पाकिस्तानात परदेशातून येणारा पैसा अचानक कसा वाढला?

    • Author, तनवीर मलिक
    • Role, पत्रकार, कराची

मलिक अल्लाह यार खान, जपानमध्ये व्यवसाय करतात. मलिक हवाला आणि हंडी यांच्या माध्यमातून पाकिस्तानात आपल्या कुटुंबीयांना पैसे पाठवत होते.

पण त्यांनी आता हवाला आणि हंडी यांच्यामार्फत पैसे पाठवणं बंद केलं आहे. आता ते बँकिंगच्या पर्यायांचा वापर करूनच आता कुटुंबीयांना पैसे पाठवतात.

जपानमधील फायनान्स इंटरनॅशनल या फर्मचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या मलिक अल्हार यार खान यांच्या माहितीनुसार, बँकांच्या सोयी-सुविधांमध्ये सुधाणा केल्याने त्यांना आता पाकिस्तानात पैसे पाठवणं आता सोपं झालं आहे.

त्यांच्या मते, हवाला आणि हंडीच्या माध्यमातून पाकिस्तानात पैसे पाठवणं हे पूर्णपणे बंद झालेलं नाही. पण गेल्या काही दिवसांत जपानमधून पाकिस्तानला पाठवले जाणारे पैसे हे बहुतांश स्वरुपात बँकिंगच्या माध्यमातूनच पाठवण्यात येत आहे.

नॉर्वेच्या राजधानीत ओस्लोमध्ये किराणा दुकानात काम करणाऱ्या कंवल अजीम यासुद्धा पूर्वी हवाला आणि हंडीच्या माध्यमातून पैसे पाठवायच्या.

त्या सांगतात, "इथं राहणारे काही लोक हवाला आणि हंडीच्या माध्यमातून पैसे पाठवत असतात. पण आता ते कमी झालं. इथंही आता बँकिंगचा वापर जास्त प्रमाणात केला जात आहे."

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात काम करणाऱ्या आझम शकील यांच्या मते, 99 टक्के नागरिक आता कायदेशीर पद्धतीनेच पैसे पाठवत आहेत. अमेरिकेत हवालाच्या पैशांबाबत पाकिस्तानच्या तुलनेत कठोर कायदे आहेत. यावर आळा घालण्यासाठी कठोर कारवाई केली जाते.

जपानमध्ये राहणारे अल्लाह यार खान, नॉर्वेत काम करणाऱ्या कंवल अजीम आणि अमेरिकेतील आझम पाकिस्तानात पाठवत असलेल्या पैशाला रेमिटन्स (परदेशातून पाठवली जाणारी कमाई) असं संबोधलं जातं.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत हा पैसा महत्त्वाचा आहे. गेल्या काही महिन्यात परदेशातून येणाऱ्या या पैशामध्ये चांगलीच वृद्धी पाहायला मिळत आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्या आठ महिन्यांपासून प्रत्येक महिन्यात दोन अब्ज डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम परदेशातून पाकिस्तानात पाठवण्यात आली आहे.

दुसरीकडे, कराचीत राहणाऱ्या हुमा मुजीब यांना परदेशातून पैसे पाठवले जातात. हुमा यांचे पती जर्मनीत काम करतात. काही दिवसांपूर्वीच ते तिथं कामासाठी गेले आहेत.

हुमा यांचे पती पैसे बँकेतून पाठवतात. ही प्रक्रिया सोपी आहे. आतापर्यंत कधीच आपल्याला अडचण आली नाही, असं त्यांनी सांगितलं.

पण त्यांनी हवाला किंवा हंडीच्या माध्यमातून पैसे कधीच घेतल्याचं मान्य केलं नाही.

सरकारी नियमांमध्ये झालेल्या कठोर बदलामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं आर्थिक तज्ज्ञ सांगतात.

पाकिस्तान फायनान्शियल टास्क फोर्सच्या अटी आणि शर्थी पूर्ण करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहे. पाकिस्तान ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

परदेशी कमाई किती वाढली?

परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांकडून देशात पैसे वापरण्याच्या प्रमाणात यावर्षीच्या सुरुवातीपासूनच वाढ पाहायला मिळाली आहे.

आरिफ हबीब लिमिटेडच्या आर्थिक विषयाच्या तज्ज्ञ सना तौफीक यांनी सांगितलं, "रेमिटन्समध्ये वाढ होण्याची सुरुवात गेल्या वर्षापासूनच झाली. प्रत्येक महिन्यात सुमारे दोन अब्ज डॉलर पाकिस्तानात आले.

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2021 मध्ये सलग नवव्या महिन्यात रेमिटन्स दोन अब्ज डॉलरपेक्षा जास्त राहिला.

फेब्रुवारी 2021 मध्ये काम करणाऱ्या लोकांचा रेमिटन्स 2.266 अब्ज डॉलर इतकं आहे. जानेवारी महिन्यातही ही रक्कम जवळपास इतकीच आहे.

पण गेल्या वर्षीची म्हणजेच फेब्रुवारी 2020 ची तुलना केल्यास ही रक्कम 24 टक्क्यांनी जास्त आहे.

2021 च्या आर्थिक वर्षात जुलै ते फेब्रुवारी दरम्यान काम करणाऱ्या व्यक्तींचा रेमिटेंस 18.7 डॉलरपर्यंत पोहोचलं आहे. ही रक्कम गेल्यावर्षीच्या तुलनेत 24.1 टक्क्यांनी जास्त आहे.

या कालावधीत रेमिटन्समधील सर्वात जास्त रक्कम ही सौदी अरेबियातून (5.0 अब्ज डॉलर) आली आहे.

खालोखाल संयुक्त अरब अमिरात (3.9 अब्ज डॉलर), ब्रिटन (2.5 अब्ज डॉलर) आणि अमेरिका (1.6 अब्ज डॉलर) या देशांचा समावेश आहे.

परदेशातून येणाऱ्या कमाईमध्ये वाढ होण्याचं कारण

पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेने रेमिटन्स वाढीला दुजोरा दिला. त्यांनी म्हटलं, "सरकार आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने एकत्रितपणे घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांचं हे यश आहे.

तसंच कोरोना साथीमुळे मर्यादित स्वरुपात परदेश यात्रा, साथीच्या काळातील आरोग्य बजेट आणि कल्याणकारी निधीचं हस्तांतर आणि विनिमय बाजारांत स्थिरीकरणामुळे हे शक्य झाल्याचं बँकेने म्हटलं.

अर्थतज्ज्ञ सना तौफीक यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्या सांगतात, "बेकायदेशीर प्रकारांवर आळा घालण्यासाठी कायदेशीर पर्यायांना प्रोत्साहन देण्यात आलं. जगभरात कोरोनामुळे पर्यटन बंद झालं. त्यामुळे परदेश यात्रा मनोरंजन यांसारख्या गोष्टींवर खर्च होणारा पैसा पाकिस्तानात पाठवण्यात आला."

पाकिस्तानच्या एक्सचेंज कंपनी असोसिएशनचे सचिव जफर पारचा यांनी सरकार आणि स्टेट बँकेने केलेल्या धोरणात्मक बदलांची यामध्ये मोठी भूमिका असल्याचं सांगितलं.

इतर मार्गांनी येणाऱ्या पैशांवर नजर ठेवण्यासाठी फायनान्शिअल मॉनिटरिंग युनिट सक्रिय आहे. या लोकांच्या ससेमिऱ्यापासून वाचण्यासाठी लोकांनी कायदेशीर मार्गाचाच अवलंब करणं योग्य समजलं, असं पारचा म्हणाले.

FTFF च्या अटींची किती मदत?

FTFF च्या अटी आणि शर्थी यासुद्धा रेमिटेंस वाढण्याचं महत्त्वाचं कारण मानलं जात आहे. या अटींची पूर्तता केल्यास पाकिस्तान ग्रे लिस्टमधून बाहेर येऊ शकतो.

याबाबत माहिती देताना सना तौफिक सांगतात, "या अटी पूर्ण करण्यासाठी सरकारने योग्य पाऊलं उचलली. अवैध पद्धतीने पाकिस्तानात येणाऱ्या पैशावर नजर ठेवण्यात आली. हवाला किंवा हंडीसारख्या अवैध पद्धतीचा वापर आता करणं अवघड बनलं आहे."

पाकिस्तानने पूर्ण केलेल्या अटींमध्ये मनी लॉन्ड्रिंग रोखण्याच्या अटीचाही समावेश आहे, असं सना यांनी सांगितलं.

जफर पारचा याविषयी बोलताना म्हणतात, "हवाला किंवा हंडी ही पद्धत 40-50 वर्षांपूर्वी बेकायदेशीर नव्हती. पण गेल्या 25 वर्षांत यावर नजर ठेवण्यात आली. ही पद्धत अवैध घोषित करण्यात आली आहे.

जफर पारचा यांनी एका आंतरराष्ट्रीय संमेलनातही याबाबत भाषण केलं होतं. हवाला, हंडीच्या माध्यमातून पैसे पाठवणं हा गुन्हा आहे किंवा नाही, याबाबत लोकांना माहिती नव्हतं. याबद्दल आता जागरुकता निर्माण झाली आहे. FTFF च्या अटीमुळे याबाबतचं धोरण आणखी कठोर बनलं आहे, असं त्यांनी सांगितलं होतं.

परदेशातून येणाऱ्या पैशाबाबत आता सरकारी संस्थांच्या आधीच एक्सचेंज कंपन्याच काळजी घेताना दिसतात. एखादा व्यवहार संशयास्पद वाटल्यास ते याची माहिती सरकारी संस्थांना देतात, असं त्यांनी सांगितलं.

रेमिटन्समध्ये वृद्धी कायम राहणार?

आगामी काळात रेमिटन्समध्ये वृद्धी कायम राहील किंवा नाही, याबाबत चर्चा करताना सना म्हणाल्या, "भविष्यातही हीच स्थिती राहू शकते. रमजान आणि ईद जवळ आल्याने पुढच्या चार महिन्यात यामध्ये आणखी वाढ होऊ शकते."

त्या सांगतात, "देशात सरासरी आतापर्यंत 18 अब्जांपेक्षा जास्त रक्कम परदेशातून आली आहे. पुढील काही दिवसांत हा आकडा 28 अब्जांपर्यंत जाऊ शकतो. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हे अत्यंत महत्त्वाचं असेल. निर्यात आणि आयात यांच्या फरकाने आपल्याला थोडक्यात फटका बसू शकतो. पण रेमिटन्समुळे हे संतुलन राखणं शक्य आहे."

यामुळे पाकिस्तानी रुपयाचा दरही डॉलरच्या तुलनेत स्थिर राहील. आगामी काळात पेट्रोल, डिझेलच्या किमतीच्या वाढीला आळा बसेल, असं सना यांना वाटतं.

पारचा यांनीही ही वृद्धी कायम राहण्याची शक्यता वर्तवली. अवैध पद्धतीने पैसे पाठवण्यासारखी परिस्थिती आता नाही. त्यामुळे कायदेशीर पद्धतीने पैसा आल्यास त्यामुळे देशाचा फायदा होईल, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)