शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार सध्या ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली.

शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शरद पवार यांची तब्येत उत्तम आहे. काही तपासण्या करून त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. आपण सदिच्छा देण्यासाठीच आलो होतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

शरद पवार यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात थांबावं लागलं आहे.

राष्ट्रवादीच्या शिबिरालाही ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपली उपस्थिती दर्शवली होती. एकनाथ शिंदे यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा शरद पवार यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी झाली होती लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये लॅप्रोस्कोपीची यशस्वी शस्त्रक्रिया गेल्या वर्षी मार्च महिन्यात झाली होती. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली.

शरद पवार यांना 30 मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर 7 दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

त्यानंतर 15 दिवसानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यामुळे शरद पवार यांना रविवारी (11 एप्रिल) ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

आज (12 एप्रिल) त्यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची तब्येत स्थिर असल्याचंही नवाब मलिक यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

तत्पूर्वी,शरद पवारांना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यामुळे रविवारी, 28 मार्च 2021 रोजी संध्याकाळी मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होतं. मात्र, तपासणीनंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं.

त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी 29 मार्चला ट्वीट करून माहिती दिली होती की, "कृपया लक्ष द्या. आमचे नेते शरद पवार साहेब यांना पोटात दुखत असल्यामुळे काल रात्री ब्रीच कँडीमध्ये तपासणीसाठी दाखल केलं. तपासणीनंतर लक्षात आलं की त्यांना पित्ताशयासंबंधी त्रास होतो आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)