You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आनंदी गोपाळला सर्वोत्कृष्ठ सामाजिक चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार
राजधानी नवी दिल्लीत 67व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 2019मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना तसंच कलाकारांना गौरवण्यात येणार आहे. कंगना राणावतला मणिकर्णिका आणि पंगासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सर्वोत्कृष्ठ सामाजिक चित्रपटाचा पुरस्कार मराठी चित्रपट आनंदी गोपाळला मिळाला आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत अभिनीत 'छिछोरे' चित्रपट सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला. मनोज वाजपेयीला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. 'भोसले' चित्रपटातील कामासाठी मनोज यांना तसंच तामिळ चित्रपटासाठी धनुष यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार 'मारक्कर लायन ऑफ द अरेबियन सी' चित्रपटाला देण्यात येणार आहे. हा मल्याळम चित्रपट आहे.
या पुरस्कारांची घोषणा गेल्या वर्षी होणं अपेक्षित होतं मात्र कोरोना संकटामुळे या पुरस्कारांची घोषणा 2021मध्ये होते आहे. चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी सर्वाधिक पसंतीचं ठिकाण म्हणून सिक्कीम राज्याला सन्मानित करण्यात येणार आहे.
सोहिनी चट्टोपाध्याय यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हे पुरस्कार डायरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल यांच्यातर्फे दिले जातात. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याअंतर्गत या संस्थेचं काम चालतं.
परंपरेनुसार राष्ट्रपतींच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात येतं. मात्र 66व्या राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण उपराष्ट्रपकी वेंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद विजेत्यांबरोबच्या चहापानावेळी उपस्थित होते.
सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट आनंदी गोपाळ
सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या सिनेमांच्या श्रेणीत 'आनंदी गोपाळ' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला.
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जीवनप्रवास या सिनेमातून मांडण्यात आला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 18 व्या शतकामध्ये डॉक्टर होणाऱ्या आनंदीबाई जोशी यांचा प्रवास या चित्रपटात उलगडला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)