जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनविषयी जाणून घ्या 11गोष्टी

जसप्रीत बुमराह, संजना गणेशन

फोटो स्रोत, Instagram/Jasprit Bumrah

फोटो कॅप्शन, जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन

टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन विवाहबंधनात अडकले आहेत. बुमराहने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेतून बुमराहला विश्रांती देण्यात आली. त्याआधी टेस्ट सीरिजच्या चौथ्या कसोटीवेळी बुमराहने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती. तेव्हापासून बुमराहच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती.

बुमराहचं लग्न कुणाशी होणार याविषयी सोशल मीडियावर अनेक अफवा उठत होत्या. दाक्षिणात्य अभिनेत्री याच्याशी बुमराहचं लग्न होणार असल्याचं वार्ता काहींनी दिली. काहींनी संजना गणेशनचं नाव सांगितलं.

अभिनेत्री तारा शर्मा सलूजाने इन्स्टाग्रावर जसप्रीत-संजनाला लग्नासाठी शुभेच्छांची पोस्ट लिहिली आणि बुमराहची बायको कोण याची चर्चा संपली.

जसप्रीत बुमराह, संजना गणेशन

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, जसप्रीत बुमराह

टेस्ट,वनडे आणि ट्वेन्टी-20 अशा तिन्ही प्रकारात टीम इंडियाचं मुख्य अस्त्र झालेला आणि इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा हुकूमी एक्का अशी जसप्रीतची ओळख आहे.

भारतासाठी खेळताना, टेस्टमध्ये बुमराहच्या नावावर 83, वनडेत 108 तर ट्वेन्टी-20 प्रकारात 59 विकेट्स आहेत. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत बुमराहच्या नावावर .. विकेट्स आहेत.

क्रिकेटविश्वात जसप्रीतची बॉलिंग अक्शन हा कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय असतो. जसप्रीतची अक्शनमुळे भलेभले बॅट्समन गोंधळतात आणि विकेट गमावतात. वेग आणि अचूकता यामुळे जसप्रीतने अल्पावधीत तिन्ही फॉरमॅटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. विकेट्स पटकावणं आणि रन्स रोखणं या दोन्ही आघाड्या जसप्रीतने चोख सांभाळल्या आहेत.

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, श्रीलंकेचा अनुभवी फास्ट बॉलर लसिथ मलिंगाकडून जसप्रीतने यॉर्करचं कौशल्य घोटून घेतलं.

2016 ट्वेन्टी-20 वर्ल्डकप, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी तसंच 2019 वर्ल्ड कप स्पर्धेत बुमराह भारतीय संघाचा भाग होता.

जसप्रीत बूम आणि जस्सी या टोपणनावांनी प्रसिद्ध आहे.

या दोघांनी याआधी सोशल मीडिया हँडलवर एकत्रित एकही फोटो नाही. कोणत्याही सोहळ्यातही ते एकत्र दिसलेले नाहीत.

कोण आहे संजना गणेशन?

1.मॉडेलिंग आणि त्यानंतर स्पोर्ट्स अँकर झालेल्या संजनाने पुण्यातल्या सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमधून इंजिनियरिंगची डिग्री घेतली. उत्तम विद्यार्थी असणाऱ्या संजनाने सुवर्णपदकही पटकावलं होतं.

2.सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ती काही वर्ष काम करत होती. मॅनेजमेंट स्पीकर गणेश रामास्वामी आणि डॉ. सुषमा गणेशन यांची संजना ही मुलगी. संजनाला बहीणही आहे आणि तिचं नाव शीतल आहे.

3. 2012मध्ये संजना फेमिना स्टाईल दिवा फॅशन शो मध्ये सहभागी झाली होती.

4. संजना फेमिना ऑफिशियली गॉजिअस स्पर्धेत सहभागी झाली आणि तिने जेतेपदाचा किताबही पटकावला.

5. संजनाने एमटीव्ही चॅनेलवरच्या स्पिल्टव्हिला7मधून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं.

6. प्रीमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धेची निवेदिका म्हणून तिने काम पाहिलं आहे.

7. बॅडमिंटननंतर संजनाकडे क्रिकेटविषयक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन सोपवण्यात आलं. 'मॅचपॉइंट' आणि 'चिकी सिंगल्स' या कार्यक्रमाचं अँकरिंग संजनाने केलं आहे.

8.इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा लिलावावेळी स्टार स्पोर्ट्ससाठी अँकरिंगचं काम संजनाने केलं आहे.

9. इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेसाठीही संजनाने अँकर म्हणून काम केलं आहे.

10. 2019 वर्ल्डकप काळात संजना स्टार स्पोर्ट्सच्या टीमचा भाग होती आणि इंग्लंडमधून विविध शो तिने सादर केले होते.

11. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाची अँकर म्हणून द नाईट क्लब या शोचं अँकरिंग ती करत असे. 2020 मध्ये दुबईत झालेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान संजना केकेआर कँपचा भाग होती.

सोशल मीडियावर 'मुंबई नाईट रायडर्स' आणि 'क्रिकेट की तरफ से' उत्तराची चर्चा

बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यावेळी अँकर असलेल्या संजनाने बुमराहची छोटेखानी मुलाखत घेतली होती. जसप्रीत-संजना यांच्या लग्नाच्या चर्चेनंतर हा व्हीडिओ सोशल मीडियावर फिरू लागला.

आयपीएल स्पर्धेत जसप्रीत मुंबई इंडियन्ससाठी खेळतो तर संजना कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कार्यक्रमाचं अँकरिंग करते. या दोघांचं लग्न होणार कळू लागताच मुंबई नाईट रायडर्स हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.

जसप्रीत-संजनाच्या नात्याबद्दल, लग्नाबद्दल सर्वसामान्य चाहत्यांना आता कळत असलं तरी मुंबई इंडियन्स संघातील जसप्रीतचा साथीदार सूर्यकुमार यादव याला या जोडीबद्दल आधीच कळलेलं असावं असं दिसतं आहे. 17 सप्टेंबरला संजनाने इन्स्टावर म्हटलं की आयपीएल स्पर्धा दोनच दिवसात सुरू होत आहे. खूप आनंदी आहे. त्यावर सूर्यकुमार यादवने विचारलं की तुम्ही आप किसकी तरफ है? जसप्रीत मुंबईसाठी खेळत असला तरी संजना कोलकाता संघासाठी काम करते त्यामुळे सूर्यकुमारने शाब्दिक गुगली टाकला होता. भावी नवऱ्याच्या संघाला पाठिंबा देणार का ज्या संघासाठी काम करते त्याला समर्थन देणार असा तो प्रश्न होता. संजनाने या गुगलीला हुशारीने परतावून लावताना क्रिकेट की तरफ से असं मार्मिक उत्तर दिलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)