एम. के. स्टॅलिन कोण आहेत? करूणानिधी यांनी आपल्या मुलाचं नाव स्टॅलिन का ठेवलं?

करूणानिधी स्टॅलिन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, करूणानिधी आणि स्टॅलिन
    • Author, मुरलीधरन कासीविनाथन
    • Role, बीबीसी तमीळ

द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक)चे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी आज (7 मे) तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

स्टॅलिन यांच्यासोबत 33 इतर मंत्र्यांनीही शपथग्रहण केलं. यात 19 माजी मंत्री आणि 15 नवे चेहरे आहेत. नव्या मंत्रिमंडळात दोन महिला मंत्री आहेत.

तामिळनाडूचे राज्यपाल भंवारीलाल पुरोहित यांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक) पक्षानं सत्ता मिळवण्याएवढं बहुमत मिळवलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

स्टॅलिन यांनी द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक)च्या एका स्थानिक कार्यकर्त्याच्या स्वरुपात आपली राजकीय कारकिर्द सुरू केली होती.

स्टॅलिन द्रमुकच्या युवा शाखेचे सरचिटणीस बनले, त्यानंतर त्यांच्यावर घराणेशाहीची टीका झाली. मात्र, आपली निवड फक्त करूणानिधी यांचे चिरंजीव म्हणून झालेली नसल्याचं स्टॅलिन यांनी लवकरच सिद्ध केलं हे विशेष.

एम. करुणानिधी आणि त्यांची दुसरी पत्नी दयालू अम्मल यांच्या पोटी 1 मार्च 1953 रोजी स्टॅलिन यांचा जन्म झाला. एम. के. मुथू आणि एम. के. अलागिरी यांच्यानंतर करूणानिधी यांचं हे तिसरं अपत्य.

त्यांच्या जन्मानंतर चारच दिवसांत सोव्हिएत रशियाचे नेते जोसेफ स्टॅलिन यांचं निधन झालं होतं. त्यामुळे करूणानिधी यांनी हेच नाव आपल्या मुलाला दिलं.

स्टॅलिन

फोटो स्रोत, Getty Images

स्टॅलिन यांनी चेन्नईच्या चेटपेटमध्ये ख्रिस्टियन माध्यमिक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर चेन्नईच्याच विवेकानंद कॉलेजमधून बारावी तर प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.

स्टॅलिन जन्मल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांना पाहिलं, ते विधानसभा सदस्य म्हणूनच.

राजकारणाची सुरुवात

एम. के. मुथू यांना फिल्म इंटस्ट्रीमध्ये जास्त रस होता. पण स्टॅलिन राजकारणाकडे आकर्षित झाले.

द्रमुक पक्ष त्यावेळी पोंगल सण मोठ्या उत्साहात साजरा करत असे. तसंच पक्ष-संस्थापक अण्णादुराई यांचा जन्मदिवससुद्धा मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात होता.

स्टॅलिन

फोटो स्रोत, Getty Images

1960 च्या दशकाच्या अखेरीस स्टॅलिन यांनी गोपालपुरम येथील तरुणांना सोबत घेऊन युथ DMK नामक एक संघटना स्थापन केली.

महत्त्वाच्या नेत्यांचे जन्मदिवस साजरे करणं, हा त्यांच्या या मागचा उद्देश होता.

एम. करुणानिधी, एम. जी. रामचंद्रन, नंजील मनोहरन आणि पी. यू. शनमुगम यांच्या सारख्या नेत्यांनीही या संघटनेच्या बैठकांमध्ये सहभाग नोंदवला होता.

पुढे याच संघटनेला द्रमुक पक्षाची युवा शाखा म्हणून मान्यता देण्यात आली.

स्टॅलिन यांना थाऊजंड लाईट्स मतदारसंघाच्या 75 व्या सर्कलचे स्थानिक प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आलं.

द्रमुक पक्षातील हे त्यांचं पहिलंच अधिकृत पद होतं. हे पद अत्यंत कनिष्ठ पातळीवरचं होतं.

1968 च्या चेन्नई महानगरपालिका निवडणुकीत स्टॅलिन यांनी द्रमुकसाठी प्रचार केला.

त्यावेळी त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं सुरू केलं. द्रमुकच्या विविध सार्वजनिक सभांमध्ये ते भाषण देऊ लागले.

1975 साली स्टॅलिन यांचा विवाह दुर्गावती उर्फ सांता यांच्याशी झाला. याच्या काही महिन्यांनंतर संपूर्ण देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी तामीळनाडूमध्ये द्रमुक पक्ष सत्तेत होता.

तत्कालिन मुख्यमंत्री करुणानिधी हे पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सहयोगी होते. पण आणीबाणीला त्यांचा विरोध असल्यामुळे हे सरकार पडलं.

अटकेनंतर वेगळी ओळख

स्टॅलिन यांना 1976 मध्ये गोपालपुरम येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. तुरुंगात त्यांना जबर मारहाणही झाली.

एक वर्ष तुरुंगवासात काढल्यानंतर त्यांना 23 जानेवारी 1977 मध्ये मुक्त करण्यात आलं.

स्टॅलिन

फोटो स्रोत, Getty Images

तुरुंगात जाईपर्यंत स्टॅलिन यांना फक्त मुख्यमंत्री करुणानिधी यांचा मुलगा म्हणून ओळखलं जायचं. पण तुरुंगवास भोगून परतल्यानंतर त्यांना एक नवी ओळख मिळाली.

द्रमुकच्या युवा शाखेसाठी काम करणं स्टॅलिन यांनी सुरुच ठेवलं. 20 जून 1980 मध्ये द्रमुकच्या युवा शाखेची अधिकृत घोषणा झाली. त्यावेळी याचे नेते म्हणून स्टॅलिन यांची निवड करण्यात आली होती.

त्या काळात द्रमुक पक्षाची कामगार शाखा सर्वांत मजबूत म्हणून ओळखली जायची. पण हळुहळु याची जागा युवा शाखेने घेतली.

अधिकृतपणे युवा शाखेची घोषणा झाल्यानंतर काहीच दिवसात युवा शाखेने पाळंमुळं रोवायला सुरुवात केली. पुढे द्रमुक पक्षाची सर्वांत मजबूत शाखा म्हणून युवा शाखेचं नाव घेतलं जाऊ लागलं.

तामिळनाडूच्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात तसंच गावागावात पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शाखेचे सदस्य निवडून आले.

कठोर मेहनत आणि लोकांमध्ये मिसळून काम करण्याच्या पद्धतीमुळे स्टॅलिन यांनी हे यश प्राप्त केल्याचं मानलं जातं.

आता युवा शाखेचं स्वतंत्र कार्यालय उघडण्याची मागणी होऊ लागली. पण जर यांनी पक्षनिधी म्हणून 10 लाख रुपये जमवले तर त्यांना अनबगम नामक एक इमारत देण्यात येईल, असं पक्षाने म्हटलं.

त्यावेळी स्टॅलिन यांनी 11 लाख रुपये जमा केले. त्यानंतर युवा शाखेच्या कार्यालयासाठी अनबगम इमारत ही देण्यात आली. ही 1988 ची गोष्ट आहे. तेव्हापासून युवा शाखेचं कार्यालय याच इमारतीत आहे.

1984 मध्ये निवडणुकीच्या राजकारणात

स्टॅलिन यांनी 1984 मध्ये निवडणुकीच्या राजकारणात पाऊल ठेवलं. त्यावेळी त्यांनी थाऊजंड लाईट्स मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

1989 मध्ये पुन्हा याच मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. यावेळी त्यांचा विजय झाला.

त्यानंतर 1991 ला सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली. पण पराभूत झाले.

त्यावेळी राजीव गांधी यांच्या हत्येमुळे काँग्रेसचे सहयोगी असलेल्या अण्णाद्रमुक पक्षाची लाट होती.

पुन्हा 1996 मध्ये झालेल्या निवडणुकीत थाऊजंड लाईट्स मतदारसंघातून स्टॅलिन यांनी विजय मिळवला.

दरम्यान त्यांनी चेन्नई महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूकही लढवली आणि विजय मिळवला.

महापौर असताना त्यांच्या कामाच्या पद्धतीने सर्वांचं लक्ष वेधलं. सिंगारा चेन्नई उपक्रमाअंतर्गत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या.

2001 मध्ये थाऊजंड लाईट्स मतदारसंघातून स्टॅलिन यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यावेळी ते पुन्हा महापौर बनले.

त्यानंतर नव्या कायद्यानुसार एक व्यक्ती दोन पदांवर राहू शकत नाही त्यामुळे त्यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला.

साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात स्टॅलिन यांचं कर्तृत्व वडिलांइतकं मोठं नाही. त्यांनी काही चित्रपट आणि मालिकांमध्ये कामही केलं, पण हे क्षेत्र आपल्यासाठी नसल्याची जाणीव झाल्याने त्यांनी अभिनयाला रामराम ठोकला.

2006 मध्ये द्रमुक पक्ष तामिळनाडूमध्ये पुन्हा सत्तेत आला. त्यावेळी त्यांना स्थानिक प्रशासन मंत्रिपदी नियुक्त करण्यात आलं. त्यांनी आपले अधिकारी स्वतः निवडून योग्य प्रकारे काम केलं.

दरम्यान, पक्षाची प्रतिमा नकारात्मक बनत चालली होती. पण स्टॅलिन यांचं काम चांगलं असल्याचं मानलं गेलं.

त्यानंतर एम. के. स्टॅलिन यांना पक्षाच्या कोषाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं. तसंच त्यांना उपमुख्यमंत्रिपदही देण्यात आलं.

सलग पराभव

2011च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकचा पराभव झाला. त्यानंतर 2014 ला त्यांना लोकसभा निवडणुकीतही पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर 2016 च्या विधानसभा निवडणुकीलाही त्यांना पराभवाचंच तोंड पाहावं लागलं.

दुसरीकडे, एम. करुणानिधी आरोग्याच्या समस्येमुळे राजकारणातून निवृत्त झाले. त्यावेळी. एम. के. स्टॅलिन यांना द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आलं. पक्षाची कमान स्टॅलिन हेच सांभाळतील, असं करुणानिधींनी सांगितलं.

जानेवारी 2013 मध्ये एका पत्रकार परिषदेत करूणानिधींना याचे संकेत दिले. मी स्टॅलिनला माझा उत्तराधिकारी घोषित केलं, तर त्यामध्ये चुकीचं काय आहे? असा प्रश्न करुणानिधी यांनी त्यावेळी विचारला होता.

2016 मध्येही एका मुलाखतीत करुणानिधी यांनी याचाच पुनरुच्चार केला होता. 2018 मध्ये करुणानिधी यांचं निधन झाल्यानंतर पक्षाची सूत्र स्टॅलिन यांच्या हातात गेली आहेत.

त्यांच्या नेतृत्वाखालीच 2019 ची लोकसभा निवडणूक लढवण्यात आली. यामध्ये 39 पैकी 37 ठिकाणी पक्षाने विजय मिळवला.

स्टॅलिन यांच्यावर घराणेशाहीचे आरोप

करुणानिधी यांनी स्टॅलिन यांनाच उत्तराधिकारी नेमण्याचे प्रयत्न सुरू केल्याच्या आरोपाखाली पक्षाचं एकदा विभाजनही झालं होतं. 1993 मध्ये वायको यांनी द्रमुकबाहेर पडत नव्या पक्षाची स्थापना केली.

MGR यांनीही करूणानिधींची साथ सोडून अशाच प्रकारे अण्णाद्रमुक पक्ष स्थापन केला होता. ही पक्षातील सर्वांत मोठी फूट होती.

स्टॅलिन यांची ताकद वाढत गेली तसंच कुटुंबातून त्यांना विरोध होऊ लागला.

2014 मध्ये करुणानिधी यांनी स्टॅलिन उत्तराधिकारी असण्याबाबत घोषणा केल्यानंतर मोठा मुलगा अळगिरी यांनी त्याला विरोध दर्शवला होता. त्यावेळी त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

1970 आणि 1980 च्या दशकात स्टॅलिन यांच्या कामावर बरीच टीका झाली. पण त्यांनी प्रचंड मेहनतीने त्या टीकेला दूर केलं.

आता 2021 ची विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. ही निवडणूक स्टॅलिन यांचं भवितव्य ठरवणार आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)