हेमंत नगराळे: मुंबई पोलीस दलाच्या नव्या आयुक्तांविषयी या गोष्टी माहित आहेत का?

हेमंत नगराळे

फोटो स्रोत, Facebook

सचिन वाझेप्रकरणी मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी हेमंत नगराळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

परमबीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोण आहेत हेमंत नगराळे?

नगराळे मूळचे चंद्रपूरचे. चंद्रपूरच्याच जिल्हा परिषद शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. पुढे शिक्षणासाठी ते नागपूरला गेले. नागपुरात पटवर्धन हायस्कूलमधून त्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं.

पुढे त्यांनी इंजीनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. नागपुरातल्याच तत्कालीन VRCE आणि आताच्या VNIT मधून त्यांनी मेकॅनिकल इंजीनिअरिंगची पदवी मिळवली. उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. मुंबईत त्यांनी फायनान्स मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

1987 साली ते आयपीएस झाले आणि त्यांच्याच चंद्रपूरमध्ये त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली. चंद्रपुरातला नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजुरा जिल्ह्यात त्यांनी एएसपी म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली.

पुढे 1992 ला डीसीपी म्हणून त्यांची बदली सोलापूरला झाली. त्यावेळी नुकतचं बाबरी विध्वंस प्रकरण घडलं होतं. यावेळी सोलापूरमध्ये उसळलेली जातीय दंगल त्यांनी हाताळली होती.

1994 ला ते रत्नागिरीला एसपी पदावर गेले आणि एनरॉन-दाभोळ वीज प्रकल्पाचं प्रकरण तापलं होतं. या दाभोळ प्रकल्पासाठी भूसंपादनाला स्थानिकांचा मोठा विरोध हातो, हे प्रकरण त्यांनी हाताळलं होतं.

1996-98 या काळात त्यांनी पोलीस अधीक्षक, सीआयडी असताना त्यांनी राज्यव्यापी एमपीएससी पेपर लिक प्रकरण हाताळलं.

1998 मध्ये त्यांना सीबीआयच्या डेप्युटेशनवर पाठवण्यात आलं. सीबीआयच्या पोस्टिंगवर असताना त्यांनी देशभरात गाजलेला 400 कोटींचा हर्षद मेहता घोटाळा, 130 कोटींचा केतन पारेख घोटाळा आणि 1800 कोटींचा माधोपुरा को-ऑपरेटिव्ह घोटाळा अशा अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याची चौकशीही त्यांनी केली.

नगराळे

फोटो स्रोत, ANI

2007 साली त्यांना ईस्ट रिजनचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. याकाळातही उसळलेल्या जातीय दंगली त्यांनी हाताळल्या होत्या.

2008 साली त्यांची MSEDCL म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे स्पेशल आयजीपी होते. मात्र, वीज वितरण कंपनीची जबाबदारी असतानाही 2008 साली मुंबईवर जो अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी त्यांनी स्वतःहून ताज हॉटेलच्या आत जात जखमींना आणि मृतांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचं काम केलं. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने ताज हॉटेलच्या शॉपिंग प्लाझामध्ये अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

पोलिसांनाही कॅन्टिनची उत्तम सुविधा मिळावी, यासाठीही केंद्रीय गृह मंत्रालयाकडे त्यांनी बरेच प्रयत्न केले. या प्रयत्नांमुळेच पोलिसांसाठी महाराष्ट्रभर 40 पोलीस कॅन्टिन उभारण्यात आले.

मुंबई पोलीस सहआयुक्त असताना त्यांनी पोलिसांसाठी निवासी क्वार्टर धोरण आखलं. मुंबई शहरात क्वार्टर वाटपात पारदर्शकता असावी, याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलं होतं. पोलीस दलाकडून त्यांच्या या प्रयत्नांचं बरंच कौतुक झालं.

2014 साली त्यांना थोड्या काळासाठी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार मिळाला होता.

2014 ते 2016 या काळात ते नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होते. यावेळी मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने काढलेल्या मोर्चामुळे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष या विषयाकडे वेधलं गेलं होतं. राज्यभरातून मराठा समाज नवी मुंबईमार्गे मुंबईत दाखल झाले होता. या मोर्चावेळी कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सांभाळण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती.

मात्र, 2018 साली रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणात बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले होते. यात शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचाही समावेश होता.

मात्र, विधान परिषदेच्या सभापतींच्या परवानगीशिवाय आमदाराविरोधात गुन्हा दाखल करता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात हेमंत नगराळे यांच्यावर कारकिर्दीत पहिल्यांदा निलंबनाची कारवाईही झाली होती.

हेमंत नगराळे यांना खेळाची विशेष आवड आहे. गोल्फ आणि टेनिस त्यांचे आवडते खेळ आहेत. ऑल इंडिया पोलीस गेम्स स्पर्धेत त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले आहेत. याशिवाय, ज्युडोमध्ये ते ब्लॅक बेल्ट आहेत.

त्यांना अनेक पदकांनी सन्मानितही करण्यात आलं आहे. यात राष्ट्रपती पोलीस पदक, विशेष सेवा पदक आणि आंतरिक सुरक्षा पदक या महत्त्वाच्या पदकांचा समावेश आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)