईल अशी आशा आहे. त्यांनी नाही दिल्या तर त्यांनाही बदलू," ती हसत सांगते.
इथल्या अनेक गावांमध्ये फिरल्यावर जाणवलं की गावकरी डाव्या पक्षांचा उल्लेखही करत नाहीत. ज्या डाव्यांनी बंगालवर तीन दशकं एकहाती राज्य केलं, त्यांचं या निवडणुकीतल स्थान नगण्य जाणवतं. ही निवडणूक ममता विरुद्ध भाजप अशीच थेट दिसते.
आता विशीत असलेल्या तरुणांना तर डावं सरकार आठवतही नाही. काहींना तर ठाऊकही नव्हतं. त्यांच्या दृष्टीने ममता याच सदैव मुख्यमंत्री होत्या. आणि आता भाजप त्यातल्या काहींना नवा पर्याय वाटतोय.
ममतांनी रस्ते बांधले आणि कल्याणकारी योजना आणल्या, हे लोक मान्य करतात. पण बेरोजगारीचा मुद्दा ममतांना जड जाऊ शकतो. "मोफत सायकल, मोफत मेडिकल कार्ड आणि स्वस्त तांदूळ हे सगळं दीदींनी दिलं खरं. पण त्या जोरावर मी घर कसं चालवू? मुलांना कसं वाढवू? आम्हाला नोकरी पाहिजे," सुदेष्णा स्पष्टपणे सांगते. बंगालच्या खेडोपाड्यातही स्त्रिया धीटपणे बोलताना दिसतात.
हिंदू आणि मुस्लीम गावांतला फरक
नंदीग्राममध्ये सुमारे 30 टक्के मतदार मुस्लीम आहेत. त्यांची गावं वेगळी आहेत. तिथे फक्त तृणमूलचे झेंडे दिसतात. भाजपही तिथली मतं मिळवण्यासाठी फारसा प्रयत्न करताना दिसलं नाही. त्यामुळे तिथे ममतांना तुलनेने कमी संघर्ष करावा लागेल.
मुंबईत राहून आलेल्या मुख्तारची बायको सांगते की तिला ममता बॅनर्जींमुळे हेल्थ कार्ड मिळालं. त्यामुळे मोफत इलाज होतो. तिच्या लेकीला सायकल मिळाल्याचंही ती आनंदाने सांगते. ममतांनी रस्ते बांधले, पक्की घरं बांधली, असं मुख्तार सांगतो.
"भाजपने हिंदू विरुद्ध मुस्लीम वातावरण तयार केलंय. असं इथे आधी नव्हतं. मला आशा आहे की इथले हिंदू त्याला बळी पडणार नाहीत," मुख्तार म्हणतो. आम्ही बोलत असताना त्याच्या घरासमोर अमित शहांचा भगव्या रंगाने न्हालेला रोडशो सुरू होता. "भाजप निवडून आलं तर आमचं थोडं स्वातंत्र्य कमी होईल," - तो भीती व्यक्त करतो.
भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी आदल्याच दिवशी म्हणाले होते की "बेगम निवडून आली तर नंदीग्रामचा मिनी-पाकिस्तान होईल," हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्याचे उघड आणि छुपे दोन्ही प्रयत्न भाजप इथे करत आहे.
त्याला काही प्रमाणात यशही मिळतंय. इथल्या छोट्या गावांतही काही लोक पत्रकारांना पाहून मोठ्या आवाजात 'जय श्री राम' अशा घोषणा देतात. 'जय श्री राम' ही अयोध्या मंदिर आंदोलनात वापरलेली राजकीय घोषणा आधी बंगालमध्ये लोकप्रिय नव्हती, असं इथले पत्रकार सांगतात.
फेक न्यूजचा प्रभावही इथे जाणवतो. शंकर साहू नावाचा शेतकरी आम्हाला म्हणाला की ममता बॅनर्जी मुस्लीम आहेत. हे कुणी सांगितलं, असं विचारल्यावर तो म्हणाला, "मी फेसबुकवर वाचलं होतं. त्या गुपचूप कलमा वाचतात. म्हणूनच त्या जाहीरपणे मंत्रोच्चार करत नाहीत. केला तर चुकतात."
70 टक्के असलेल्या हिंदू मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न ममता आणि शुभेंदू करत आहेत. प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीवर, प्रत्येक रस्त्यावर दोन झेंडे दिसतात. एक तृणमूलचा आणि एक भाजपचा. दोन पक्षांमध्ये निकराची लढाई सुरू असली तरी हे दोन झेंडे नारळाच्या झाडांवर खुशाल एकत्र बसलेले सर्वत्र दिसतात.
भेटुरिया नावाच्या गावात दलित वस्तीत तृणमूलचा बोलबाला होता. पण काही अंतरावरच असलेल्या 'जनरल कॅटेगिरी'च्या लोकांची पसंती मात्र कमळाला होती.
महाराष्ट्र किंवा उत्तरप्रदेशप्रमाणे इथे जातींच्या समीकरणाबद्दल उघडपणे कुणी फारसं बोलत नाही. नंदीग्रामच्या या निवडणुकीत तिन्ही उमेदवार एकाच जातीचे आहेत. ममता बॅनर्जी, शुभेंदू अधिकारी आणि माकपच्या मीनाक्षी मुखर्जी हे तिघं ब्राम्हण आहेत, पण तो इथला राजकीय मुद्दा नाही.
अर्थात, जातीय समीकरणं हा ठळक मुद्दा जरी नसला तरी तो पूर्णपणे नाकारताही येत नाही. नंदीग्राम मतदारसंघातल्या हिंदूबहुल गावांमध्ये भाजपचं नाव घेणारे अनेक लोक भेटले. या गावांमध्ये ममतांना खरं आव्हान आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)