बलात्कार पीडितेची केली जाणारी '2 फिंगर टेस्ट' काय असते? सुप्रीम कोर्टाने यावर बंदी का आणली?

बलात्कार पीडितेवर करण्यात येणाऱ्या '2 फिंगर टेस्ट'वर सुप्रीम कोर्टाने बंदी आणली आहे. महिलेवर बलात्कार झालाय का नाही? हे तपासण्यासाठी ही चाचणी करण्यात येते.

ही चाचणी 'पितृसत्ताक आणि अवैज्ञानिक' आहे असं म्हणत सुप्रीम कोर्टाने ही टेस्ट वैद्यकीय अभ्यासक्रमातून वगळण्याचा आदेश दिलाय.

2013 मध्ये दिल्ली निर्भया बलात्कार प्रकरणानंतर यावर बंदी घालण्यात आली होती. तरीदेखील देशातील काही भागात ही टेस्ट केली जात होती. कोर्टाने यापुढे ही चाचणी करणाऱ्याला दोषी धरलं जाईल, असे निर्देश दिले आहेत.

बलात्कारासंबंधी खटल्यांमध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. '2 फिंगर टेस्ट' काय आहे? यावर वाद का झाला? वैद्यकीय तज्ज्ञांकडून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

'2 फिंगर टेस्ट' काय आहे?

भारतात '2 फिंगर टेस्ट'चा वापर अनेक वर्षांपासून बलात्कार प्रकरणी चौकशीसाठी करण्यात येतो. या टेस्टला 'व्हर्जिनिटी टेस्ट' असंही म्हटलं जातं.

ही टेस्ट करताना डॉक्टर बलात्कार पीडितेच्या गुप्तांगात म्हणजेच योनीत दोन बोटं घालून तपासणी करतात. महिला शारीरिक संबंधात सक्रिय आहे का? हे ओळखण्यासाठी ही टेस्ट केली जाते.

मुंबईतील व्हॉकार्ट रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गंधाली देवरूखकर सांगतात, "पीडितेने अलीकडील काळात लैंगिक संबंध प्रस्थापित केले आहेत का? याची तपासणी करण्यासाठी ही चाचणी केली जाते."

बलात्काराच्या प्रकरणात 'पेनिट्रेशन' झालं आहे का? हे सिद्ध करणं हा यामागचा प्रमुख हेतू आहे. यात महिलेच्या गुप्तांगातील स्नायूंची लवचिकता आणि 'हायमन'ची चाचणी होते. 'हायमन' सुस्थितीत असेल तर महिला शारीरिक संबंधात सक्रिय नाही किंवा वर्जिन आहे आणि 'हायमन'ला इजा झाली असेल तर महिला शारीरिक संबंधात सक्रिय आहे असं मानलं जातं.

हायमन म्हणजे महिलेच्या योनी मार्गातील एक पडदा असतो. महिलेने लैंगिक संबंध प्रस्थापित केले असतील तर हा पडदा तुटतो.

वर्ध्याच्या सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयाच्या फॉरेंन्सिक मेडिसीन विभागाचे प्रा. डॉ. इंद्रजीत खांडेकर म्हणतात, "2 फिंगर टेस्टमध्ये डॉक्टर मुलींच्या हायमनची (कौमार्य पटल) जखम, रक्तस्राव, छिद्राचा आकार याची तपासणी करतात. यात योनीमार्गाची शिथिलता तपासली जाते."

ही टेस्ट केव्हा केली जाते?

डॉ. इंद्रजीत खांडेकर कौमार्य चाचणी केव्हा केली जाते याबाबत माहिती देतात.

  • बलात्कार पीडितेची वैद्यकीय तपासणी करताना - पीडिता संभोगास सरावलेली आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी
  • न्यायालयांच्या आदेशावर: नपुंसकत्व, विवाद रद्द करणे या वैवाहिक विवादांच्या प्रकरणात महिला कुमारी आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी

'2 फिंगर टेस्ट ला विरोध का झाला?

बलात्कार हा अत्यंत निर्घृण अपराध आहे. यात पीडितेच्या मनावर प्रचंड आघात झालेला असतो. महिलेला झालेल्या शारीरिक जखमा भरतात. पण, पीडित महिला मानसिक दृष्या पूर्णत: खचून गेलेली असते. अशा परिस्थितीत '2 फिंगर टेस्ट' म्हणजे या दृष्ट कृत्याच्या यातना पुन्हा अनुभवण्यासारखं आहे. त्यामुळे या टेस्टला विरोध होत होता.

जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील "2 फिंगर टेस्टला काहीही शास्त्रीय आधार नाही" असं म्हटलं होतं.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गंधाली देवरूखकर सांगतात, "बलात्कार पीडित महिलेने तीचं सर्वस्व गमावलेलं असतं. या अनैतिक वैद्यकीय टेस्टमुळे तिच्यावर पुन्हा बलात्कार होतो." "ही टेस्ट वैद्यकीय दृष्ट्या सदोष आहे," त्या पुढे म्हणतात.

तज्ज्ञांच्या मते,

  • 'हायमन'च्या स्थितीवरून महिलेने लैंगिकसंबंध किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत का नाही हे स्पष्ट सांगता येत नाही.
  • सायकलिंग, रायडिंग किंवा हस्तमैथुन केल्यामुळेदेखील 'हायमन'ला इजा पोहोचू शकते
  • संशोधनातून स्पष्ट झालंय की 'हायमन' सुस्थितीत असेल याचा अर्थ लैंगिक अत्याचार झाला नाही असा होत नाही. किंवा 'हायमन'ला इजा झाली असेल यौनसंबंध जुने असतील असंही म्हणता येत नाही

डॉ. गंधाली देवरूखकर म्हणतात, "काही महिलांना जन्मत:च 'हायमन' नसतं."

लैंगिक संबंधानंतर किंवा खेळांमध्ये सक्रिय महिलांच्या 'हायमन'चं नुकसान झालेलं असतं. त्यामुळे ही टेस्ट अवैज्ञानिक आहे असं स्त्रीरोगतज्ज्ञांचं मत आहे.

फॉरेंन्सिक मेडिसीनतज्ज्ञ प्रा. डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी साल 2010 मध्ये '2 फिंगर टेस्ट'वर बंदी घालण्याची मागणी केली होती. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सुप्रीम कोर्टाला याबाबत पत्रव्यवहार केला होता.

बीबीसीशी बोलताना ते म्हणतात, "पीडित महिला संभोगास सरावलेली आहे किंवा नाही यावर मत देण्यासाठी डॉक्टर्स वैद्यकीय तपासणीत महिलेच्या योनीमध्ये त्यांच्या संमतीशिवाय बोट घालायचे. या मताला कायदेशीर आवश्यकता नसताना किंवा फिंगर टेस्टला वैज्ञानिक आधार नसतानासुद्धा खूप दशकांपासून जगभरात ही चाचणी सर्रास केली जात होती."

2013 मध्ये दिल्लीत निर्भया बलात्कार प्रकरण गाजलं. यानंतर '2 फिंगर टेस्ट'वर बंदी घालण्यात आली. बलात्कार प्रकरणी लवकर निकाल देण्याबाबत न्यायमूर्ती वर्मा कमिटीने केंद्र सरकारला रिपोर्ट दिला. 2014 मध्ये केंद्राने बलात्कार पीडितेच्या तपासणी संदर्भात जाहीर मार्गदर्शक तत्वात ही चाचणी केली जाऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले. असं असूनही देशातील काही भागात ही चाचणी महिलेच्या इच्छेविरोधात सर्रास करण्यात येत होती.

2013 मध्येच 'सेंटर फॉर लॉ पॉलीसी अॅड रिसर्च'ने कर्नाटकातील बलात्कार प्रकरणी फास्टट्रॅक कोर्टाच्या आदेशांचा अभ्यास केला. 20 टक्के प्रकरणात 2 फिंगर टेस्टचा उल्लेख करण्यात आला होता.

सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?

मंगळवारी सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमुर्ती हिमा कोहली यांच्या खंडपिठासमोर एका बलात्कार प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने '2 फिंगर टेस्ट'वर बंदी घालण्याचा पुन्हा आदेश दिला.

"आजही महिलांना '2 फिंगर टेस्ट'ला सामोरं जावं लागतं. ही चाचणी महिलेची प्रतारणा आणि लैंगिक भेदभाव आहे," असं म्हणत सुप्रीम कोर्टाने खेद व्यक्त केला. सुप्रीम कोर्टाने कडक शब्दात, "यापुढे कोणी ही टेस्ट केली तर त्याला दोषी धरलं जाईल" अशी ताकीद दिली आहे.

ही चाचणी 'पितृसत्ताक आणि अवैज्ञानिक' आहे असं म्हणत कोर्टाने ही टेस्ट वैद्यकीय अभ्यासक्रमातून वगळण्याचा आदेश दिलाय.

तेलंगणा हायकोर्टाने ट्रायल कोर्टाचा निर्णय चुकीचा ठरवून बलात्कार प्रकरणी आरोपीला दोषमुक्त केलं होतं. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षी ठोठावली आहे.

कोर्टाने म्हटलं, "लैंगिक संबंध ठेवणाऱ्या महिलांचा बलात्कार होऊ शकत नाही, या चुकीच्या धारणेवर आधारीत ही टेस्ट आहे."

2 फिंगर टेस्ट बंद केली तर खटल्यावर काय परिणाम होईल? डॉ. इंद्रजीत खांडेकर सांगतात, "ही टेस्ट बंद केल्याने सकारात्मक परिणाम होईल. याआधी या चाचणीचा आधार घेत आरोपीचे वकील पीडितेच्या चारित्र्यावर संशय घ्यायचे. तीचा जबाब चुकीचा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करायचे. हा होणारा विपरीत परिणाम आता थांबेल. आणि स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं थांबेल."

MBBS अभ्यासक्रमातून वगळली टेस्ट

नॅशनल मेडिकल काउंसिलने '2 फिंगर टेस्ट' MBBS च्या वैद्यकीय अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला. ही टेस्ट अवैज्ञानिक आहे, याचं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देणं सुरू करण्यात आलं.

डॉ. इंद्रजीत खांडेकर पुढे सांगतात, "वैद्यकीय विद्यार्थ्यांना कौमार्य चाचणी आणि त्याची लक्षणं अवैज्ञानिक, अमानवीय आणि भेदभावपूर्ण आहेत. त्यामुळे ही चाचणी करू नये हे शिकवण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने याच वर्षी 2022 मध्ये घेतला आहे."

तर महाराष्ट्र सरकारने 2019 मध्ये ही टेस्ट वैद्यकीय अभ्यासक्रमातून वगळली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने आदेशही काढला आहे.

बलात्कारप्रकरणी बंदी पण कौटुंबिक प्रकरणात काय होणार?

बलात्कारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने 2 फिंगर टेस्टवर बंदी घातली असली. तरी, कौटुंबिक न्यायालयं अजूनही नपुंसकत्त्व आणि विवाह रद्द करण्याच्या प्रकरणांत कौमार्य चाचणीचे निर्देश देत आहेत, असं डॉ. इंद्रजीत खांडेकर पुढे सांगतात.

ते म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ आणि हायकोर्टाला कौमार्य चाचणी करण्याची बंदी घातली पाहिजे. जी चाचणी बलात्कार पीडितेसाठी अवैज्ञानिक आहे. ती वैवाहिक विवादात वैज्ञानिक कशी ठरू शकते?"

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)