You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
परमबीर सिंह : अनिल देशमुख यांचं गृहमंत्रिपद जाणार का?
गृहमंत्री अनिल देशमुखांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य दिले होते असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्यानंतर विरोधी पक्षाने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंहांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की "हे सरकार भ्रष्ट आहे, हे अगदी स्पष्ट आहे. पोलीस आयुक्तच सांगत आहेत की गृहमंत्र्यांनीच वसुलीचे टार्गेट दिले होते तर आणखी पुरावा काय हवा त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनिल देशमुखांचा तत्काळ राजीनामा घ्यावा."
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे, की ज्या परमबीर सिंहांची अनिल देशमुख विधिमंडळात पाठराखण करत होते आता तेच परमबीर सिंहांविरोधात बोलत आहेत. याचा काय अर्थ आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुख- परमबीर सिंह यांच्या प्रकरणावर भाष्य करण्याचे टाळले आहे. "या विषयी मला काहीही माहीत नाही. याबाबत जो काही निर्णय आहे तो सरकारचे प्रमुख नेतेच घेतील असं म्हटलं आहे."
अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो का?
परमबीर सिंह यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर असून अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागण्याची चिन्हं आहेत असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात, "परमबीर सिंह यांच्या गंभीर आरोपानंतर राष्टृवादीतून अनिल देशमुख यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत चाललाय.
नि:पक्षपातीपणे चौकशी होईपर्यंत देशमुख यांना राजीनामा द्यावा लागेल अशी चिन्ह दिसून येत आहेत."
सुधीर सूर्यवंशी यांच्याच प्रमाणे राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनीही असं म्हटले आहे की,
"परमबीर सिंह यांचे आरोप फार गंभीर आहेत. त्यांनी थेट अनिल देशमुख यांचं नाव घेतलंय. त्यामुळे देशमुख यांना राजीनामा द्यावा लागेल अशी शक्यता आहे.
सचिन वाझे प्रकरणी देशमुख यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल. त्यावेळेस फक्त खातेबदलाची चर्चा होती. मात्र या प्रकरणानंतर मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे."
'परमबीर सिंहांचा लेटरबाँब'
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली असं पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हे पत्र त्यांनीच लिहिलं आहे का याची खातरजमा करण्यासाठी बीबीसीने परमबीर सिंह यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, 'मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी यांचा सहभाग स्पष्ट हेत असताना त्याचे धागेदोरे परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहचणार असल्याचं तपासातून स्पष्ट होत असताना परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आणि कारवाईपासून वाचण्यासाठी खोटा आरोप केला आहे', अशी अनिल देशमुख यांनी आपली बाजू ट्वीटरवर मांडली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वीच सचिन वाझे प्रकरणी परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती.
या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एबीपी माझा आणि लोकमतला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीच्या संदर्भात परमबीर सिंह यांनी पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे.
परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केली राजीनाम्याची मागणी
एखादा विद्यमान अधिकारी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचे पत्र लिहिण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांमार्फत वा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा आणि अनिल देशमुखांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केली.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड-परमबीर सिंग यांनी लिहिलेले हे पत्र केवळ खळबळजनक नाही, तर अतिशय धक्कादायक आहे, असं फडणवीस म्हणाले.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "परमबीर सिंग यांनी या पत्रात त्यांनी जो संवाद जोडला आहे, त्यातून स्पष्ट होते की, पैशाची थेट मागणी झालेली आहे. ज्याप्रकारे पोस्टिंग, विशिष्ट अधिकार देणे यासाठी आर्थिक व्यवहार होतात, यातून पोलीस दलाचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होताना दिसते आहे. इतके गंभीर आरोप झाल्यानंतर गृहमंत्री आपल्या पदावर राहूच शकत नाही. त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अनिल देशमुखांवर लागलेले आरोप गंभीर आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा गेला आहे. अनिल देशमुखांनी आपला राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे असं ट्वीट राज ठाकरे यांनी केले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)