You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पृथ्वीराज चव्हाण: लॉकडाऊन करण्याआधी सरकारने रोख रक्कम खात्यात जमा करावी #5मोठ्या बातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. लॉकडाऊन करण्याआधी सरकारने रोख रक्कम खात्यात जमा करावी- पृथ्वीराज चव्हाण
राज्य सरकार लॉकाऊनची तयारी करत असताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काही मुद्दे मांडले आहेत.
लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना देणं गरजेचं असून, लॉकडाऊनचा कालावधी कमीत-कमी ठेवण्यात यावा हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
यादरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने पाश्चिमात्य देशांप्रमाणे रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी यासाठी प्रसंगी आमदार व खासदार स्थानिक विकास निधीचा वापरात आणावा, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्रात उद्योजक असो किंवा वैद्यकीय तज्ज्ञ प्रत्येकजण निडरपणे आपले मत मांडू शकतो ही आश्वासक बाब असली तरीदेखील शासनासमोर मात्र गंभीर पेचप्रसंग आहे. परिणामी लॉकडाऊन लागू करण्याची वेळ आल्यास काही गोष्टी या लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे."
"लॉकडाऊन लागू केल्यास वाहतूक नियमांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे, पण यादरम्यान खाजगी वाहनातून प्रवासास मुभा देण्यात यावी असा पर्याय त्यांनी मांडत शेतमाल आणि इतर औद्योगिक मालाची वाहतूक चालू ठेवून पुरवठा साखळीवर परिणाम होऊ न देण्यावर भर द्यावा," असं चव्हाण यांनी म्हटलं. यामध्येच त्यांनी लसीकरणाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढवण्याची बाबही लक्षात घेतली गेल्याचं स्पष्ट केलं.
2. शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर एंडोस्कोपी केली गेली. मिळालेल्या माहितीनुसार पवार यांच्यावरील ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
संध्याकाळी शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. तत्पूर्वी 30 मार्च रोजी दुपारी पवारांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी घरी येऊन त्यांची तपासणी केली होती. त्यानंतर पवारांच्या पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.
सध्या शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
3. इंदुरीकर महाराजांना दिलासा
पीसीबीएनडीटी कायद्यानुसार इंदुरीकर महाराजांवर संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. परंतु न्यायालयाने हा खटला रद्द केला आहे. निकाल देताना डॉ. बालाजी तांबे खटला आणि धार्मिक ग्रंथांचा आधार घेण्यात आला. खटला रद्द झाल्याने इंदुरीकर महाराजांच्या समर्थकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते असं विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. त्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. या कीर्तनाचे व्हीडिओ युट्यूबवर प्रसिद्ध झाले होते. तेच पुरावे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सादर केले. अंनिसने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अपप्रवृत्तींच्या विरोधातील ही लढाई आहे. पीसीबीएनडीटी कायद्याचं हे उल्लंघन आहे असं अंनिसने म्हटलं आहे.
4. एजाज खानला अटक
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मंगळवारी अभिनेता एजाज खानला ताब्यात घेतले आहे. एजाज काही दिवसांपासून राजस्थानमध्ये चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता, आज मुंबईत दाखल झाल्यावर NCB च्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. एजाज कानची एनसीबीकडून चौकशी होणार आहे. एजाज बिग बॉस-7 मध्ये कन्टेस्टेंटसोबत झालेल्या मारहाणीमुळे प्रकाश झोतात आला होता. 'दिव्य मराठी'ने ही बातमी दिली आहे.
NCB सूत्रांनी सांगितले की, एजाज खान आणि ड्रग्सचे मुंबईतील सर्वांत मोठे सिंडीकेट म्हणजेच बटाटा गँगशी संबंध आहेत. एजाजला पकडल्यानंतर एनसीबीने मुंबईतील अंधेरी आणि लोखंडवाला परिसरात छापेमारीदेखील केली. एजाजला पकडल्यापूर्वी एनसीबीने मुंबईतील सर्वात मोठा ड्रग सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटाला शनिवारी अटक केले आहे.
एजाज खानला यापूर्वी 2018 मध्ये बंदी घातलेली औषधे बाळगल्याप्रकरणी अटक झाली आहे. त्यावेळेस त्याच्याकडून 8 एक्सटेसी टेबलेट मिळाल्या होत्या. याची बाजारातील किंमत 2.2 लाख रुपये होती.
5. शरणकुमार लिंबाळे यांना सरस्वती सन्मान
मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना 2020 या वर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या 'सनातन' या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 15 लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
दिल्लीच्या के. के. बिर्ला फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. देशातल्या 22 भाषांमधील पुस्तकांचे अवलोकन करून दरवर्षी एका लेखकाला हा पुरस्कार दिला जातो. याआधी 1993 मध्ये विजय तेंडुलकर व 2002 मध्ये महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार मिळाला होता.
1991 मध्ये केके बिर्ला फाउंडेशनच्यावतीने सुरू केलेला सरस्वती सन्मान पुरस्कार देशातील प्रतिष्ठित व सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
शरणकुमार लिंबाळे यांची 40 पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तसेच, अक्करमाशी हे आत्मचरित्र देखील प्रसिद्ध आहे. 1986 ते 1992 या कालावधीत ते सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)