You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कंगना राणावत बॅकफुटवर, बेकायदेशीर बांधकाम नियमित करण्यासाठी करणार अर्ज
अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई महापालिकेसोबतच्या बांधकामाबद्दलच्या वादामध्ये एक पाऊल मागे घेतलंय. बेकायदेशीर बांधकाम नियमित करून घेण्यासाठी पालिकेकडे रितसर अर्ज करण्याची आपली तयारी असल्याचं कंगनाच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं.
खारमधल्या फ्लॅटबाबतची हायकोर्टातली याचिका कंगना राणावते मागे घेतली असून कोर्टाला बुधवारी याविषयीची माहिती देण्यात आली.
खारमधल्या इमारतीतल्या फ्लॅटमध्ये बेकायदेशीर सुधारणा केल्याबद्दल मुंबई महापालिकेने कंगना राणावतला नोटीस बजावली होती. त्यानंतर या नोटीशीला आव्हान देणारी याचिका कंगना राणावतने दाखल केली होती.
हे बांधकाम वाचवण्यासाठी कंगनानं दिंडोशी येथील दिवाणी सत्र न्यायालयात दावा दाखल केला होता. पण कोर्टाने हा दावा फेटाळून लावला. हे बांधकाम बेकायदा असल्याची दखल घेत दिंडोशी कोर्टाने कंगनाला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता. पण याप्रकरणी हायकोर्टात दाद मागण्यासाठ कंगनाला सहा आठवड्यांची मुदत दिली होती.
आता मात्र या प्रकरणी कंगना राणावतने एक पाऊल मागे घेतलंय.
कंगनानं तिच्या खार येथील फ्लॅटमध्ये झालेलं अनधिकृत बांधकाम मान्य केलं, मात्र ते आपण केलं नसून विकासकानं केल्याचा कंगनाचा दावा आहे. हे बेकायदेशीर बदल नियमित करण्यासाठी पालिकेमध्ये रीतसर अर्ज करण्याची मुभा तिला देण्यात आलीय.
कंगना राणावतचा अर्ज दाखल झाल्यानंतर यावर चार आठवड्यांच्या आत निकाल देणं मुंबई महापालिकेला बंधनकारक असल्याचं हायकोर्टाने म्हटलंय.
या अर्जावरचा मुंबई पालिकेचा निकाल कंगनाच्या विरोधात गेला, तरी मुंबई महानगरपालिकेला या बांधकामावर लगेच कारवाई करता येणार नाही. त्यासाठी 2 आठवड्यांची स्थगिती देण्यात आलीय.
मुंबई महापालिकेच्या या निकालाच्या विरोधात कंगनाला पुन्हा कोर्टात दाद मागता येणार असल्याचं हायकोर्टाने आपल्या निकालात म्हटलंय.
गेल्या वर्षी अभिनेत्री कंगना राणावतच्या पाली हिल भागातल्या बंगल्याचा काही भाग बेकायदेशीर असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेने त्यावर बुलडोझर चालवला होता. पण महापालिकेची ही कारवाई सूडबुद्धी करण्यात आल्याचं नंतर हायकोर्टाने म्हटलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)