परमबीर सिंह: या 7 कारणांमुळे झाली मुंबई पोलीस आयुक्तांची बदली

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

सचिन वाझे प्रकरणानंतर राज्य सरकारने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची तात्काळ उचलबांगडी केली आहे.

बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बैठकीत परमबीर सिंह यांना हटवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटकरून याबाबत माहिती दिली.

पोलीस महासंचालक दर्जाचे आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे.

सचिन वाझे यांना मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी अटक झाली. या प्रकरणात पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर कोणीही थेट आरोप केला नव्हता. मग कोणत्या कारणांनी परमबीर सिंह यांची बदली झाली. हे आपण जाणून घेऊया.

1. राज्य सरकारची प्रतिमा डागाळू नये म्हणून?

सचिन वाझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे अधिकारी मानले जायचे. वाझेंच्या अटकेमुळे पोलीस दलाची प्रतिमा खराब झाली. उद्धव ठाकरे सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला होता.

राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात, "सचिन वाझे प्रकरणानंतर सरकारला फेस सेव्हिंग करणं गरजेचं होतं. पोलीस दलातील एका अधिकाऱ्याला स्फोटकं ठेवल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेला तडा गेला होता."

"सरकारला डॅमेज कंट्रोल करणं गरजेचं होतं," असं सूर्यवंशी पुढे सांगतात.

मुंबई पोलिसातले सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर पोलिसांनीच षड्यंत्र रचल्यासारखं दिसून येत होतं. महाविकास आघाडी सरकरामध्ये गृह मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्याची गरज होती, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

2. परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रारी?

चेकमेट पुस्तकाचे लेखक आणि राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणतात, "परमबीर सिंह यांच्याविरोधात अनेक तक्रारी सरकारकडे आल्या होत्या."

वरिष्ठ क्राइम रिपोर्टर्स सांगतात, "वाझे यांच्या पोलीस दलातील वाढत्या प्रभावामुळे पोलीस दलात नाराजी होती. वरिष्ठ अधिकारी नाराज होते. पण, पोलीस दलात याची उघडपणे चर्चा केली जात नव्हती."

सुधीर सूर्यवंशी सांगतात, "राजकीय दृष्ट्या अतिमहत्त्वाच्या प्रकरणांच्या चौकशीवर परमबीर यांनी लक्ष दिलं नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजी होती."

"पोलीस अधिकाऱ्यांना आवरणं सरकारला गरजेचं बनलं होतं. त्यामुळे परमबीर यांची बदली झाली," असं सुधीर सूर्यवंशी सांगतात.

3. स्वत:च्या अधिकाऱ्यांवर वचक नाही? नैतिक जबाबदारी आयुक्तांची?

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी NIA ने सचिन वाझे यांना अटक केली. NIA सूत्रांच्या माहितीनुसार स्कॅार्पियोचा पाठलाग करणारी पांढरी इनोव्हा ही वाझे यांच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटची होती.

अंबानी आणि इतर महत्त्वाच्या प्रकरणात सचिन वाझे थेट पोलीस आयुक्त म्हणून परमबीर सिंह यांना रिपोर्ट करायचे. त्यामुळे वाझे यांच्या अटकेनंतर पोलीस दलात परमबीर सिंह यांच्या भूमिकेवर दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती.

वरिष्ठ पत्रकार अभय देशपांडे म्हणतात, "एका सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला महत्त्वाची प्रकरणं का दिली जातात? हा अधिकारी फक्त पोलीस आयुक्तांना थेट रिपोर्ट का करतो? यावरुन पोलीस दलात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती."

"सचिन वाझेंना अटक केल्यानंतर याची प्रत्यक्ष जबाबदारी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर येणार याची चिन्ह दिसू लागली होती," असं अभय देशपांडे सांगतात.

पोलीस आयुक्तांना प्रत्येक गोष्टीची माहिती देणारा अधिकारी, पोलिसांची गाडीच एका गुन्ह्यासाठी वापरतो. आयुक्तांच्या नाकाखाली चाललेल्या गोष्टींची त्यांना माहिती नाही? असे प्रश्न परमबीर सिंह यांच्यावर उपस्थित करण्यात येत होते.

4. वाझे प्रकरणी इतर अधिकाऱ्यांची चौकशी?

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर क्राइम इंटेलिजन्स युनिटच्या चार अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली.

NIA ने CIU मध्ये जाऊन वाझे यांच्या प्रकरणी तपासात झाडाझडती घेतलीये.

वरिष्ठ क्राइम रिपोर्टर सुनिल मेहरोत्रा म्हणतात, "या प्रकरणात मुंबई पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत परमबीर सिंह यांना पोलीस आयुक्त पदावर कायम ठेवणं योग्य नाही, असा विचार बहुदा सरकारने केला असावा म्हणून त्यांची बदली करण्यात आली असावी."

NIA च्या तपासात स्कॉर्पियोला फॉलो करणारी इनोव्हा पोलीस आयुक्त कार्यालयात होती असं समोर आलंय.

"पोलीस आयुक्त परमबीर सिंह या षड्यंत्राचा भाग नसतीलही. त्यांना याबद्दल काहीच माहिती नसेल. पण ते पोलीस आयुक्त म्हणून आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाहीत. आपला ज्युनियर अधिकारी काय करतो यावर बॅासचं लक्ष असायला हवं," असं सुनिल मेहरोत्रा सांगतात.

5. प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न?

सचिन वाझेंचे प्रकरण विरोधकांनी लावून धरलं आहे. सचिन वाझेंच्या अटकेची मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली होती. विरोधक या प्रकरणात प्रचंड आक्रमक आहेत.

"विरोधकांना शांत करण्यासाठी सरकारने परमबीर यांची बदली केली," असं राजकीय पत्रकार सांगतात.

6. इतर अधिकाऱ्यांना इशारा?

वरिष्ठ राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणतात, "परमबीर सिंह यांची बदली करून सरकारने वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना दिलेला हा इशारा आहे."

राजकीय विश्लेषकांच्या माहितीनुसार, परमबीर सिंह यांच्यासारख्या बड्या अधिकार्याची बदली करून राज्य सरकारने एक गोष्ट स्पष्ट केलीये. वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना आपल्या विभागावर लक्ष द्यावं. पोलीस दलाची प्रतिमेला डाग लावल्यास कारवाई केली जाईल.

7. राजकीय दबाव?

राजकीय विश्लेषक सांगतात, काँग्रेसचा परमबीर सिंह यांच्या नावाला पहिल्यापासून विरोध होता.

"परमबीर सिंह यांना पोलीस आयुक्त करण्याआधी काँग्रेसने खूप विरोध केला होता. पण शिवसेना आणि राष्टृवादी काँग्रेसने हा विरोध न जुमानता सिंह यांना पोलीस आयुक्त केलं," असं अभय देशपांडे सांगतात.

सचिन वाझे प्रकरणं योग्य पद्धतीने हाताळलं गेलं नाही म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर प्रश्न उपस्थित झाले. देशमुख गृह मंत्रालय सांभाळू शकत नाहीत? असा सवाल उपस्थित झाला.

गृहखातं एनसीपीकडे त्यामुळे नेते पक्षाची प्रतिमा खराब होईल याची भीती होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा परमबीर सिंह यांच्या बदलीसाठी आग्रह होता असं बोललं जातंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)