You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ई. श्रीधरन यांना केरळच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून भाजपचा यूटर्न
'मेट्रो मॅन' ई. श्रीधरन यांना केरळमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनवण्यावरून भाजपनं यूटर्न घेतलाय.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते व्ही मुरलीधरन म्हणाले, "पक्षाकडे चौकशी न करताच मी ते वक्तव्य केलं होतं. पक्षाने अधिकृतरित्या याबाबत (मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत) कुठलीच घोषणा केलेली नाही."
गुरुवारी (4 मार्च) मुरलीधरन यांनी म्हटलं होतं की, "आमच्या पक्षानं आगामी केरळ विधानसभा निवडणुकीबाबत घोषणा केलीय की, ई. श्रीधरन मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील."
याबाबत मुरलीधरन यांनी एक ट्वीटही केलं होतं. ते ट्वीटही डिलिट करण्यात आलं आहे.
त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, "ई. श्रीधरन यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनवून भाजप निवडणूक लढेल. आम्ही सीपीआय आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना पराभूत करू, जेणेकरून केरळला भ्रष्टाचारमुक्त आणि विकास करणारं सरकार मिळेल."
मात्र, त्यानंतर मुरलीधरन यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, "मी जे वक्तव्य केलं होतं ते माध्यमांमधील वृत्तांच्या आधारे होतं. त्या वृत्तांमध्ये पक्षाचा हवाला देण्यात आला होता. मात्र, पक्षाकडे त्याबाबत विचारलं, तर कळलं की, अशी कोणतीच घोषणा झालेली नाही."
आणखी एक ट्वीट शुक्रवारी (5 मार्च) सकाळपर्यंत मुरलीधरन यांच्या टाईमलाईनवर आहे, त्यात त्यांनी लिहिलंय, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजप केरळवासियांच्या गरजा पूर्ण करण्याचं काम करेल. ई. श्रीधरन यांच्या नेतृत्त्वात केरळला कुशल आणि प्रभावशाली सरकार मिळेल."
मुरलीधरन यांनी घेतलेल्या यूटर्नटी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी खिल्ली उडवली आहे.
थरूर यांनी ट्वीट करून म्हटलंय की, "काय मस्करी लावली आहे! भाजप अशा इमारतीच्या सर्वोच्च मजल्यावर जाण्याचं स्वप्न पाहतेय, जी कधी बनणारच नाहीय. केरळमध्ये भाजपचा मुख्यमंत्री कधीच होणार नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)